गुगलनं पिक्सेलनं (Pixel) 6A लॉन्च करून भारतीय बाजारपेठेत पुन्हा एन्ट्री केली आहे. याआधी कंपनीनं आपला शेवटचा फोन पिक्सेल 4A भारतात लॉन्च केला होता. पिक्सेल 6Aनंतर कंपनीनं आपले सर्व फोन भारतात लॉन्च केले आहेत. होय, इतर डिव्हाइसेस भारतात उपलब्ध नाहीत, परंतु पिक्सेल 6Aच्या आधीही अनेक गुगल फोन भारतात विकले जात होते. आज तकनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
कंपनी देत नाही वॉरंटी
भारतात तुम्ही अॅमेझॉनवरून गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला त्याची वॉरंटी मिळणार नाही. फोनचा एखादा छोटासा भाग जरी खराब झाला, तरी तो दुरुस्त होणार नाही. संपूर्ण फोन बदलावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही मोजावे लागणार आहेत. जसं की फोनचा डिस्प्ले खराब झाला तर यासाठी 20 हजार रुपये खर्च करावा लागू शकतो. या फोनवर कंपनी कोणतीही वॉरंटी देत नाही. म्हणजेच जर तुमचा अॅमेझॉनवरून खरेदी केलेला पिक्सेल फोन वॉरंटी कालावधीतही खराब झाला तरी त्यावर कोणतीही वॉरंटी मात्र नसणार.
काय कारण?
या संदर्भात गुगलच्या संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधला असता त्यानं यासंदर्भात माहिती दिली. कंपनी भारतात आपले सर्व अधिकृत फोन फ्लिपकार्टद्वारे विकत असल्यानं वॉरंटी फक्त फ्लिपकार्टवरून खरेदी केलेल्या फोनवरच उपलब्ध असणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सर्व्हिस सेंटरवरदेखील हाच नियम आहे. फ्लिपकार्टद्वारे विकत घेतलेल्या फोनवरच वॉरंटी आणि इतर सर्व्हिस मोफत असणार आहेत.
सेवा सशुल्क
कंपनी अॅमेझॉनवर विकले जाणारे फोन थेट विकत नाही, तर इतर विक्रेते ते कुठूनतरी विकत घेतात आणि त्यावर विकतात. त्यामुळे अशाप्रकारच्या फोनवर वॉरंटी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दुरुस्तीच्या संदर्भातही काही शंका आहेत. भारतात हे फोन दुरुस्त होणार नाहीत, असं नाही. तुम्ही गुगलच्या कोणत्याही ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरवर या फोनची दुरुस्ती करून घेऊ शकता, परंतु यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. याचाच अर्थ ही एक सशुल्क सेवा असणार आहे. वॉरंटी कालावधीच्या दरम्यान उपलब्ध असलेली विनामूल्य सेवा नाही.
भारतात कोणते फोन विकले जातात?
गुगल पिक्सेल 6Aनंतर लॉन्च झालेल्या सर्वच फोनची भारतात विक्री करते. कंपनी भारतात पिक्सेल 6A, पिक्सेल 7, पिक्सेल 7 Pro आणि पिक्सेल 7A विकते. तुम्हाला अॅमेझॉनवर इतर पिक्सेल फोन मिळतील. मात्र त्यातल्या कोणत्याही फोनवर वॉरंटी नसेल कारण ते कंपनीद्वारे विकले जात नाहीत.