EV Battery: इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये लागणार महत्त्वाचा धातू म्हणजे लिथियम. मात्र, या धातूची 70 टक्के आयात भारत चीन आणि हाँगकाँगमधून करतो. चीन तसेच इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आता देशांतर्गत लिथियम धातूच्या उत्पादनास सरकार प्रोत्साहन देत आहे. खासगी कंपन्यांना लिथियम धातू खोदकामाची परवानगी खाणकाम मंत्रालयाने दिली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला फायदा
खाणकाम कायद्यामध्ये त्यानुसार बदल करण्यात आले आहेत. सोबतच इतर 5 धातूंच्या खाणकामासही खासगी कंपन्यांना परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारताची इतर देशांकडून होणारी लिथियमची आयात कमी होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. मात्र, त्या प्रमाणात बॅटरी निर्मिती क्षमता विकसित झाली नाही. इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमतीही जास्त आहेत. देशांतर्गत लिथियम उपलब्ध झाल्यास कंपन्यांना हा धातू स्वस्तात मिळेल. त्यामुळे गाड्यांच्या किंमतीही खाली येतील.
इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण 30 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट
भारतामध्ये सध्या एकूण वाहनांच्या तुलनेत फक्त 1% इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होते. हे प्रमाण 30% वर नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. टायटॅनियम, निओबियम, टॅनटालूम बेरिलियम आणि झिरकोनियम या पाच धातूचे खाणकामही खासगी कंपन्यांना करता येणार आहे. अॅटोमिक मिनरल यादीतून ही सहा खनिजे काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांना बोली पद्धतीने खाणकाम करण्याची परवानगी केंद्र सरकारला देता येईल.
भारत ऑस्ट्रेलियात सहकार्य करार
इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीतील लिथियम आयनचीही 90% आयात परदेशातून होते. जगात ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक लिथियम धातू मिळतो. त्यानंतर अर्जिंटिना, चिली आणि बोलिव्हिया या तिन्ही देशांच्या परिसरात सर्वाधिक लिथियम धातूचे साठे आहेत. लिथियम निर्मितीसाठी नुकतेच ऑस्ट्रेलिया आणि भारतात करार झाला आहे. त्याअंतर्गत 5 नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
जम्मू काश्मिरात लिथियमचे मोठे साठे
2023 वर्षाच्या सुरुवातीला जम्मू काश्मिरातील रेसाई जिल्ह्यात लिथियमचे साठे असल्याचे समोर आले होते. 5.9 मिलियन टन लिथियम असल्याचे Geological Survey of India ने म्हटले आहे. या खाणीतून आता लिथियम काढण्यात येणार आहे. सोबतच देशातील इतर भागात आणखी लिथियम आहे का याचाही शोध घेतला जाणार आहे.
पहिला लिथियम निर्मिती प्रकल्प आंध्रप्रदेशात
देशातील पहिला लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प 2021 साली आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात प्रतिदिन 20 हजार बॅटरी सेल निर्मितीची क्षमता आहे. या उद्योगाला प्रोडक्शन लिंक्ड इंनसेटिव्ह दिला जातो. इव्ही बॅटरी निर्मितीचे आणखी प्रकल्प भारतात उभे राहावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.