आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्यांच्याकडे 2000 रुपयांचा नोटा मोठ्या प्रमाणात आहेत; त्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पण यातील हुशार मंडळींनी आपल्याकडील दोन हजारांच्या नोटा बँकेत एक्सचेंज करून घेण्याऐवजी छुप्या मार्गाने अधिकचा भाव देऊन सोने आणि डॉलर खरेदी करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
नवीन दिल्लीमध्ये आरबीआयच्या दोन हजार रुपयांच्या नोटाच्या बंदीच्या निर्णयानंतर, 2 हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणत सोने खरेदी झाली. सोन्याची ही खरेदी बाजाराच्या भावापेक्षा मोठ्या पटीने झाली. मार्केटमध्ये सोन्याचा भाव 62 ते 63 हजाराच्या घरात आहे; तोही त्यावर जीएसटी आकारून. पण मार्केटमध्ये छुप्या पद्धतीने 2000 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात 10 ग्रॅम सोन्याला 68,000 रुपयांचा भाव दिला गेला. त्यानंतर गेल्या 2 दिवसात या भावातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले.
अहमदाबादमध्ये हाच भाव 70,000 ते 75,000 रुपयांपर्यंत गेल्याचे बोलले जात आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात काही जणांकडून सोने खरेदी केले जात आहे. 2000 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात 10 ग्रॅम सोन्यासाठी लोक अव्वाच्या सव्वा किंमत मोजत आहेत. मुंबई, कोलकाता या ठिकाणी हा 67,000 ते 70,000 रुपये इतका असल्याचे बोलले जाते.
2016 मध्ये ज्याप्रमाणे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर ताबडतोप बंदी आणली होती. त्याप्रमाणे यावेळी आरबीआयने इतकी घाई केलेली नाही. लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत लोकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. तसेच तोपर्यंत या नोटा लीगल टेंडर म्हणून वापरता येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर याचा खूप परिणाम होईल असे दिसत नाही. कारण मागील 2-3 वर्षांपासून या नोटा मार्केटमधून मागे घेण्यात आल्या आहेत. बँक किंवा एटीएममधूनही 2000 रुपयांच्या नोटा ग्राहकांना दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे सर्वसामान्या ग्राहक यावेळी निश्चिंत आहेत.
पण रिअल इस्टेट, राजकारणी आणि रोख पैशांमध्ये व्यवहार करणाऱ्यांची मात्र नक्कीच डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे अशा लोकांनी दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात रोखीने सोने आणि डॉलर विकत घेत आहेत. हवाला मार्केटमध्ये डॉलरचा भाव 91 रुपयांपर्यंत गेला आहे.
2016 च्या नोटाबंदीच्या वेळी अनेकांनी सोने, डॉलर आणि क्रिप्टोकरन्सीला लोकांनी पसंती दिली होती. पण त्यावेळी ज्यांनी अशापद्धतीने व्यवहार केला होता. त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटीशींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यावेळी ज्यांच्याकडे काळा पैसा आहे; ते सोने आणि डॉलरच्या खरेदीसाठी हवालावर अवलंबून असल्याचे दिसून येते.
इंडियन बुलिअन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन यांनी आपल्या सदस्यांना कळवले आहे की, 2000 रुपयांची नोट ही 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत लीगल टेंडर म्हणून वापरली जाणार आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात ज्वेलर्स सोने विकू शकतात. पण ज्वेलर्सधारकांनी अशा परिस्थितीत सोने विकताना काळा पैसा प्रतिबंध कायद्यांतर्गत जी नियमावली घालून दिली आहे. त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जसे की, 50,000 वरील व्यवहारांकरीता ग्राहकांकडून पॅनकार्ड घेणे बंधनकारक आहे.