केंद्र सरकारकडून गृहकर्जदारांसाठी एक दिलासा दायक निर्णय घेणार आहे. सरकारकडून लवकरच शहरी आर्थिक दूर्बल घटकांसाठी गृहकर्जावर व्याज सवलत योजना सुरू केली जाणार आहे. ही योजना अमलात आणण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून काम सुरू करण्यात आले असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी(Hardeep Singh Puri) यांनी याबाबतची माहिती दिली.
पंतप्रधानांनी केली होती घोषणा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गृहकर्ज व्याज सवलत योजनेचा उल्लेख केला होता. या योजनेतून शहरी भागात भाड्याने अथवा चाळी, झोपडपट्ट्या अशा ठिकाणी वास्तव्य करतात अशा नागरिकांसाठी लहान आणि परवडणाऱ्या घरासाठी अनुदानित कर्ज दिले जाणार आहे. त्यानुसार सरकारकडून या योजनेसाठी 60 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाण्याची शक्यता आहे.
शहरी आर्थिक दूर्बल घटकांसाठी योजना-
केंद्र सरकारच्या या व्याज सवलत योजनेतून घरासाठी 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावर अंदाजे 3 ते 6 % पर्यंत अनुदानात्मक सवलत दिली जाण्याशी शक्यता आहे. ही योजना शहरी भागातील कमी उत्पन्न असणाऱ्या रहिवाश्यांसाठी राबवली जाणार आहे. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री पुरी यांनी या योजनेवर अद्याप काम सुरू आहे आणि लवकरच अशा प्रकारची व्याज सवलत योजना सुरू केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.