Scrap Sale Revenue: भारतीय रेल्वेचे जाळे भारतात सर्वत्र पसरले आहे. भारतीय रेल्वेतील मध्य रेल्वे हा एक महत्वाचा विभाग आहे. याअंतर्गत माटूंगा, मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर या शहरातील रेल्वे मार्गांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे विभागात सगळ्यात जास्त लोह आणि अॅल्युमिनिअम, तांबे या धातूंचा उपयोग करुन विविध साधने तयार केली जातात. त्यानंतर कालबाह्य झालेल्या वस्तू भंगार म्हणून विक्रीस काढल्या जातात. भंगारात विक्री केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून रेल्वेला आर्थिक नफा मिळतो.
150.81 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त
मध्य रेल्वेने रेल्वेतील प्रत्येक विभाग, वर्कशॉपची जागा आणि शेड असणाऱ्या जागा येथील संपूर्ण भंगार वस्तूंची विक्री केली आहे. मध्य रेल्वे विभाग पूर्णपणे भंगार मुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने 'झिरो स्क्रॅप मिशन' राबविले. या मिशन अंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 150.81 कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वे विभागाला प्राप्त झाला असल्याची माहिती मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई येथील जनसंपर्क विभागाने दिली.
37 % अधिक नफा
मध्य रेल्वेने 'झिरो स्क्रॅप मिशन' या कामाला प्राधान्य देऊन, कालबाह्य (Overaged) लोको, डिझेल सरप्लस लोको, अ-ऑपरेशनल रेल्वे लाईन्स आणि जुनाट किंवा अपघाती लोको तसेच कोच यासह विविध प्रकारचे भंगार निवडण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यासाठी 'झिरो स्क्रॅप मिशन' राबविण्यात आले आहे.
या मिशन अंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 150.81 कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वे विभागाला प्राप्त झाला आहे. हा नफा या आधीच्या भंगार विक्रीतून मिळालेल्या नफ्याच्या तुलनेत 37 % अधिक आहे. यामध्ये 6086 मेट्रिक टन रुळ, 09 लोकोमोटिव्ह, 160 कोच आणि 61 वॅगन्सचा समावेश आहे.
विभागानुसार भंगार विक्री
मध्ये रेल्वेच्या विभागानुसार भंगार विक्री किती झाली? हे बघितल्यास असे लक्षात येते की, माटुंगा डेपोने 27.12 कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. मुंबई विभागाने 25.97 कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. भुसावळ विभागाने 22.25 कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. पुणे विभागाने 16.08 कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने 16.05 कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. सोलापूर विभागाने 11.36 कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. तर नागपूर विभागाने 10.07 कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. तसेच मध्य रेल्वेवरील इतर विभागांनी एकत्रितपणे 21.91 कोटी रुपयांची भंगार विक्री केले. अशाप्रकारे झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नरत आहे.