आपण जाहिरातींना भुलतो आणि एखादी वस्तू EMI वर खरेदी करुन मोकळे होतो. मग मात्र EMI फेडताना महिन्याचे बजेट कोलमडून जाते असे लक्षात येताच आपल्याला पश्चाताप होतो. या सगळ्याच एक महत्वाच कारण म्हणजे मासिक हप्ता (EMI) आहे. हा 'ईएमआय'चा आकडा बघूनच एखादी वस्तू आपल्या बजेटमध्ये आहे असे वाटते. याचा नंतर मात्र पश्चाताप होतो. (Buyer's remorse)
असे कोलमडते आपले मासिक बजेट (Monthly Budget Collapsed)
ईएमआयमुळे काहीही खरेदी करू शकतो असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण होतो. जर आपण 25 हजारांचा टीव्ही घ्यायला गेलो तर अगदी त्याच्या दुप्पट किमतीचा टीव्ही आपण केवळ 5 हजार रुपये भरुन घेऊ शकतो, अशी जाहिरात आपल्याला आकर्षित करते. मग, दरमहा एक ठराविक रक्कम आणखी काही महिने भरली की आपल्याला 50 हजारांचा टीव्ही सहज खरेदी करता येऊ शकतो, असे वाटते. प्रत्यक्षात आपण व्यवस्थित विचार करुन 25 हजाराचे बजेट निश्चित केलेल असते. मात्र त्यापेक्षा आता खूपच कमी पैसे भरायचेत आणि मग दरमहा सांगितलेली रक्कम आपण सहज भरू शकतो, असे त्यावेळी विक्रेता किवा वेबसाईटवरील जाहिरात आपल्याला पटवून देण्यात यशस्वी होते.
खरेदीपूर्वी दोनदा विचार करा (Think Twice Before Buying)
आपल्या बजेटपेक्षा जास्त किमतीची वस्तू घ्यायला आपण तयार होतो याचे एक कारण म्हणजे अशी वस्तू ही तुलनेने अधिक दर्जेदार असते. उदा. जर तुम्हाला 20 हजारांचा मोबाइल घ्यायचा असेल, अशा वेळी 40 हजारांच्या मोबाईलमध्ये मिळणाऱ्या सुविधा या साहजिकच अधिक प्रमाणात असतात. आणि असा मोबाईलही केवळ ठराविक रक्कम भरून आपला होणार आहे म्हटल्यावर तोच पर्याय आपल्याला चांगला वाटतो. ‘ईएमआय’मुळे आपल्याला महागड्या वस्तू सहजपणे खरेदी करून जीवनमान उंचावता येते, ही यातली चांगली गोष्ट आहे. मात्र, जाहिरातीला बळी पडून आपल आर्थिक नियोजन बिघडत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मासिक बजेट कोलमडू नये म्हणून…(Check Your Need)
अशा रीतीने ‘ईएमआय’वर खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या वाढते. एकीकडे कर्जाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे आपल्या महिन्याचे बजेट कोलमडत जाते. यासाठी अशी एखादी आकर्षक जाहिरात समोर आल्यावर, मला या गोष्टीची आता गरज किती आहे? अगोदरच माझ्या पगारातून पहिल्या कर्जाचे किती पैसे जात आहेत? आपला मासिक खर्च किती आहे? आपली बचत व गुंतवणूक किती आहे, यासारखे प्रश्न स्वत:ला विचारवेत. यामुळे एखादी वस्तू घेण्यासाठी आपल खर बजेट काय आहे ते समजू शकेल. जे समजल्यामुळे आपलं मासिक आर्थिक बजेटही कोलमडणार नाही.