Bora Fruit Products: कोण, कधी, कशाचा व्यवसाय करेल हे सांगता येत नाही. तुम्ही लहान असताना सगळ्यांनीच बोरं खाल्ली असावी. जिभेला आंबट-गोड अशी चव देणारे हे बोर नावाचे फळ अनेकदा तुमच्या घरच्या अंगणातल्या झाडाला देखील तुम्ही बघितले असणार. ही बोरं अनेक ठिकाणी तसेच चौपाटीवर देखील विक्री करीता उपलब्ध असतात. आजपासून 30 वर्षांपूर्वीचा विचार केल्यास आधी हे फळ सगळेच खायचे. तसेच बोरापासून तयार बोरकुट, उकळलेली बोरं, बोरकुटच्या गोळ्या, इत्यादी अनेक गोष्टी कोणत्याही दुकानात सहज विक्रीस उपलब्ध असे. मात्र जसजसा काळ बदलत गेला, लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. परदेशी जंक फूडच्या नादात स्वदेशी सुपर फूड मागे पडत गेले. परंतु, आताही स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणारे आणि बोरांपासून तयार करणारे पदार्थ खाणारे अनेक नागरिक आहेत. त्यामुळेच आजही 'मल्हार अॅग्रो फूड प्रॉडक्ट'ची (Malhar Agro Food Products) उलाढाल लाखोंच्या घरात आहे.
Table of contents [Show]
कशी झाली व्यवसायास सुरुवात?
नागपूर शहरात राहणाऱ्या प्रीती धानोरकर यांच्यासह त्यांच्या पतीकडे देखील 1990 साली कुठलेही काम नव्हते. घरखर्च कसा चालवायचा या विवंचनेत असतांना धानोरकर दांपत्यांनी बाजारात तसेच सायकलवर शहारामध्ये फिरुन बोरं विकण्यास सुरुवात केली. त्याचसोबत उकळलेली बोरांची विक्री करीत उदरनिर्वाह करणे सुरु केले.
विविध पदार्थांची निर्मिती
चार ते पाच वर्ष प्रचंड मेहनत केल्यानंतर त्यांना बोरांपासून विविध पदार्थ तयार करण्याची युक्ती सुचली. त्यासाठी त्यांनी अनेकांची भेट घेतली. बोरांपासून विविध पदार्थ कसे तयार करतात? याचा अभ्यास केला. घरी अनेक प्रयोग करुन बघितले. आधी दीर्घकाळ टिकणारे उकळलेले बोरं हवाबंद डब्यात भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर बोरांची बर्फी, चॉकलेट, सरबत, लॉलीपॉप, खजूर-बोर जॅम, लॉलीपॉप, यासह जवळपास 15 विविध पदार्थ विक्री करीता उपलब्ध झालेत.
कंपनीची यशस्वी वाटचाल
आज प्रीती धानोरकर यांच्याकडे 5 रुपयापासून ते 100 रुपयांपर्यंतचे बोरांपासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ विक्रीस उपलब्ध आहे. तसेच विविध पदार्थांसह सुरु केलेल्या गृह उद्योगाचे रुपांतर आज 'मल्हार अॅग्रो फूड प्रॉडक्ट' (Malhar Agro Food Products) कंपनीमध्ये झालेले आहे. नागपूर शहरातील हिंगणा एमआयडीसी स्थित ही कंपनी आहे. 2020 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. आज या कंपनीचे वार्षिक टर्न ओव्हर 25 ते 30 लाख रुपये आहे. तसेच आज यामुळे 7 ते 10 नागरिकांना यामाध्यमातून रोजगार देण्यात आला आहे.
कशी केली जाते मार्केटिंग?
सध्या संपूर्ण विदर्भ, आंध्र प्रदेश, एमपी, छत्तीसगड येथे नियमितपणे या पदार्थांची मार्केटिंग केली जाते. तर छत्तीसगड मधील अनेक गावांमधूनच संपूर्ण पदार्थ तयार करण्याकरीता बोरं मागवली जातात. त्याचप्रमाणे माउथ पब्लिसिटीसह इ कॉमर्स वेबसाइटद्वारे देखील या पदार्थांची विक्री केली जाते. सोबतच अनेक प्रदर्शन मध्ये स्टॉल लावून सुद्धा विक्री केली जाते.