Shree Gagangiri Brand: विविध संस्थांच्या माध्यमातून विशेषत: गाव खेड्यातील बचत गटाच्या महिलांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते. महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा उद्देश असतो. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे महिला स्वबळावर कमावलेल्या पैशांचा उपयोग स्वत:चे आणि कुटुंबाचे भविष्य सुधारण्यासाठी करतात.
Table of contents [Show]
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात राहणाऱ्या शारदा जाधव यांचे शिक्षण केवळ इयत्ता 7 वी पर्यंत झालेले आहे. 2009 मध्ये जनभारती न्यास या संस्थेने गगनगिरी बचत गटातील महिलांना प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण दिलं. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर शारदा यांनी करवंदापासून तयार करण्यात येणारे सरबत आणि लोणचे विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी सुरुवातीला केवळ 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला 2 वर्ष प्रत्येक पदार्थ स्व-हाताने तयार केला आणि हा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. 14 वर्षांच्या या तपश्चर्यमुळे आज 'श्री गगनगिरी प्रॉडक्ट'चा एक ब्रँड तयार झाला आहे. आता करवंद सरबत निर्मिती करीता कटिंग आणि प्रेस यंत्राचा वापर केला जातो.
कल्पना आणली अंमलात
शारदा यांच्याकडे 4 एकर शेती आहे. या शेतीमध्ये तांदूळ, नाचणी, ऊस, कलिंगड, इत्यादी पिके घेतली जाते. परंतु एवढ्याशा शेतीवर कुटुंबाचं भागत नसे. कोल्हापूरचा गगनबावडा तालुका डोंगराळ भागात असल्याने येथे डोंगरमाथ्यावर करवंदाची अनेक झाडे आहेत. मे महिन्यात या झाडांना चांगला बहार येतो. शारदा यांनी प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यांना करवंदाचे लोणचे आणि सरबत करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी ती अंमलात आणली.
गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध
मे महिन्यात करवंदाला सर्वाधिक बहार येत असल्याने गावातील मजूर करवंद तोडायला जातात. एक व्यक्ती दिवसाला 30 किलोपर्यंत करवंद तोडू शकतो. मजूरांनी तोडलेले हे करवंद शारदा त्यांच्याकडून 25 ते 30 रुपये किलो खरेदी करतात. याप्रमाणे दररोज किमान 300 ते 400 किलो करवंदाची खरेदी केली जाते. जवळपास 100 मजूर हे शारदा यांना तोडून आणलेले करवंद विक्री करतात. शारदा यांनी सुरु केलेल्या या व्यवसायामुळे या 100 नागरिकांना हंगामी रोजगार प्राप्त झाला आहे. तसेच, प्रक्रिया करुन लोणचे, सरबत आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी 8 महिलांना रोजगार देण्यात आला आहे.
वर्षाला लाखोंचा नफा
श्री गगनगिरी स्वयंसाहायत्ता समुहाच्या माध्यमातून दरवर्षी 5000 लीटरचे सरबत आणि 500 ते 1000 किलोचे लोणचे तयार केले जाते. करवंदाच्या खाद्यपदार्थांनी सुरु झालेला हा प्रवास आता फणस, जांभूळ आणि आंबे यांचं सरबत, लोणचे आणि वेफर्स पर्यंत पोहचला आहे. या खाद्यपदार्थांची किंमत 40 रुपये ते 200 रुपये एवढी आहे. शारदा यांना वर्षाला 3 लाख रुपये एवढा नफा या व्यवसायाच्या माध्यमातून होतो.