Organic Fertilizer: सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे फायदे लक्षात घेता अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याकडे वळत आहेत. यापैकी काही शेतकरी स्वत:च्या शेतीमध्येच सेंद्रिय खतांची निर्मिती करतात. तर इतर शेतकरी काही सेंद्रिय खते बाहेरुन खरेदी करतात. त्यातही द्रव स्वरुपातील सेंद्रिय खतांची मागणी प्रचंड वाढली आहे. या मागणीचा फायदा व्यावसायिकांना होतो आहे.
Table of contents [Show]
व्यवसायाची कास धरली
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सुशिक्षित व्यावसायिक कुलदीप चव्हाण यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्य करणे सुरु केले. यादरम्यान त्यांनी पाणी आणि शेतीचा विकास यासारख्या मुद्द्यांवर कार्य केले. इतर शेतकऱ्यांसाठी कार्य करीत असतांना त्यांच्यातील शेतकरी जागा झाला आणि कुलदीप यांनी शेतीसह सेंद्रिय खते विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
विविध खते आणि अर्क निर्मिती
2019 मध्ये त्यांनी 'धरतीधन जीवामृत कारखाना' या नावाने सेंद्रिय खते विक्रीचा व्यवसाय सुरु केला. याअंतर्गत जिवामृत, द्रव्य स्वरुपातील शेळी-मेंढी लेंढीचे खत, कोंबडीचे खत, गांढूळ खत, किचन वेस्ट पासून तयार केलेले खत यासारखे खते विक्री केली जातात. यासोबतच ठेचा अर्क, दशपर्णी अर्क, निम अर्क यासारखे अर्क देखील विक्री केल्या जाते. तसेच, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी लागणाऱ्या अॅमिनो अॅसिडची विक्री देखील धरतीधन जीवामृत कारखाना येथे केली जाते. हे अॅमिनो अॅसिड मेलेल्या मासोळ्यांपासून तयार केले जाते.
कसे तयार केले जातात अर्क?
दशपर्णी अर्क हा कडुनिंब, करंज, सीताफळ, जांभूळ, घाणेरी, टणटणी, धोतरा, निर्गुडी इत्यादी वनस्पतींसह गोमूत्राचा वापर करुन तयार केला जातो. तर ठेचा अर्क हा कांदा,लसून, आलं, हिरवी मिर्ची यासारख्या पदार्थांचा वापर करुन तयार केला जातो. निम अर्क हा निंबोळी आणि लिंबाचा पाला याचा वापर करुन तयार केला जातो.
वातावरण आणि विक्रीचा संबंध
सर्वप्रकारच्या द्रव्य सेंद्रिय खतांसह सर्वप्रकारचे अर्क देखील 20 रुपये लिटर प्रमाणे विकली जातात. तर कंपोस्ट खत 10 रुपये किलोप्रमाणे विक्री केल्या जाते. कुलदीप चव्हाण यांनी 3 लाख रुपयांची गुंतवणूक करुन 2019 मध्ये या व्यवसायाची सुरुवात केली होती. यामाध्यमातून त्यांना वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळतो. बऱ्याचदा मिळणारा नफा हा वातावरणावर देखील अवलंबून असतो. कारण पाऊस चांगला पडला, शेतीला पाणी उपलब्ध असलं की शेतकरी जास्त पिक घेतात. पाऊस आणि वातावरण योग्य नसलं की जास्त प्रमाणात पिक घेतल्या जात नाही. याचा परिणाम खत विक्रीवर होत असल्याचे कुलदीप यांनी सांगितले.
सेंद्रिय खताचे परिणाम
15 बाय 15 फुटामध्ये सुरु होणारा हा व्यवसाय नफा मिळवून देणारा आहे. सोबतच सेंद्रिय खतांचा सातत्याने वर्षानुवर्ष वापर केल्यास शेतीचा पोत सुधारतो. त्यामुळे पिके चांगली येतात आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. शिवाय सेंद्रिय खते ही मानवी शरीराकरीता धोकादायक नसल्याने भविष्यात याचा वापर वाढायला पाहिजे.