फेब्रुवारी 2023 मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रातील वाढीचा दर 12 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. मागणीसाठी अनुकूल परिस्थिती आणि नवीन व्यावसायिक करारांमुळे सेवा क्षेत्राची वाढ झाली. यामुळे S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस PMI व्यवसाय क्रियाकलाप निर्देशांक फेब्रुवारीमध्ये 59.4 वर पोहोचला. जानेवारीत तो 57.2 होता. सेवा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (PMI) सलग 19 व्या महिन्यात 50 च्या वर राहिला. 50 वरील पीएमआय रीडिंग क्रियाकलापातील विस्तार दर्शवते आणि खाली असलेले आकुंचन दर्शवते. S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या संयुक्त संचालक पॉलिआना डी लिमा यांनी सांगितले की, सेवा क्षेत्राने जानेवारीत गमावलेली वाढीची गती परत मिळवली आहे. अनुकूल मागणी आणि स्पर्धात्मक किंमतींच्या आधारे 12 वर्षांत सर्वात जलद वाढ नोंदवली. S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस PMI सेवा क्षेत्रातील सुमारे 400 कंपन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे तयार केले आहे.
लिमा म्हणाले, फेब्रुवारीमध्ये इनपुट कॉस्ट वाढण्याची गती अडीच वर्षांतील सर्वात कमी होती. उत्पादन खर्च देखील 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. सेवा प्रदात्यांच्या नवीन ऑर्डर फेब्रुवारीमध्ये आणखी वाढल्या. स्पर्धात्मक किंमतीमुळे विक्रीत वाढ झाल्याचे सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र, नोकऱ्यांमध्ये थोडी वाढ झाली. सेवा क्षेत्रातील कंपन्यांमधील आशावाद सात महिन्यांतील सर्वात कमी होता. मागणी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. काही कंपन्यांनी जास्त स्पर्धेबद्दल चिंता व्यक्त केली.
सेवा क्षेत्राविषयी.. (Service Sector)
अर्थव्यवस्थेतील तीन भागांपैकी तिसरा भाग म्हणून सेवाक्षेत्र ओळखले जाते. प्राथमिक क्षेत्र व द्वितीयक (निर्माणक) क्षेत्र ही पहिली दोन क्षेत्रे असून प्राथमिक क्षेत्रात कृषी, पशुपालन, मासेमारी, इत्यादींची तर द्वितीयक क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो. तृतीयक क्षेत्रात अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा समावेश होतो. यामुळे त्यास सेवाक्षेत्र असे संबोधले जाते. माणसाच्या उत्क्रांतीतही तो सगळ्यात आधी निसर्गावर अवलंबून होता. त्यामुळे त्यावेळची अर्थव्यवस्था शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम अशा निसर्गाकडून उपलब्ध होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून होती, म्हणून या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असे म्हटले जाते. त्यानंतर मनुष्यप्राण्याने निसर्गनिर्मित गोष्टींवर प्रक्रिया करून नवनव्या वस्तूंचे उत्पादन व निर्माण सुरू केले. यामुळे हे द्वितीयक क्षेत्र झाले. सेवांच्या पुरवठ्यावर अर्थव्यवहार हा माणसाच्या उत्क्रांतीतील त्यानंतरचा टप्पा झाला, म्हणून सेवाक्षेत्र हे त्यानंतरचे तृतीयक क्षेत्र अस्तित्वात आलेले आहे.