Foods Business: गेल्या काही वर्षापासून संपूर्ण मार्केटचा अर्धा हिस्सा हा फूड प्रॉडक्टसने व्यापला आहे. आधुनिक काळातील लोकांच्या गरजेनुसार मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी खाद्यपदार्थ उपलब्ध केले आहेत. रेडी टू कूक, रेडी टू इट, हवा बंद डब्यात पॅक केलेले फ्रोझन पदार्थ, विविध रंगाचे सॉसेस, परदेशी चवीचे पदार्थ, इत्यादी अनेक वेगवेगळी चव देणारे पदार्थ आजच्या पिढीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांचे मार्केट जोमात सुरु आहे. परंतु यामध्ये देखील टेस्ट आणि दर्जा या दोन गोष्टींवरुन ग्राहक व्यावसायिकांना स्विकारतो किंवा नाकारतो.
Table of contents [Show]
अनुभवातून केला व्यवसाय सुरु
सातारा जिल्ह्यातील रवींद्र धनावडे आणि त्यांच्या पत्नी सुनिता या दोघांचे शिक्षण बीएससी मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध फूड कंपनीमध्ये 20 वर्ष नोकरी करीत ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. विविध फूड कंपन्यांमध्ये काम करीत असतांना रवींद्र यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सुचली. यासाठी त्यांनी वाई येथे जमीन घेतली. येथे सेटअप उभारुन 2017 साली स्वत:चा व्यवसाय सुरु केला.
2019 ला एमएएम फुड्स श्रीगणेशा
रवींद्र आणि सुनिता धनावडे या दांपत्याकडे अनुभव असुन सुद्धा त्यांनी अतिशय विचार करुन एक एक पाऊल उचलले. 2017 पासून एक ते दीड वर्ष रवींद्र यांनी स्वत:चा ब्रँड न सुरु करता दुसऱ्या ब्रँडसाठी माल तयार करुन आधी लोकांचा कल आणि आपण तयार करीत असलेल्या पदार्थांच्या चवीबाबतचे मत जाणून घेतले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी एमएएम फुड्स नावाने कंपनी सुरु केली. त्यानंतर उत्पादने, पॅकिंग आणि ब्रॅण्डिंग याकडे पूर्णपणे फोकस करणे सुरु केले. या कंपनीमध्ये आतापर्यंत एकूण 45 लाखाची गुंतवणूक करण्यात आली आहे. तर जवळपास 8 नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
35 पेक्षा अधिक प्रॉडक्टची विक्री
एमएएम फुड्स कंपनीमध्ये एकूण 35 पेक्षा जास्त प्रॉडक्ट विक्रीकरीता उपलब्ध आहेत. त्यामध्ये 15 प्रकारच्या भाज्या तयार करण्याचे रेडी टू कूक मसाले, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, पिझ्झा सॉस, मिर्ची ठेचा, विविध चटण्या, पाणीपूरी मसाला, आवळा कँडी, पाच ते सात प्रकारचे लोणचे, नॉनव्हेज भाज्यांचा मसाला, स्टारटर मसाला, इत्यादी प्रॉडक्ट विक्री करीता उपलब्ध आहेत. या प्रॉडक्टचे दर 25 रुपयांपासून ते 400 रुपये किंमती पर्यंत आहेत.
केंद्र सरकारच्या योजनेचा घेतला लाभ
रवींद्र धनावडे यांनी 2021 मध्ये (PMFME) मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेसचे प्रधान मंत्री योजनेअंतर्गत साडे नऊ लाखाचे कर्ज घेतले आणि त्यामाध्यमातून 3 मशीन विकत घेतल्या. रवींद्र यांनी आपली आर्थिक क्षमता, भांडवल, मनुष्यबळ, इत्यादी गोष्टी लक्षात घेता विविध प्रॉडक्टची निर्मिती केली. आता हा व्यवसाय इतका प्रचंड वाढला की, जागा कमी पडू लागली आहे, असे रवींद्र धनावडे सांगतात.
असे केले मार्केटिंग
विविध प्रॉडक्टचे मार्केटिंग करण्याकरीता रवींद्र यांनी विविध ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले. यामाध्यमातून वितरकांचा संपर्क वाढला. एमएएम फुड्स कंपनीचा 80 % माल हा सातारा जिल्ह्यात विक्री होतो. तर 20 % माल हा पुणे,मुंबई, बारामती याठिकाणी विक्री केला जातो. एमएएम फुड्स कंपनीचे वार्षीक टर्न ओव्हर 12 लाख रुपये आहे. तर येत्या पाच वर्षांमध्ये हे टर्न ओव्हर 5 कोटी रुपये पर्यंत नेण्याचा रवींद्र यांचा मानस आहे.