Sanskruti Masale: समाजातील विविध स्तरातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी शहर आणि ग्रामीण पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या बचत गटांना ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच अनेक आर्थिक योजनांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देखील केले जाते.
Table of contents [Show]
सरकारी योजनेतून मिळाले प्रशिक्षण
सातारा जिल्ह्याच्या ओझर्डे गावातील आठ महिलांच्या बचत गटाने मिळून आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2017 मध्ये ओझर्डे येथील आठ महिलांचा संस्कृती महिला बचत गट नावाने एक बचत गट स्थापन केला. त्यावेळी उमा निकम या तेथील सरपंच होत्या. 14वा वित्त आयोगाच्या माध्यमातून सरपंच उमा निकम यांनी गावात काही प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. पुणे येथून आलेल्या प्रशिक्षकांनी त्यावेळी केक, मसाले आणि सोयाबीन पासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थांचे प्रशिक्षण दिले.
कसा झाला व्यवसाय सुरु?
प्रशिक्षणादरम्यान तयार करण्यात आलेला मसाला बचत गटातील महिलांनी घरी आणून त्याची चव चाखली आणि विविध मसाल्यांची चव घरातील सर्वच मंडळींना आवडली. मग काय, संस्कृती महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी मीटिंग घेऊन विविध प्रकारचे मसाले विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्धार केला. मात्र यासाठी अडचण होती ती भांडवल उभे करण्याची. सुरुवातीला जास्त भांडवल न गुंतवता गरजेनुसार थोडे थोडे भांडवल गुंतवत जायचे असा विचार करीत या आठ महिलांनी प्रत्येकी 3 हजार रुपये याप्रमाणे 24 हजार रुपये भांडवल उभे केले. या पैशांनी या महिलांनी एक ग्रँडर आणि थोडे- थोडके मसाले तसेच पॅकिंग करण्यास लागणारे साहित्य विकत घेतले.
मार्केटिंगचे पहिले पाऊल
सुरुवातीला ओझर्डे गावामध्ये स्टॉल लावून संस्कृती महिला बचत गटाच्या महिलांनी मसाले विकले, परंतु पाहिजे तेवढी विक्री होत नव्हती. मग संक्रातीच्या सणाला संस्कृती बचत गटाने मोठ्या प्रमाणात हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित करुन तेथे महिलांना वाणात वेगवेगवळे मसाल्याचे पॅकेट वाटले आणि येथून सुरु झाला मसाल्यांचा विक्रीचा प्रवास. वाणात दिलेल्या मसाल्यांची चव महिलांना आवडल्याने गावात मसाल्यांची मागणी वाढली.
स्टॉल लावून विक्री सुरु केली
त्यानंतर या महिलांनी संस्कृती बचत गट पंचायत समितीला जोडला,यामुळे बचत गटाची नोंदणी ऑनलाईन झाली. यामुळे जिथे जिथे सरकार तर्फे बचत गटाचे स्टॉल आयोजित केले गेले, तेथे तेथे या महिलांनी संस्कृती बचत गटाचा स्टॉल लावून मसाले विक्री सुरु केली. यामाध्यमातून कधी-कधी दिवसाला 10 हजार रुपयांची सुध्दा विक्री व्हायची. असे करीत करीत दीड वर्ष झालेला नफा या आठही महिलांनी केवळ व्यवसायात गुंतविला.
आकर्षक पॅकेजिंग
विक्री वाढायला लागल्या नंतर महिलांनी मसाल्यांचे पॅकेजिंग आकर्षक करण्याकडे भर दिला. सोबतच मार्केटिंग आणि पॅकेजिंगचे प्रशिक्षण घेतले. यासाठी महाराष्ट्र बँकेकडून 1 लाख रुपयांच कर्ज घेतलं. संस्कृती मसाल्याचे आकर्षक पॅकेजिंग आणि ब्रँड तयार झाल्यानंतर या मसाल्यांची विक्री झपाट्याने वाढली. मुंबई येथील दोन डिस्ट्रीब्यूटर मिळाले, त्यामुळे नफा महिन्याला लाखो रुपयांपर्यंत पोहचला होता.
नफा किती?
15 प्रकारचे अतिशय चविष्ट असे मसाले ग्राहकांच्या पसंतीस उतरु लागल्याने मागणी वाढली. त्यानंतर महिलांनी परत महाराष्ट्र बँकेकडे 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. त्यापैकी त्यांनी साडेसात लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. कोरोना काळात मात्र लॉकडाऊन मुळे उद्योग करतांना अनेक अडचणी वाढल्या. त्यामुळे या महिलांनी मसाल्याच्या सोबतीला हळद आणि कांदा-लसूणची चटणी विक्री देखील सुरु केली. आतापर्यंत या महिलांनी साडेसात लाख पैकी जवळपास अर्धे कर्ज चुकते केले आहे. सध्या मसाल्यांचे प्रचंड दर वाढल्यामुळे महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांचा नफा होतो.
मसाल्यांचे प्रकार
संस्कृती मसाले ब्रँडच्या 15 प्रकारच्या मसाल्यांमध्ये गोडा मसाला, मटन आणि चिकन मसाला, मालवणी मसाला, बिरयाणी मसाला, पूलाव मसाला, अंडा करी मसाला, गरम मसाला, पाव भाजी मसाला, पनीर मसाला, सबजी मसाला, छोले मसाला, मिसळ मसाला, सांबार मसाला, काजू करी मसाला, काळा मसाला, अख्खा मसूर, यासारख्या मसाल्यांचा समावेश आहे.