जीवनविमा पॉलिसी काढल्यामुळे केवळ सुरक्षाकवचच मिळते, असे नाही; तर एलआयसी (LIC)च्या जीवन विमा पॉलिसीमध्ये आपण भरलेल्या हप्त्यांपोटी कर्ज मिळण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. अर्थात यासाठी किमान तीन वर्षांचे हप्ते पॉलिसीधारकाने भरलेले असले पाहिजेत. मुख्य म्हणजे अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. तुम्ही पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या जास्तीत जास्त 85 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कर्जासाठी आपल्याला केवळ व्याज भरावे लागते. कर्जाची रक्कम पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर कंपनी वजा करुन घेते आणि उर्वरित रक्कम पॉलिसीधारकाला परत करते. सदर कर्ज मिळवण्यासाठी आपण विमा प्रतिनिधीची मदत घेऊ शकतो. अन्यथा एलआयसीच्या वेबसाईटवरुनही यासाठी अर्ज करता येतो. संकेतस्थळावर पॉलिसी ऑप्शन्स या विभागावर क्लिक करून आपल्याला सर्व माहिती भरावी लागते. यानंतर एक फॉर्म डाऊनलोड करावा लागतो आणि तो पूर्ण भरुन सही करुन, स्कॅन करून पुन्हा एलआयसीच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागेल. यानंतर कर्जासाठीची प्रक्रिया सुरू होते.
एलआयसीकडून कर्जाचे पैसे पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात जमा केले जातात. या सुविधेमुळे आपल्याला आर्थिक अडचणीच्या काळात मोठा हातभार लागतो. बरेचदा पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्याने ती बंद होण्याचा धोका असतो. अशा वेळी कर्जाचा पर्याय हा अधिक फायदेशीर ठरतो. कारण आपण आधी काही हप्ते भरलेले असल्याने ते वाया जाण्याची शक्यता उरत नाही.
कर्ज घेतल्यानंतर आपली पॉलिसी एक प्रकारे विमा कंपनी गहाण ठेवून घेते. त्यामुळे कर्जासाठीच्या दस्तावेजांची जमवाजमव करताना सर्वप्रथम पॉलिसीची मूळ प्रत असणे आवश्यक आहे. याखेरीज कॅन्सल केलेला एक चेकही द्यावा लागतो.