Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Successful Entrepreneur : नागपुरातील असद बनला बेस्ट ओझोन एअर प्यूरिफायर विक्रेता, प्रयत्नांना आले यश

Business Idea

Ozone Air Purifier : नागपूरातील असद हसन या युवकाने ओझोन एअर प्यूरिफायर, वॉटर सॉफ्टनर आणि ओझोन वॉटर प्यूरिफायर हे तीन उपकरणे विकण्यासाठी 2014 मध्ये नागपूर येथे 'के. एच. ओझोनेटर्स सिस्टम अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग' या नावाने एक कंपनी सुरू केली. आज या कंपनीचे वार्षिक उत्पन्न दीड कोटींच्या घरात आहे. जाणून घेऊया असद हसन यांच्याबद्दल सविस्तरपणे.

K.H. Ozonators Systems and Engineering Company : नागपुरातील हिस्लॉप कॉलेज मधून बी.कॉम ची पदवी घेतलेल्या असद हसनने 2012 पासुन वडिलांचे दुकान सांभाळणे, पार्ट टाईम जॉब करणे सुरु केले होते. त्यानंतर  2013 मध्ये  नातेवाईकांच्या कंपनीत काम करण्यासाठी तो अहमदाबाद येथे गेला. तेथे त्याने ओझोन एअर प्यूरिफायर आणि ओझोन वॉटर प्यूरिफायर कसे तयार करायचे? याचे प्रशिक्षण घेतले आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याबाबतचा आणखी जास्त अभ्यास केला.

स्वत:चा व्यवसाय केला सुरू

2014 मध्ये नागपुरात परत आल्यानंतर त्याने ‘के. एच. ओझोनेटर्स सिस्टम अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग’ नावाने ओझोन एअर प्यूरिफायर, वॉटर सॉफ्टनर आणि ओझोन वॉटर प्यूरिफायर ही तीन इलेक्ट्रिक उपकरणे विक्री करण्याचा स्वत:चा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याने वडिलांकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातून त्याने अहमदाबाद येथे प्रशिक्षण घेतलेल्या कंपनीने तयार केलेल्या तीन वेगवेगळ्या उपकरणांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 

उपकरणांची वैशिष्ट्ये काय?

यामधील वॉटर सॉफ्टनर हे बोअर वेल्सचे पाणी किंवा अती क्षार असलेले पाणी शुद्ध करण्यास मदत करते. ओझोन वॉटर प्यूरिफायर हे पाणी शुध्द करण्याबरोबरच त्यातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करते. तर तो विक्री करत असलेल्या ओझोन एअर प्यूरिफायर या तिसऱ्या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे उपरकरण वातावरणातील दूषितपणा, प्रदूषण, उग्र वास, बॅक्टेरिया कमी करण्याचे कार्य करते. त्याची तिन्ही उपकरणे आरोग्याशी निगडीत असल्याने त्याच्या विक्रीमध्ये चांगली वाढ होऊ लागली आणि व्यवसायात त्याचा जम बसायला सुरुवात झाली.

अभ्यास करण्याची जिद्द कायम

असद हसन याने ओझोन एअर प्यूरिफायरचे वाढती मागणी पाहून  ते नागपुरातील सरकारी हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, फूड कंपनी येथे विकण्यास सुरुवात केली. 2014 ते 2018 पर्यंत असदच्या कंपनीचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत पोहचले होते. त्यानंतर 2018 मध्ये कोविड सुरु झाल्यामुळे लॉक डाऊन लागल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परंतु त्याही काळात असद शांत बसला नाही. परिचयातील काही डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्याने कोविड विषाणूच्या संसर्गास प्रतिबंधात्मक उपययोजना करण्यासंदर्भातील आपले संशोधन सुरु ठेवले. भारतात पहिलं लॉकडाऊन लागले असतांना इतर काही देशात कोविड 19 वरील रिसर्च पेपर प्रसिद्ध केले जात होते. त्याचा असदने अभ्यास केला आणि त्याने आपल्या ओझोन एअर प्यूरिफायर मशीन मध्ये काही तांत्रिक बदल करुन ते कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपयोगी ठरेल अशा पद्धतीने सक्षम केले.

परदेशातही पाठविले एअर प्यूरिफायर

त्यानंतर असदने नागपूरातील एम्स हॉस्पिटल मध्ये टेस्टींग करिता ओझोन एअर प्यूरिफायरचे एक उपकरण दिले. या उपकरणाचे गुणवत्तापूर्ण कार्य बघून एम्स कडून असदला गुणवत्तेचे प्रमाणपत्र देण्यात आले. कोरोना काळात त्याने त्याच्या मशीनच्या उपयोगिते बाबत जनजागृती केली. 2019 ते 2021 या काळात त्याने नागपूर शहरातील अनेक टेस्टींग लॅब, पॅथॉलॉजी, रुग्णालये, इत्यादी ठिकाणी आपले मशीन विकले. एवढेच नाही तर दुबई येथे 2 आणि युएस येथे सुध्दा 2 मशीन पाठविण्यात आल्या. या माध्यमातून त्याला 20 लाख रुपयांचा नफा झाला. या मशीनची किंमत 35 हजार रुपयांपासुन सुरु होते.

सरकारी टेंडरही मिळू लागले

ओझोन एअर प्यूरिफायर मशीन प्रमाणेच असदच्या ओझोन वॉटर प्यूरिफायर मशीनला सुध्दा डिमांड आली आहे. याचे कारण असे की, चंद्रपूर महानगर पालिकेचा सिवेज ट्रिटमेंट प्लांट ऑपरेटरचा टेंडर त्याला मिळाला. यामधून त्याला प्रत्येक महिन्याला 6 लाख रुपये नफा मिळाला.

तर यावर्षी असदला नागपूर महानगर पालिकेतील मोक्षधाम आणि मानकापूर सिवेज ट्रिटमेंट प्लांट ऑपरेटरचा टेंडर मिळाला. याचा अर्थ असा की, नागपूर शहरातील नाग नदी आणि पिवळी नदी यामधील घाणेरडे पाणी अडवून त्याला प्यूरिफायरच्या माध्यमातून स्वच्छ करणे, दूषित पाण्याची क्वॉलिटी सुधारणे. क्वॉलिटी सुधारलेले दररोजचे 100 लाख लिटर पाणी हे शहरातील सरकारी गार्डन, सरकारी ग्राऊंड, रस्त्यावर लावलेली झाडे तसेच सरकारी बांधकाम येथे उपयोगात आणले जाते. 5 वर्षां करिता मिळालेल्या या टेंडर मधून असदला 3 कोटी 56 लाख रुपयांचा नफा होणार आहे.

वर्षाला कोटी रुपयांचे टर्न ओव्हर

असदने यावर्षी बँक ऑफ इंडिया मधून दहा लाख रुपयांचे मुद्रा लोन आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी घेतले आहे. तर त्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याला वर्षाला 1.5 कोटी रुपयांचा नफा होतो आहे. आपली जिद्द, चिकाटी, सतत नवीन काहीतरी शिकत राहण्याची वृत्ती आणि व्यवसायातील सातत्यपणा यामुळे असद आज यशाच्या शिखरावर पोहचला आहे.