रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणापूर्वीच सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या रकमेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. ठेवींवरील सुधारित व्याजदर 5 एप्रिल 2023 पासून लागू झाल्याचे बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी 6 एप्रिल रोजी पतधोरण जाहीर केले जाणार असून त्यात रेपो दर 0.25% ने वाढवला जाण्याची शक्यता आहे.
मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. महागाई नियंत्रणासाठी बँकेने सलग सहावेळा रेपो दर वाढवला होता. त्याचबरोबर बँकांनी कर्जाचे दर वाढवले.सर्वच प्रकारची कर्जे महागली. त्याशिवाय ठेवींच्या दरात देखील वाढ झाली आहे. कॅनरा बँकेने जानेवारी महिन्यात 2 कोटींहून कमी रकमेच्या ठेवींचा दर वाढवला होता. आता पुन्हा बँकेने ठेवीदर वाढवला आहे.
7 दिवस ते 10 वर्ष या मुदतीतील ठेवींवर बँकेकडून 4% ते 7.25% या दरम्यान व्याज दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवरील व्याजदर हा 4% ते 7.75% इतका असेल. 444 दिवस मुदतीच्या 15 लाखांवरील ठेवींवर (non callabel deposits) बँकेकडून सर्वाधिक 7.40% इतकी व्याज दिले जात आहे. याच श्रेणीत ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांचे डिपॉझिट केल्यास त्यावर 7.90% व्याज दिले जाईल, असे बँकेने म्हटले आहे.नॉन कॉलेबल डिपॉझिटमध्ये मुदतपूर्ती पूर्वी पैसे काढता येत नाहीत. कॅनरा टॅक्स सेव्हर डिपॉझिट्सवर 6.70% व्याज दिले जाणार आहे.
7 ते 45 दिवसांच्या मुदतीवर 4% व्याज असेल तर 46 ते 90 दिवसांसाठी 5.25%, 91 ते 179 दिवसांसाठी 5.5% व्याजदर आहे. 180 ते 269 दिवसांसाठी आता 6.25% व्याज मिळेल. 270 दिवसांहून जास्त आणि एक वर्षांहून कमी कालावधीसाठी ठेवीदारांना आता 6.5% व्याज मिळेल. 1 वर्ष मुदतीवर आता 7% व्याज असेल. 444 दिवसांसाठी 7.25% , एक वर्षांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6.9% व्याज असेल. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.85% तसेच 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.8% असा व्याजदर राहील. 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.7% व्याजदर असेल. या सर्व मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50% जादा व्याज दिले जाईल, असे कॅनरा बँकेने म्हटले आहे.