Items Made From Paithani Sarees: पैठणी म्हटलं की महाराष्ट्रातील स्त्रियांचा अगदी आवडीचा विषय. ही पैठणी आणि स्त्री हा विषय गुंफत नेत अनेक कवींनी यावर गाणी तयार केली आहेत. तर पैठणीचे बक्षीस दिले जाणारे टीव्ही वरील कार्यक्रम देखील भरपूर लोकप्रिय आहेत. तर अशा या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पैठणी पासुन विविध आकर्षक वस्तू तयार करुन विकण्याचं काम माऊली क्रिएशन्सच्या वतीने केले जाते.
Table of contents [Show]
कलेने धरली व्यवसायाची कास
कला जोपासण्याची सतत काही तरी वेगळं करण्याची आवड असलेल्या मृणाल दाणी आणि अस्मिता भुताड या दोघी चॉकलेट, सरबत, विविध खाद्यपदार्थ, केक तसेच बॉटलवर विविध आकर्षक अशा कलाकुसर करुन विकायच्या. परंतु स्वत: सगळ्यांपेक्षा आगळा वेगळा आणि आपली संस्कृती जपणारा असा एखादा व्यवसाय करावा, असे सतत त्यांना वाटत असे. यासाठी त्यांनी युट्युबवर अनेक गोष्टींचा शोध घेतला. त्यात त्यांना पैठणी पासुन विविध वस्तू तयार करण्याची कल्पणा सुचली. मग काय सुरु झाला माऊली क्रिएशन्सचा प्रवास.
कशी केली सुरुवात?
सुरवातीला कोणाकडून किंवा बँकेमधूनही कर्ज न घेता स्वत: जवळ सेव्हिंग केलेले प्रत्येकी 3 हजार रुपये अशी गुंतवणूक करुन मृणाल आणि अस्मिता यांनी आपला व्यवसाय सुरु केला. सर्वप्रथम त्यांनी एक पैठणी साडी विकत घेतली आणि त्याचे बटवे तयार करुन संक्रांतीला वाणात वाटले. येवला येथे जाऊन अख्खे मार्केट पिंजून काढले. तेथून काही पैठणी आणि पैठणी पासुन तयार केलेल्या काही वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर नातेवाईक आणि मैत्रिणी यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला. सद्यस्थितीत या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 500 ते 700 ग्राहक आहेत.
पैठणी पासुन निर्मित विविध वस्तू
आज माऊली क्रिएशनमध्ये बॅग्ज, पैठणी बटवा, क्लचेस, भिंतीला लावायच्या पैठणी कलाकुसरीच्या फ्रेम, कॉटन सिल्क आणि सिल्कच्या साडी, सेमी पैठणी, ओरिजनल पैठणी, डायरी, जॅकेट्स, दिवाळीत लावायचे आकाश कंदील, तोरण, पैठणी नथ क्लच, पैठणी हॅन्ड पर्स, राखी, गुडी वस्त्र, यासारख्या 400 रुपयांपासुन ते 22000 रुपयांपर्यंत विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहे.
परदेशातही ग्राहकांची पसंती
या सर्व वस्तूंचे मार्केटिंग सोशल मीडियाचा वापर करुन केले जाते. महाराष्ट्राप्रमाणेच, इतर राज्यात आणि परदेशात सुध्दा पैठणी पासुन तयार केलेल्या वस्तूंना मागणी आहे. तसेच अगदी लहान गावांपासुन ते मोठ्या शहरांपर्यंत 20 महिलांना रोजगार दिला गेला आहे. आतापर्यंत 20 महिलांनी माऊली क्रिएशन्स मधून पैठणी पासुन तयार केलेल्या विविध वस्तूंचा माल खरेदी करुन त्याची विक्री सुरु केलेली आहे.
टर्न ओव्हर किती?
सुरुवातीचे दोन वर्ष हा व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्वावर चालला. मात्र गेल्या दोन वर्षांपासुन 10 ते 12 लाख रुपये टर्न ओव्हर होत आहे. तर गेल्या चार ते पाच वर्षात 7 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच यावर्षी मृणाल आणि अस्मिता यांनी माऊली क्रिएशन्स करिता 5 लाख रुपयांचे मुद्रा लोन मिळाले आहे.