हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि इतर राज्यात सध्या जोरदार पाऊस पडतोय. नद्या ओसंडून वाहतायेत. नदीकिनारी असलेली कित्येक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. घरासोबतच अनेकांच्या मोटारगाड्या, कार देखील वाहून गेल्या आहेत. तुम्ही सोशल मिडीयावर या महाभयंकर पुराचे व्हिडियो पाहिले असतील.
तुमच्यापैकी अनेकांना याबाबत प्रश्न पडला असेल की या पुरात झालेल्या नुकसानाची भरपाई नागरिकांना मिळेल का? विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देतात का? त्यासाठी काही विशिष्ट नियम आहे का? या सगळ्यांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
वाहन विमा गरजेचा!
वाहन विमा म्हणजे काय हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. वाहन खरेदी करताना अनेकजण विमा घेतातच. तसेच मोटार वाहन कायदा-1988 नुसार वाहनांचा विमा असणे आवश्यक आहे. जर पावसात, पुरात तुमच्या वाहनाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही त्या नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकता. मात्र याअगोदर तुम्ही घेतलेला विमा नेमका काय काय कव्हर करतो हे पाहणे आवश्यक आहे.
जर पुरामुळे तुमची गाडी वाहून गेली असेल किंवा त्याचे नुकसान झाले असेल, तर अशा परिस्थिती तुमच्या विम्यात हे कारण नमूद केले आहे हा हे आधी बघून घ्या. वाहन विमा घेताना केवळ चोरीमुळे झालेले आर्थिक नुकसान झाले असेल किंवा अपघाती विमा घेतला असेल तर तुमची विमा कंपनी तुमचा क्लेम स्वीकारणार नाही.
कार विम्याद्वारे तुम्ही तुमच्या वाहनाचे नुकसान भरून काढू शकता. त्यामुळे जेव्हाही तुम्ही मोटार विमा खरेदी करता तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घ्या, जेणेकरून विमा दाव्याद्वारे कोणत्याही प्रकारचे नुकसान भरून काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
नैसर्गिक आपत्तीचा विचार करावा
विमा घेताना ग्राहकांनी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान देखील विम्यात समाविष्ट करून घ्यायला हवे. यासाठी विमा कंपनीकडे आग्रही मागणी करायला हवी. पाऊस किंवा पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी असा विमा कामी येतो. बाजारात अशा अनेक विमा कंपन्या आहेत ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान देखील विमा पॉलिसीत समाविष्ट करत असतात.
मोटार वाहन कायदा-1988 नुसार, पूर, पाऊस, वादळ किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे वाहनांचे नुकसानीची भरपाई ग्राहकांना क्लेम करता येते. त्यामुळे इंजिन संरक्षण देणाऱ्या ॲड-ऑनचा पर्याय असलेली विमा पॉलिसी निवडा. जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.