सध्या घरांच्या किमतीत होत असलेले चढ-उतार पाहता एखादे चांगले घर शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. घर घेणं हे प्रत्येकासाठी एक मोठं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. अनेकजण घर घेताना त्यांच्याकडे असलेली सगळी बचत घरामध्ये गुंतवतात. त्यामुळे घर घेतल्यानंतर त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहात नाहीत. खरं तर एकदा आपले घर झाले की, एक मोठे टेन्शन दूर होते असेच सगळ्यांचे म्हणणे असते. पण घर घेताना काही गोष्टी तुम्ही पडताळून पाहिल्या नाहीत तर घर घेतल्यानंतर सुद्धा तुमचा त्रास दूर होत नाही. उलट तुमची डोकेदुखी वाढते असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
आजकाल महानगरात अनधिकृत घरांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बिल्डर अनधिकृत बांधकाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. घर घेताना ते अधिकृत आहे की नाही हे कशाप्रकारे पडताळून पाहायचे हे अनेकांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते. घर घेताना कोणकोणती कागदपत्रं तपासणे गरजेचे आहेत याविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. अनेकवेळा एखाद्या बिल्डिंगचे बांधकाम सुरू होते. पण काही काळानंतर हे बांधकाम स्थगित होते आणि त्या बांधकामात लोकांनी गुंतवलेले पैसे बुडतात. आजवर अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळाल्या आहेत. बांधकाम ज्या जमिनीवर सुरू आहे, ती जमीन बिल्डरच्या मालकीची नसल्याने अशी बांधकामे पूर्ण होत नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचे घोषणापत्र, बांधकाम परवाना पत्र, मंजूर नकाशा, सात-बारा वा सिटीसर्व्हे उतारा, प्लॉटचा मंजूर नकाशा, खाडाखोडीचा प्लॉटचा उतारा, जागेची एनए ऑर्डर कॉपी, बिल्डर आणि पूर्वीच्या मालकाचे जमिनीचे खरेदी खत झेरॉक्स हे सगळे पाहिल्याशिवाय कोणतेही घर घेऊ नये. नवीन बांधकामात (New Construction) अथवा रिसेल (resale) मध्ये घर घ्यायला गेल्यानंतर ही कागदपत्रे तपासून पाहाणे आवश्यक आहे. अशाच आणखी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती आपण घेणार आहोत.
टायटल पेपर (Title Paper)
तुम्ही जे घर घेण्याचा विचार करत आहात, त्या घराचे Title Paper तपासणे गरजेचे आहे. हे Title Paper क्लिअर असेल तरच घर घेण्याचा विचार करा. तुम्ही नवीन बिल्डिंगमध्ये घर घेत असाल तर ज्या जमिनीवर बिल्डिंग उभी राहात आहे ती जमीन बिल्डरच्या नावाने असणे गरजेचे आहे. जर तुम्ही रिसेल (resale) मध्ये घर घेणार असाल तर संपूर्ण घराची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासा. एखाद्या अनुभवी वकिलाला कागदपत्रे दाखवून त्याला सल्ला घ्यावा. त्याच्याकडून पेपर योग्यरित्या तपासून घ्या.
बँकेला कर्जाच्या मंजुरीसाठी कागदपत्रे द्या
आजकाल घराच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे घर घेताना अनेकजण कर्ज घेतात. बँकादेखील घरांच्या रक्कमेच्या ८० टक्के कर्ज देण्यास तयार असतात. पण कोणतीही बँक कर्ज देताना सगळ्या गोष्टी पडताळून पाहाते. बँकेकडून तुम्ही कर्ज घेत असाल तर तुम्ही घेत असलेल्या घराची सगळी कागदपत्रे बँक तपासून पाहाते. त्यामुळे तुमचे अर्ध्याहून अधिक काम होते. कोणतेही कर्ज मंजूर करण्याआधी बँक सगळी कागदपत्रे पाहाण्यासोबतच बँकेचा प्रतिनिधी त्या जागेला भेट देखील देतो आणि तुम्ही घेत असलेले घर अधिकृत आहे की नाही याची शहानिशा करतो.
एनक्युमब्रान्स सर्टिफिकेट (Encumbrance Certificate)
तुम्ही घेत असलेल्या घरावर कोणतेही कर्ज नाहीये अथवा ते घर कुठेही गहाण ठेवलेले नाहीये हे Encumbrance Certificate मधून तुम्हाला कळते. तसेच तुम्ही घेत असलेल्या घराचे याआधीचे मालक कोण होते हे देखील या सर्टिफिकेटमध्ये लिहिलेले असते. तुम्ही रिसेल (resale) मध्ये घर घेणार असाल तर हे सर्टिफिकेट खूपच महत्त्वाचे आहे. यातून तुम्ही घेत असलेल्या घराचे पूर्वीचे मालक कोण होते, त्यांनी घर कुठे गहाण ठेवले होते का आणि गहाण ठेवलेले घर रक्कम पूर्ण देऊन सोडवले आहे का हे कळते. घर गहाण ठेवून त्याने पैसे परत केले नसतील तर ते देखील या सर्टिफिकेटमुळे कळते.
मालमत्ता कराच्या पावत्या तपासणे
तुम्ही रिसेल (resale) मध्ये घर घेणार असाल तर तुम्ही ज्या व्यक्तीकडून घर घेत आहात, त्याच्याकडून त्या घराच्या आधीच्या मालमत्ता कराच्या पावत्या तपासायला मागा. यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतील. पहिली म्हणजे तुम्ही घेत असलेले घर अधिकृत आहे की नाही. कारण मालमत्ता कराच्या बिलावरच घर अधिकृत आहे की अनधिकृत हे छापलेले असते. एवढेच नव्हे तर सगळ्या पावत्या तपासून पाहिल्यामुळे त्या घराचा आजवरचा मालमत्ता कर भरण्यात आलेला आहे की नाही हे देखील तुम्हाला समजेल.
नोंदणीकृत सोसायटीची स्थापना
प्रत्येक सोसायटी ही नोंदणीकृत (Registered Society) असून त्यात रहिवासी कल्याणकारी संघटना (resident welfare association) असणे आवश्यक असते. अपार्टमेंट वा फ्लॅट घेतल्यानंतर सोसायटी फॉर्मेशन लगेच करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे नवीन बिल्डिंगमध्ये घर घेतल्यानंतर प्रत्येकाने बिल्डरकडे यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. ही एक कायदेशीर प्रक्रिया असून तुम्ही घेत असलेले घर अधिकृत आहे की नाही यावरूनच कळेल.
घर घेताना तुम्ही ही सगळी कागदपत्रे योग्यरित्या पडताळून पाहिली तर तुम्ही शांतपणे तुमच्या घरात राहू शकतात, तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा मानसिक त्रास होणार नाही.