Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: भारतीय संस्कृती दर्शविणारा पेपर डॉल्स विक्रीचा व्यवसाय, वर्षाला लाखोंची उलाढाल

Paper Doll Business

Paper Doll Business: महिला कलाकार रमणी वासुदेव यांनी आपली कलेची आवड जोपासत सुंदर आणि आकर्षक अशा पेपर डॉल्स विक्रीचा व्यवसाय नागपूर शहरात सुरु केला आहे. 'आर्टीफॅक्ट नागपूर डॉट' नावाने सुरु केलेला हा व्यवसाय साता समुद्रापार पोहचला आहे. पेपर आणि इतर वस्तूंपासून तयार केलेल्या बाहुल्यांमध्ये जीव ओतून त्यांना मूर्ती रुपात आणण्याचं काम रमाणी करतात. यामाध्यमातून त्या अनेक महिलांना रोजगार देतात.

Artifact Exhibitions: प्रत्येक मुलीने आपल्या अगदी लहान वयात बाहुली सोबत खेळ खेळले असतात. ती बाहुली म्हणजे लहान मुलीची जणू एक मैत्रीणच असते. आता बाजारात परदेशातील बाहुल्यांचा प्रभाव जास्त दिसून येतो. मात्र आजपासून जवळपास 20 ते 30 वर्षाआधीचा विचार केल्यास असे लक्षात येते की, आपली आई आपल्याला मातीच्या किंवा कापडाच्या बाहुली तयार करुन देत असे. महिला कलाकार रमणी यांच्या आईला सुध्दा अशाच प्रकारे कापडाच्या बाहुल्या तयार करण्याची फार आवड होती. हीच आवड रमणी यांनी जोपासली. गरजुंना बाहुली तयार करण्याचे प्रशिक्षण, छंद आणि व्यवसाय असा हा त्यांचा प्रवास अतिशय उल्लेखनीय असा आहे.

'असा' जडला छंद

मुळच्या तेलुगु असलेल्या रमणी वासुदेव यांचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण हे नागपुरातच झाले. त्यांच्या आईला घरातील टाकाऊ वस्तूंपासून विविध प्रकारच्या बाहुली तयार करण्याची फार आवड होती. कापडाच्या आणि इतर वस्तूंच्या माध्यमातून अत्यंत आकर्षक बाहुली रमणी यांच्या आई तयार करायच्या. तसेच त्या बर्डी स्थित मातृ सेवा संघामधील पुनर्वसन केंद्रातील दिव्यांग मुलींना बाहुली तयार करण्याचे प्रशिक्षण द्यायला जायच्या. मात्र प्रशिक्षण देत असतांना रमणी यांच्या आईला मराठी भाषेत मुलींशी संवाद साधण्यास अडचणी येत असे. त्यामुळे त्या रमणी यांना सोबतीला नेत असे. मग रमणी या मुलींना मराठी भाषेत प्रशिक्षण देऊन बाहुली तयार करण्यास सांगत असे. अशा प्रकारे रमणी यांना देखील बाहुली तयार करण्याचा छंद जडला.

नार्वेत भारतीय कलेचा डंका

मुलींना प्रशिक्षण देण्यास बाहुल्या तयार करता करता, रमणी यांनी आवड म्हणून संस्कृती, परंपरा, नृत्य दर्शविणाऱ्या बाहुल्या तयार केल्या. हळूहळू या आकर्षक दिसणाऱ्या बाहुल्या लोकांना आवडू लागल्या. मग एकदा जवळच्या नातेवाईकांनी नार्वे येथे एका प्रदर्शन मध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बाहुल्या तयार करुन प्रदर्शन मध्ये ठेवण्यास सांगितल्या. त्यासाठी रमणी आणि त्यांच्या आईने कठोर मेहनत घेऊन 2 महिन्यात 400 बाहुल्या तयार केल्या. 1988 मध्ये नार्वे येथे लावलेल्या त्या प्रदर्शनात 5000 रुपयांना एक बाहुली याप्रमाणे सर्वच बाहुल्या विकल्या गेल्या. शिवाय त्यानंतर नार्वे येथे आणखी 7 ते 8 प्रदर्शन रमणी यांनी लावले. नार्वे नंतर डेन्मार्क येथे सुध्दा रमणी यांनी प्रदर्शन लावले.

