सध्या भारतात पावसाने सगळीकडे दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या हजेरीनंतर अनेकांनी वीकेंडला पावसाळी सहलींचे नियोजन करायला सुरुवात देखील केली असेल. पावसाळ्यात अनेकजण हिरव्यागार निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी लोणावळा, खंडाळा, इगतपुरी,भिवपुरी, माथेरान यासारख्या ठिकाणी भेट देतात. ही पावसाळी सहल आनंदात आणि सुरक्षित पार पाडायची असेल तर तुमच्याकडे छत्री, रेनकोट, मोबाईल कव्हर, बॅग कव्हर, सॅंडल किंवा चप्पल, वॉटर बॉटल अशा ठराविक वस्तूंची खरेदी करणे गरजेचे आहे. या वस्तू पावसाळी सहलींमध्ये अतिशय उपयोगी पडतात. महत्त्वाचं म्हणजे या वस्तू एकदा खरेदी केल्या की त्या तुम्ही प्रत्येक पावसाळी सहलींमध्ये वापरू शकता. आज आपण या वस्तूंच्या बजेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
छत्री किंवा रेनकोटची खरेदी करणे
आपल्या प्रत्येकालाच पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते. मात्र हा आनंद लुटताना आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकजण वीकेंडला पावसात भिजून दुसऱ्या दिवशी आजारी पडतात. परिणामी दवाखान्यात पैसे खर्चही होतात आणि ऑफिसला दांडी पडते ती वेगळीच. हे जर टाळायचे असेल, तर तुम्ही लोकल मार्केटमधून किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून छत्री किंवा रेनकोट खरेदी करू शकता. लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या रंगाच्या आणि ट्रेंडच्या नवीन छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या छत्र्यांची किंमत 200 रुपयांपासून सुरू होते. लोकल मार्केटमध्ये तर केवळ 150 ते 200 रुपयांमध्ये अतिशय सुंदर छत्री खरेदी करता येते.
फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा इतर शॉपिंग प्लॅटफॉर्मवर रेनकोट 300 रुपयांपासून खरेदी करता येतो. वीकेंडला बाहेर फिरायला जाताना जर तुम्ही टू व्हीलर घेऊन जात असाल, तर पावसात भिजताना तुम्हाला रेनकोट गरजेचा असतोच. हाच रेनकोट तुम्ही लोकल मार्केट किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी करू शकता. या पावसाळ्यात या दोन्ही वस्तू वापरून तुम्ही त्या जपून ठेवल्या, तर पुढील पावसाळ्याच्या सहलीसाठी सुद्धा तुम्हाला त्या उपयोगी पडतील.
मोबाईल कव्हर आणि बॅग कव्हर खरेदी करणे
पावसाळ्यात सहलीला जाताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल कव्हर आणि बॅग कव्हर खरेदी करणे. पावसाळ्यात अनेकांना पावसात भिजायला आणि मनमुराद निसर्गाचा आनंद लुटायला आवडतो. अशावेळी तुमचा मोबाईल आणि तुमच्या बॅगेतील वस्तू सुरक्षित राहण्यासाठी वॉटरप्रूफ कव्हर खरेदी करणे गरजेचे आहे. हे कव्हर तुम्ही लोकल मार्केटमधून किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून देखील खरेदी करू शकता.
लोकल मार्केटमध्ये मोबाईल कव्हर 50 रुपयांपासून खरेदी करता येतो. तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर 100 रुपयांमध्ये हा कव्हर खरेदी करता येईल. मोबाईल कव्हर सोबत बॅग वॉटरप्रूफ कव्हर लोकल मार्केटमध्ये 100 ते 150 रुपयांपासून खरेदी करता येईल. तर जवळपास याच किमतीत ऑनलाईन देखील खरेदी करता येईल. या दोन्ही कव्हरमुळे तुमचा फोन आणि बॅगेतील सामान पावसातील पाण्यापासून सुरक्षित राहील.
पाण्याची बॉटल आणि थर्मास खरेदी करणे
पावसाळी सहलींसाठी बाहेर फिरायला जाताना पाण्याची बॉटल आणि थर्मास खरेदी करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाणी गढूळ होते, त्यामुळे रोगराई पसरते. अशावेळी बाहेरील पाणी पिल्याने तुम्ही आजारी पडू शकता. बाहेर फिरायला जाताना तुमच्या घरातील पाणी तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला वॉटर बॉटल खरेदी करावी लागेल. ही बॉटल लोकल मार्केटमधून केवळ 50 रुपयांमध्ये खरेदी करता येते. तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर 50 रुपयांपासून ते 5000 रुपयांच्या किमतीच्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ही बॉटल खरेदी करता येईल.
पावसाळ्यात अनेकांना पावसात भिजल्यावर गरम चहा प्यायला आवडतो. आपण ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत, त्या ठिकाणी चहा उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे अनेकजण घरीच चहा बनवून तो थर्मासात भरून आपल्यासोबत घेऊन जातात. त्यामुळे तुम्हालाही थर्मास खरेदी करायचा असेल, तर केवळ 300 रुपयांपासून हा थर्मास खरेदी करता येतो. थर्मासच्या किमती या लिटरवर आधारित असतात. हा थर्मास तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता. पावसाळी सहलीनंतर हा थर्मास तुम्ही इतर पिकनिकच्या वेळी किंवा सण समारंभाच्या वेळी वापरण्यासाठी काढू शकता.