Deepalakshmi Home Industry: आपण दररोज देवापूढे अगरबत्ती लावतो. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक घरात पूजा करतांना अगरबत्तीचा वापर होत असतो. आज मार्केटमध्ये हजारो प्रकारच्या विविध सुगंधित अगरबत्ती उपलब्ध आहेत. कुणी कोळसा, राळ, कापूर, भस्म यापासुन अगरबत्ती तयार करते. तर कुणी विविध सुगंधित फुलांपासुन अगरबत्ती तयार करते. परंतु आज आपण यज्ञात वापरल्या जाणाऱ्या हवन सामग्री आणि औषधीय वनस्पती पासुन अनेक प्रकारचे आजार दूर करणारी अगरबत्ती ग्राहकांसाठी कशी उपयोगाची आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
कशी झाली व्यवसायाची सुरुवात?
अत्यंत सामान्य जीवन जगणाऱ्या आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या दिपलक्ष्मी लाड यांना आणि त्यांच्या पतीला 2013 मध्ये काही आजारांनी ग्रासले होते. डॉक्टरांच्या मते हे आजार पूर्णपणे बरे होणारे नव्हते. परंतु, दिपलक्ष्मी लाड यांना प्राचीन काळापासुन चालत आलेल्या आयुर्वेदावर आणि यज्ञ थेरेपीवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे दिपलक्ष्मी यांनी आयुर्वेदिक उपचार सुरु केले. हवनामध्ये आयुर्वेदिक औषधी टाकून श्वासाद्वारे रोग हिलिंग करण्याचे उपचार त्या घरीच घेऊ लागल्या. मुख्य म्हणजे या उपचारांनी त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला. आपण जसे आयुर्वेदिक उपचारांनी आजारमुक्त झालो तसेच इतरांना देखील अनेक अजारांमधून बरं करण्याचा विश्वास त्यांच्या मनात जागा झाला आणि येथुन सुरु झाला यज्ञथेरेपी वनऔषधी अगरबत्ती निर्मिती व्यवसायाचा प्रवास. लाड यांनी आपल्या व्यवसायाला दिपलक्ष्मी गृहउद्योग नावाने सुरुवात केली. या व्यवसायामुळे त्यांना इतर 5 महिलांना देखील रोजगार मिळवून देता आला आहे.
सात प्रकारच्या अगरबत्तींची विक्री
आयुर्वेदिक उपचार श्वासाद्वारे घेण्याकरीता लागणारा वेळ प्रत्येकाजवळ नसतो. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक जडी बुटी पासुन अगरबत्ती तयार करुन ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना अंमलात आणली. यासाठी त्यांनी सात प्रकारची अगरबत्ती तयार केल्या.
चंदन आणि लॅवेंडर
चंदन आणि लॅवेंडर या दोन प्रकारच्या सुगंध देणाऱ्या अगरबत्ती शरीरातील आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यास मदत करते. मन प्रफुल्लीत ठेवते आणि शरीरातील थकवा दूर करणारी आहे.
मनसंतुलन अगरबत्ती
मनसंतुलन अगरबत्ती ही पूर्णपणे आयुर्वेदिक वनस्पती पासुन तयार करण्यात आलेली अगरबत्ती आहे. या अगरबत्तीमुळे मनशांती मिळते, डोळ्यांच्या आणि डोकेदुखीच्या समस्या दूर होतात, अस्थमा दूर होतो. मनुष्य तणावमुक्त जीवन जगतो.
वातसंतुलन अगरबत्ती
वातसंतुलन अगरबत्ती ही सुध्दा पूर्णपणे जडीबुटी पासुन तयार करण्यात आलेली अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती शरीरातील वात संतुलित राखते. हात-पायातील वात कंट्रोल मध्ये येते आणि मसल्स पेन कमी होते.
शुगर संतुलन
शुगर संतुलन अगरबत्तीमुळे शुगर संतुलनात राहते. ती अगदी कमी किंवा जास्त होत नाही. थकवा दूर होण्यास मदत होते.
निम अगरबत्ती
तर निम अगरबत्तीमुळे डास येत नाही आणि इतरही किटकांचा त्रास होत नाही. मार्केटमध्ये वापरल्या जाणारे डास पळविणारे प्रॉडक्ट हे शरीरास हार्मफूल असतात. तर ही अगरबत्ती एक आरोमा निर्माण करते, जो शरीरास लाभदायक ठरतो.
हिलिंग अगरबत्ती
हिलिंग अगरबत्ती ही रेकी, मेडिटेशन करतांना वापरली जाते. ही सुध्दा पूर्णपणे आयुर्वेदिक अगरबत्ती आहे. यात वापरले जाणारे घटक अत्यंत महाग असल्याने ही अगरबत्ती 3 हजार रुपये किलोने विक्री केल्या जाते.
व्यवसायासाठी पैसे उभे केले
दिपलक्ष्मी गृहउद्योग उद्योग सुरु करण्यासाठी दिपलक्ष्मी यांनी अगदी सुरुवातील स्वयंसहायत्ता महिला बचत गटाकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि स्वत: जवळचे काही पैसे गुंतवणूक करुन अगरबत्ती तयार करण्यास लागणारी एक मशीन विकत घेतली. सोबतच कच्चा माल विकत आणून 2017 पासुन व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता त्यांनी उत्तम पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करिता बचत गटाकडून आणखी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले.
मार्केटिंग कसे करतात?
दिपलक्ष्मी या आपल्या प्रॉडक्टचे मार्केटिंग सर्व प्रकारच्या प्रदर्शन मध्ये स्टॉल लावून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच माऊथ पब्लिसिटी करुन करतात. तसेच अनेक ऑफिसमध्ये जाऊन देखील आपल्या प्रॉडक्टचे मार्केटिंग करतात. त्यांना या व्यवसायामधून वर्षाला दोन लाख रुपयांपेक्षा अधिक नफा होतो. हा उद्योग वर्षाला 8 लाख रुपये नफा मिळवून देईल, असा प्रयत्न सुरु असल्याचे दिपलक्ष्मी यांनी सांगितले. तसेच दिपलक्ष्मी यांनी 5 महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या महिलांना यातून वर्षाला 40 हजार रुपयांच्या जवळपास नफा होतो.
पुरस्कार आणि G-20 नामांकन
वेगळे असे औषधीयुक्त आणि आयुर्वेदिक प्रॉडक्ट तयार केल्यामुळे त्यांना नागपूर येथील धरमपेठ महिला बँकेचा उद्योजिका पुरस्कार यासह आणखी दोन यशस्वी उद्योजिका पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय नागपूर येथे पार पडलेल्या G-20 मध्ये देखील दिपलक्ष्मी यांच्या यज्ञथेरेपी वनऔषधी अगरबत्तीचे सिलेक्शन झाले होते. तसेच, तेथुन विदेशातील अनेक ग्राहकांनी ही अगरबत्ती खरेदी केली आणि मला त्या माध्यमातून चांगला नफा झाला, अशी माहिती दिपलक्ष्मी यांनी दिली.
आयुर्वेदिक अगरबत्तीची हा व्यवसाय घरी राहून देखील अनेक हाऊस वाइफ सुरु करु शकतात. तेव्हा दिपलक्ष्मी लाड यांचे योग्य मार्गदर्शन घेऊन आणि आपली आवड जोपासून महिलांनी अशा प्रकारचा उद्योग सुरु करायला हवा.