Women's Empowerment: काही तरी करायची आवड असणाऱ्यांना मन स्वस्थ बसू देत नाही. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे राहणाऱ्या नम्रता शाह यांना देखील कुकिंगची फार आवड आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आवडीला व्यावसायिक स्वरुप दिले. त्यातूनच त्यांनी 2006 मध्ये चार-पाच प्रशिक्षणार्थींना सोबत घेऊन नम्रता कुकिंग हब नावाने प्रशिक्षणाचे क्लासेस सुरु केले. यामाध्यमातून त्यांनी महिलांना वेगवेगळे विक्री योग्य पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आज आपण त्यांच्या यशस्वी कुकिंग प्रशिक्षण वर्गाची आणि महिलांना स्वावलंबी उद्योजिका बनवण्याच्या प्रवासाची माहिती जाणून घेऊ
Table of contents [Show]
विविध पदार्थांचे प्रशिक्षण
नम्रता यांच्या हाताची चव ओळखून त्यांनी तयार केलेल्या पदार्थांची चर्चा सर्वत्र होऊ लागली. हळूहळू हा व्यवसाय वाढू लागला आणि 2012 पासुन नम्रता कुकींग हब हे झपाट्याने प्रगती करु लागले. यामागे कारणही तसेच होते. नम्रता यांनी कुकिंग हब मध्ये दिले जाणारे प्रशिक्षण केवळ काही पदार्थांपूरते मर्यादित न ठेवता 2012 पासुन प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना व्हेरायटी देण्यास सुरुवात केली. यात जवळपास 50 प्रकारच्या आईस्क्रिम, विविध प्रांतातील पदार्थ, विविध प्रकारचे केक, चायनिज पदार्थ, पंजाबी भाज्या, थाय डिश, विविध स्विट्स, ट्रेडिशनल स्विट्स, सॅलेड, चॅट, मिल्क शेक, यासारखे अनेक पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी शिकायला आलेल्या महिलांना दिले. यातूनच त्यांना विक्री योग्य लोणचे तयार करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी ब्रज फूडस व्यवसायची मूहर्तमेढ रोवली.
जर्दाळूचे लोणचे खाते भाव
एकदा प्रशिक्षण घेणाऱ्याच काही मुलींनी नम्रता यांनी तयार केलेल्या लोणच्याची चव चाखली आणि मग काय सुरु झाला नम्रता यांचा ब्रज फूड्स चा प्रवास. सुरुवातीला अगदी पाच-दहा प्रकारची लोणची तयार करणाऱ्या नम्रता आता चक्क 100 प्रकारची लोणची तयार करतात. यामध्ये विविध प्रकारच्या फळभाज्यां पासुन तयार केलेले लोणचे ते ड्राय फ्रूट्स पासुन तयार केलेल्या लोणच्याचा देखील समावेश आहे. सध्या त्यांचे जर्दाळू पासुन तयार केलेले लोणचे प्रचंड भाव खाऊन जात आहे. या जर्दाळूच्या लोणच्याची किंमतही 1200 रुपये किलो आहे.
भारताबाहेरही ब्रज फूड्स पिकलचा जलवा
अर्थात 100 प्रकारची लोणची तयार करण्याचा प्रवास सोपा नव्हता, असे नम्रता सांगतात. नम्रता यांनी तयार केलेले लोणचे केवळ भारतातच नव्हे तर परदेशात राहणारे भारतीय सुध्दा फार चवीने खातात. ब्रज फूड्स पिकलच्या माध्यमातून नम्रता यांना वर्षाला एक ते दिड लाखाच्या घरात नफा होतो. नम्रता यांनी 2021 मध्ये चार दिवसीय लोणचे महोत्सवाचे आयोजन देखील केले होते. पुण्यात ब्रज फूड्स पिकल्सला खूप जास्त मागणी असल्याचे नम्रता आनंदाने सांगतात.
महिलांना मिळाला स्वयंरोजगार
सध्या नम्रता यांना त्यांच्या कार्यात मदत करण्यास 5 महिला आणि 2 पुरुष कर्मचारी आहेत. नम्रता यांनी आतापर्यंत 5 ते 6 हजार महिलांना प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामध्ये काही पुरुष देखील आहेत. यापैकी 3 हजार महिलांनी आणि काही तरुणांनी घेतलेल्या प्रशिक्षणाला उद्योगाचे स्वरुप दिलेले आहे. ज्या महिला आधी इतरांच्या घरी जाऊन घरकाम करायच्या आणि महिन्याला 700 ते 800 रुपये कमवायच्या, आज त्याच महिला केक आणि आईस्क्रिमचा व्यवसाय सुरु करुन महिन्याला 5 ते 7 हजार रुपये नफा मिळवतात असे नम्रता अभिमानाने सांगतात. तर अकोल्यातील काही तरुणांनी याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्व:तची बेकरी देखील सुरु केली.
कष्टाचे फळ मिळाले
कोरोना काळात दिल्या गेलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणाने देखील अनेकांना फायदा झाला. या प्रशिक्षण वर्गामध्ये केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला सहभागी झाल्या असल्याची माहिती नम्रता यांनी दिली. नम्रता कुकींग हबच्या माध्यमातून नम्रता यांना वर्षाला तीन ते चार लाख रुपयांचा नफा तर होतोच, शिवाय अनेकांच्या हाताला काम आणि रोजगारही उपलब्ध होतो. अशाप्रकारे 2006 मध्ये अवघ्या चार ते पाच प्रशिक्षणार्थी पासुन सुरु झालेली नम्रता कुकींग हबची वाटचाल आज हजारोंच्या संख्येत आहे. तर ब्रज फूडचे लोणचे छत्तीसगढ, हरीयाणा, दिल्ली, बँगलोर, गुजरात, मुंबई, युएस, रशिया, इत्यादी ठिकाणी नियमितपणे ऑर्डर केल्या जाते.