रेल्वे फक्त प्रवासी वाहतुकीमधून पैसे कमावते असे नाही. रेल्वेचे देशभरात विविध उपक्रम चालतात. जागतिक सर्वात मोठे रेल्वेचे जाळे भारतात आहे. त्यामुळे साहजिकच प्रावाशांची संख्या अधिक आहे आणि महसूल देखील अधिक आहे. त्यातल्या त्यात मध्य रेल्वे विभाग महसुलाच्या बाबतीत कायम आघाडीवर राहिलेला आहे. गेल्या तीन महिन्यात केवळ पार्सल वाहतुकीमधून रेल्वेने थोडेथोडके नाही तर तब्बल 68 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. हा आजवरचा विक्रमी महसूल आहे असे मध्य रेल्वेनेच म्हटले आहे.
तब्बल 102.33% महसुलात वाढ!
विशेष बाब म्हणजे एप्रिल ते जून 2023 दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत प्रवाशी भाड्याव्यतिरिक्त 28 कोटी 52 लाख रुपयांचा महसूल मध्ये रेल्वेने गोळा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून 2022 दरम्यान 14 कोटी 20 लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला होता. यावर्षी मात्र सुमारे 68 कोटींचा महसूल गोळा झाला आहे. एकून महसुलात यंदा विक्रमी 102.33% वाढ झाली आहे.
पार्सल महसुलात 5% वाढ
रेल्वेकडून पार्सल सेवा देण्यासाठी खास मालगाड्या चालवल्या जातात. देशांतर्गत वाहतुकीसाठी पर्यायाने स्वस्त आणि जलद पर्याय म्हणून मोठमोठ्या कंपन्या आपला माल रेल्वेमार्फत पोहोच करत असतात. पार्सल गाड्यांसाठी आरक्षण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते. ई-लिलाव पद्धत रेल्वे मंडळाने सुरु केल्यामुळे एकाच दिवसांत मालवाहतूक आरक्षणाचा निपटारा केला जातो. त्यामुळे कंपन्यांना आणि रेल्वेला, दोघांनाही काम करणे सोपे आणि सोयीस्कर जाते. याचा थेट परिणाम रेल्वेच्या मह्सुलावर झालेला पाहायला मिळतो आहे.
एप्रिल ते जून 2023 दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत पार्सल महसुलात 67 कोटी 77 लाख रुपयांचा गल्ला जमला होता. मागील वर्षी याच तिमाहीत 64 कोटी 66 लाखांचा महसूल गोळा झाला होता. यावर्षी सुमारे 5% पार्सल महसुलात वाढ झाल्याचे दिसते आहे.
कोणत्या वस्तूंची होते वाहतूक?
इंडियन रेल्वेच्या वेबसाईटनुसार पार्सल म्हणून कोणकोणत्या वस्तूंची वाहतूक केली जाते याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय रेल्वे, देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा कणा आहे. देशाच्या जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे. देशाचा संतुलित आणि सर्वसमावेशक सामाजिक, आर्थिक विकास सुलभ करण्यासाठी इंडियन रेल्वे महत्वाची भूमिका बजावते.
रेल्वेमार्फत फळे आणि भाजीपाला, अन्नधान्य, मासे, कोंबड्या, इलेक्ट्रिकल वस्तू, सायकल, मोटारसायकल, स्कूटर, रिक्षा, यंत्रसामग्री, औषधे, गृहोपयोगी वस्तू इत्यादी सारख्या जवळपास सर्व वस्तू पार्सल केल्या जातात. कमी कालावधीत आणि वेळेवर पार्सल पोहोचवण्यासाठी इंडियन रेल्वे प्रयत्नशील आहे.