Healthy Juice Business: सांगली जिल्ह्यातील जत हा तालुका अत्यंत कोरडवाहू असल्याने तेथे फारच कमी प्रमाणात धान्य किंवा भाजीपाला पिकवला जातो. येथील सर्व शेतकरी कोरडवाहू शेती मध्ये सहजतेने जे पिकेल तेच उगवण्याकडे लक्ष देतात. त्यामुळे येथे राहणारे शेतकरी सुशांत आणि वडील संभाजीराव बोराडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या साडेबारा एकर शेतात कोरफडची (अॅलोव्हेरा) लागवड करण्याचा विचार केला. ही कोरफड विविध कॉस्मेटिक कंपन्यांना विक्री करण्याचा प्लॅन बोराडे कुटुंबियांचा होता.
Table of contents [Show]
संकटातून काढला मार्ग
1999 मध्ये सुशांत आणि संभाजी बोराडे यांनी संपूर्ण साडेबारा एकर मध्ये कोरफडची लागवड केली. ही लागवड करत असतांना त्यांचे काही कॉस्मेटिक कंपन्यांशी बोलणे झाले होते. त्यांनी घेतलेले कोरफडचे उत्पादन या कंपन्या खरेदी करणार होत्या. मात्र, कोरफडची लागवड केल्यानंतर काही वेगळेच घडले. विविध कारणे देत या कंपन्यांनी शेतातील कोरफड खरेदी करण्यास नकार दिला. हे असे अनेक वर्ष चालत राहिले. या काळात सुशांत आणि संभाजी यांनी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. परंतु, या संकटामधून सुशांत यांनी मार्ग काढला.
ग्राहकांची ज्यूसला पसंती
2007 मध्ये सुशांत यांनी 'सुशांत अॅग्रो' नावाने कंपनी सुरु केली आणि संजीवनी असे प्रॉडक्टला नाव दिले. सुशांत यांनी अॅलोव्हेरा ज्युस तयार करुन विक्री करणे सुरु केले. सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी आणि प्रदर्शन मध्ये स्टॉल लावून विक्री करणे सुरु केले. या अॅलेव्हेरा ज्युसला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला. तसेच इतरही ज्युस तयार आणि विक्री करण्याची मागणी होऊ लागली.
सुशांत अॅग्रोची उभारणी
ग्राहकांची मागणी लक्षात घेता, सुशांत यांनी रामेती येथून अन्न प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं. बँक ऑफ महाराष्ट्र मधून 24 लाख रुपयांच कर्ज घेतलं. त्यावर त्यांना 10 लाख रुपयांची सबसिडी मिळाली. कर्ज घेतलेल्या 24 लाख रुपयांमध्ये स्वत: जवळचे आणखी काही पैसे टाकून सुशांत यांनी 35 लाख रुपयांची गुंतवणूक 'सुशांत अॅग्रो कंपनी' उभी केली.
27 प्रकारचे ज्युस तयार
सुशांत अॅग्रो मध्ये आता जांभूळ, आवळा, तुळस, कारलं, अर्जुन रस, गुळवेल, त्रिफळा, लेमन, पपईची पाने, इत्यादी प्रकारचा ज्युस तयार करुन विक्री केला जातो. असे एकूण 27 प्रकारचे ज्युस तयार केले जातात. या ज्युसेसची 200, 500 आणि 1000 एमएल बॉटल मध्ये पॅकिंग केली जाते.
नफा देणारा व्यवसाय
या ज्युसेसची विक्री विविध ठिकाणी प्रदर्शन, स्टॉल लावून, आयुर्वेदिक फार्मेसी मध्ये, डि मार्ट, मॉल आणि सुपर बाजार मध्ये केली जाते. तसेच सर्व इ-कॉमर्सवर केली जाते. त्याचप्रमाणे शेतात अॅलोव्हेराची मोठ्या प्रमाणात लागवड करुन द्रव्य स्वरुपात सेंद्रिय खते तयार करणाऱ्या कंपन्यांना अॅलोव्हेरा ज्युस विक्री केला जातो. तसेच अनेक कॉस्मेटिक कंपन्यांना क्लिअर अॅलोव्हेरा ज्युस (अॅलोव्हेरा वन एच) पुरवतात. या कंपन्यांना 50 ते 200 लिटरच्या पॅकिंग ड्राम मध्ये अॅलोव्हेरा ज्युस दिल्या जातो. सुशांत अॅग्रोच्या सर्व उत्पादनामधून सुशांत यांना वर्षाला 12 ते 15 लाख रुपयांचा नफा होतो.