वर्ष 2022 मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान गटात सर्वात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विप्रोबाबत शेअर बाजार विश्लेषक सकारात्मक आहेत. येत्या 13 जानेवारी 2023 रोजी विप्रोकडून तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यावरुन विप्रोची पुढील दिशा ठरणार आहे.
गेल्या वर्षभरात विप्रोचा शेअर 45% घसरला. निफ्टीवर विप्रो सर्वात निराशाजनक कामगिरी करणारा ठरला होता. विप्रोमुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र नव्या वर्षात विप्रो सावरेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. Trendlyne वरील माहितीनुसार जवळपास 13 ब्रोकर्सने विप्रोला Hold करण्याची शिफारस केली आहे. 12 ब्रोकर्सने Sell चा आणि 6 ब्रोकर्सने Buy ची शिफारस केली आहे. वर्षभरात विप्रोचा शेअर 459.15 रुपयांच्या पातळीपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज या ब्रोकर्सनी व्यक्त केला आहे. थोडक्यात आताच्या किंमतीच्या तुलनेत विप्रोमध्ये 16.91% वाढ होण्याची क्षमता आहे.
विप्रोकडून येत्या 13 जानेवारी 2023 रोजी तिमाही निकाल जाहीर केले जाणार आहेत. विप्रोच्या शेअरची पुढील दिशा ठरण्यासाठी ही आकडेवारी निर्णायक ठरणार आहे. याच दिवशी कंपनी मार्चमधील तिमाही उत्पन्न आणि नफ्याचा अंदाज वर्तवणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. एम्के ग्लोबल या संस्थेने विप्रोच्या नफ्यात 2.3% वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत विप्रोल 3037.80 कोटींचा नफा होऊ शकततो. मात्र एकूण महसुलात 15.5% घसरण होण्याची शक्यता एम्के ग्लोबलने व्यक्त केली आहे. विप्रोला तिसऱ्या तिमाहीत 23468 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. एम्के ग्लोबलने विप्रोसाठी खरेदीचा सल्ला दिला असून हा शेअर 470 रुपयांपर्यंत वाढेल, असे म्हटले आहे.
मागील सहा महिन्या विप्रोचा शेअर 418-375 रुपये या दरम्यान ट्रेड करत होता. सध्याचा शेअरचा भाव हा विप्रोने यूटर्न घेतल्यापासूनच्या स्तरावर आहे. विप्रोने तळ गाठला असून आता तो वरच्या दिशेने आगेकूच करेल, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषक मनीष शहा यांनी व्यक्त केला. ज्यांना या शेअरमध्ये थांबण्याची इच्छा आहे अशा गुंतवणूकदारांनी 410 रुपयांचे टार्गेट ठेवू शकता, असे शहा यांनी सांगितले.
बीपी इक्विटीज या संस्थेच्या अहवालानुसार माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला 2023 चांगल्या संधी आहेत. वर्ष 2022 मध्ये अमेरिका आणि युरोपातील मंदी, वाढता खर्च, नोकर कपात यासारख्या कारणांनी आयटी क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांना फटका बसला होता.मात्र वर्ष 2023 मध्ये ही परिस्थिती सुधारेल, असे अहवालात म्हटले आहे. नव्या दमाच्या कर्मचारी भरतीने कंपन्यांचा खर्च कमी होईल. डिजिटायझशमुळे कंपन्यांना येत्या वर्षात अनेक संधी उपलब्ध होतील, असे या अहवालात म्हटले आहे.
अॅक्सिस सिक्युरिटीने देखील आयटी क्षेत्रातील शेअर्सबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी, क्लाऊड ट्रान्सफॉर्मेशन, आयओट, मशीन लर्निंग अशा नव्या तंत्रज्ञानात कंपन्यांना प्रचंड संधी असल्याचे अॅक्सिसने आपल्या अहवालात म्हटले आहे. अॅक्सिसने विप्रोचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            