Flour Mill Business: एका घरात शेतीची हिस्सेदारी घेणारे अनेक वाटेदार असले की, अत्यल्प अशी शेत जमीन अनेकांच्या वाट्याला येते. मग मिळालेल्या दोन ते तीन एकर जमीनीवर कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? असा प्रश्न उभा राहतो. मात्र, मिळालेल्या कमी जागेवरही सोनं पिकवणारे अनेक कष्टकरी लोक असतात. जे आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून मेहनतीने अल्पावधीतच यशाकडे वाटचाल करतात.
Table of contents [Show]
शेतीला पूरक व्यवसायाचा शोध
पारशिवणी तालुक्याच्या निंबा गावात राहणारे दोघे उद्योजक भाऊ म्हणजे राकेश आणि प्रमोद भक्ते हे होय. तांदूळ, तूर, सोयाबिन, कपाशी, गहू, हरभरा, संत्री, भाजीपाला, इत्यादी पिकांचे उत्पादन पारशिवणी निंबा या गावात घेतले जाते. परंतु, भक्ते कुटुंबियांकडे केवळ तीन एकर जमीन आहे. त्यामध्ये ते अर्धा एकर मध्ये तांदूळ, एक एकर मध्ये कापूस आणि एक एकर मध्ये संत्रा पीक घेतात. तसेच या संत्र्याच्या बागेत तुरीचे आंतरपीक देखील घेतले जाते. परंतु एवढ्याशा शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने शेतीला पूरक असा एखादा उद्योग सुरु करण्याचा निर्णय राकेश आणि प्रमोद या दोन भावांनी मिळून घेतला.
ग्राहकांची गरज ओळखणे
भक्ते कुटुंबात पाच लोक राहतात. प्रमोद भक्ते यांनी कृषी क्षेत्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, शेती कमी असल्याची खंत त्यांना नेहमी वाटत असे. केवळ 3 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने, शेतीला जोडधंदा म्हणून राकेश आणि प्रमोद यांनी दोन वर्षांपूर्वी पीठगिरणी सुरु केली. त्यानंतर काही दिवसांमध्येच हळद आणि मिरची कांडप यंत्र सुरु केले. गावातील लोकांची गरज लक्षात घेऊन पीठगिरणीवर तयार केलेले रेडिमेड बेसन देखील विकले जाऊ लागले. ग्राहकांच्या मागणी प्रमाणे गव्हाचे पीठ, बेसन, तांदळाचे आणि ज्वारीचे पीठ, तिखट तसेच मसाले, इत्यादी सर्वगोष्टी दिल्या जाऊ लागल्याने भक्ते कुटुंबियाच्या या व्यवसायाची अल्पावधीतच भरभराट झाली.
गुंतवणूक आणि अनुदान
यासोबतच, राकेश भक्ते यांनी मिनी डाळ संयंत्र बसविले. सोबतच गव्हासारख्या धान्याची प्रतवारी करणारे आणि सफाईची यंत्रे बसविली. हा संपूर्ण उद्योग उभारण्यास 10 लाख रुपये खर्च आला. यासाठी भक्ते कुटुंबियांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि अनुदान अंतर्गत 2 लाख रुपयांचा लाभ घेतला.
मार्केटिंग करण्यास माध्यम शोधले
राकेश आणि प्रमोद यांनी आपला व्यवसाय वाढविण्याकरीता वेगवेगळे प्रयोग करणे सुरु केले. तूर दाळ तयार करण्याआधी त्यावर पाणी मारुन ती वाळवावी लागते. परंतु, आजकाल शेतकऱ्यांकडे वेळ नसल्याने जास्तीचे पैसे घेऊन ही सेवा पूरविणे देखील भक्ते कुटुंबियांनी सुरु केले. सोबतच अनेक हॉटेल व्यावसायिकांना गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठाची विक्री सुरु केली. अतिशय चांगला दर्जाचे गव्हाचे पीठ हॉटेल मालकांना दिले जात असल्याने हॉटेल व्यावसायिकांची मागणी वाढू लागली. वर्षाला जवळपास 35 क्विंटल गव्हाच्या पिठाची विक्री हॉटेलमालकांना केली जाते. गव्हाच्या पिठासोबतच तूरदाळ, मसाले, तिखट या पदार्थांची मार्केटिंग देखील केली जाते.
लाखो रुपयांचा नफा
गव्हाचे पीठ, बेसन, मसाले, तिखट, तूरडाळ, गहू सफाई, हरभरा तसेच तूर, मूग, चवळी यांची सफाई आणि विक्री या सर्व उद्योगामधून राकेश आणि प्रमोद भक्ते यांना पहिल्याच वर्षी संपूर्ण कर्ज फेडून 5 लाख रुपयांचा नफा झाला होता. तर गेल्या वर्षी हा नफा 12 लाख रुपये एवढा होता. या उद्योगाच्या माध्यमातून प्रमोद भक्ते यांनी आणखी 2 लोकांना रोजगार दिला आहे. तसेच गेल्या वर्षी प्रमोद यांना संत्र्याच्या एक एकर बागेमधून 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हे उत्पन्न कमी होण्याची शक्यता प्रमोद यांनी व्यक्त केली.
ज्या शेतकऱ्यांकडे शेतीचा पट्टा कमी आहे. त्यांनी हताश न होता, शेतीच्या सोबतीला जोडधंदा करायला पाहिजे, असा सल्ला प्रमोद भक्ते यांनी दिला.