फिनिशिंग करीता घ्यावी लागली मेहनत

दरम्यानच्या काळात देखील गरजू मुलींना प्रशिक्षण देणे सुरु होतेच. पूढे रमणी यांनी त्या तयार करीत असलेल्या बाहुली अधिक आकर्षक, सुंदर आणि रेखीव दिसायला हव्यात यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सोबतच सातत्याने प्रदर्शन लावणे सुरुच होते. दरम्यान रमणी यांची भेट नागपूरातील एससीझेडसीच्या अधिकाऱ्यांशी झाली आणि त्यांनी रमणी यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या बाहुल्यांचा व्यवसाय करण्याकरीता मार्गदर्शन केले.

बाहुली तयार करण्यास लागणारे साहित्य

पेपर, डिंक, तार, लाकूड, ज्यूट, कपडे, विविध प्रकारच्या लेस, बाहुलीचे दागिने तयार करण्यास लागणारे साहित्य, वस्त्र तयार करण्यास लागणारे साहित्य, इत्यादी वस्तूंपासून इको फ्रेंडली, टिकाऊ आणि सुंदर अशा बाहुली तयार केल्या जातात. त्यांना सजवले जाते.

नफा आणि रोजगार

सुरुवातीला केवळ 10 हजार रुपयांची गुंतवणूक करुन रमणी यांनी 'आर्टीफॅक्ट नागपूर डॉट' नावाने आकर्षक बाहुली तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. आता या व्यवसायात त्यांची एकूण गुंतवणूक 30 ते 40 लाख रुपयांची आहे. तर त्यावर होणारा नफा हा वर्षाला 5 ते 15 लाख रुपये एवढा आहे. रमणी यांनी जवळपास 16 ते 18 महिलांना या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार दिला आहे.

जशी मागणी तशी वस्तू

सर्व राज्यातील लोकनृत्य आणि क्लासिकल नृत्य दर्शविणाऱ्या बाहुल्या, महाभारत, रामायण इत्यादी शास्त्रातील विविध प्रसंगानुरुप देखावे, लग्न समारंभातील देखावा, राधा-कृष्ण, गणपती, लक्ष्मी, दशाअवतार चक्र, इत्यादी अनेक गोष्टींच्या डिझाइन रमणी या स्वत: तयार करतात. ग्राहकांनी केलेल्या मागणीनुसार विविध प्रकारच्या बाहुल्या आणि देखावे तयार केले जात असल्याची माहिती रमणी यांनी दिली. 

तसेच, आंध्र आणि तेलंगना मध्ये साजरा केला जाणारा 'कोलू' सण तर तामिळनाडू मध्ये साजरा केला जाणारा 'गोलू' सण, हे दोन्ही सण म्हणजे आपल्याकडील नवरात्री प्रमाणे असते. या सणांमध्ये बाहुल्या तयार करण्याची सगळ्यात जास्त ऑर्डर मिळत असते. तसेच गणपती सजावट, क्रृष्णा जन्माष्टमी सजावट, गौरी महालक्ष्मी यासारख्या सणांच्या वेळी जास्त ऑर्डर मिळतात, असे देखील रमणी यांनी सांगितले.  नवीन संसद भवन (Central Vista) च्या उद्घाटनाप्रसंगी देखील रमणी यांच्या कलेला तेथे संधी देण्यात आली. विविध राज्यांच्या लोकनृत्याची झलक त्यांनी तेथे बाहुल्यांच्या रुपात सादर केली होती.

व्यवसायाचे मार्केटिंग

रमणी यांनी आपल्या कलेची आणि व्यवसायाची मार्केटिंग करण्याकरीता 'आर्टीफॅक्ट डॉट इन एक्झीबेशन्स' नावाने आपली एक वेबसाइट सुरु केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी प्रदर्शन आयोजित करुन आणि सोशल मिडीया, माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून रमणी आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करतात.