Worm Manure: कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यापूढे दिसतात ती सर्वत्र पसरलेली नारळाची झाडे. 55 वर्षीय भाग्यश्री मुरकर या रत्नागिरीच्या मागलाडवाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी स्वत:चा व्यवसाय आणि आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाग्यश्री यांनी यशश्री नावाने महिला बचत गट सुरु केला. त्यानंतर त्यांनी पूरक उद्योगांना चालना मिळावी यासाठी श्री लक्ष्मी केशव उत्पादन महिला समूहाची स्थापना केली आणि येथूनच सुरु झाला भाग्यश्री यांचा व्यावसायिक म्हणून प्रवास.
Table of contents [Show]
नारळापासून झाडू निर्मिती
परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेता, भाग्यश्री यांनी गेल्या आठ वर्षांपासून नारळाच्या झावळ्यांपासून झाडू तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. हा एक झाडू 60 रुपयांना विकला जातो. वर्षाला 500 ते 600 झाडूंची विक्री त्या करतात. मुख्य म्हणजे हे सर्व झाडू त्या स्वत: हाताने तयार करतात.
'अशी' झाली सुरुवात
नारळाच्या झावळ्यांपासून झाडू तयार केल्यानंतर पाती वाया जात होती. त्यामुळे ती पाती वाया न जाऊ देता, त्यापासून गांडूळ खत निर्मितीची कल्पना भाग्यश्री यांना सुचली. यासाठी त्यांनी गांडूळ खत निर्मितीची अनुभव असलेल्या सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भुवड यांचे मार्गदर्शन घेतले.
काय आहे प्रक्रिया?
गांडूळ खत निर्मितीकरीता भाग्यश्री यांनी 12 बाय 4 फूट 1 आकाराच्या तीन टाक्या बांधल्या. त्यात गोठ्यात साठवलेले शेण गोळा केले. वाळलेल्या पानांचा एक थर आणि गांडूळ सोडले. काही दिवसानंतर त्यावर जीवामृत फवारणी केली. चार महिन्यानंतर हे खत पूर्णपणे तयार होते. पहिल्या वर्षाला भाग्यश्री यांच्या अथक परिश्रमातून 1 टन गांडूळ खताची निर्मिती झाली होती.
वर्षाला 5 टन खत निर्मिती
2020 पासून भाग्यश्री यांनी मोठ्या प्रमाणात गांडूळ निर्मिती करण्यास सुरुवात केली. दुसरी कडून शेण विकत आणण्याची गरज भासू नये, यासाठी त्यांनी घरीच गाई आणि म्हशी विकत घेतल्या. आता दरवर्षी घरीच 5 टन गांडूळ खताची निर्मिती केली जाते. टाकीत तयार झालेले गांडूळ खत बाहेर काढून त्याला वाळवून, चाळणीने गाळून मग त्याची पॅकिंग केली जाते.
नफा किती?
गांडूळ खत हे ठोक दरात विकायचे झाल्यास 15 रुपये किलो प्रमाणे विकल्या जाते आणि किरकोळ दरात 25 रुपये किलो प्रमाणे पॅकिंग करुन विकले जाते. वर्षाला 40 ते 50 हजार रुपयांचा नफा यामाध्यमातून भाग्यश्री यांना होतो.
पूरक व्यवसायाने दिला रोजगार
पूरक उद्योगांची क्षमता ओळखून भाग्यश्री यांनी झाडू, खत, दुध आणि कागदापासून निर्मित पत्रावळ असे उद्योग सुरु केले आहेत. यामाध्यमातून त्यांनी 3 महिलांना रोजगार दिला आहे. तर या सर्व पूरक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना वर्षाला लाखो रुपयांचा नफा होतो.