Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून करू शकतात 'हे' 3 व्यवसाय; होईल बक्कळ कमाई!

Business Idea

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Business Idea: शेतीसोबत जोडधंदा (Side Business) करून शेतकरी जास्तीचा नफा कमवू शकतात. कमी गुंतवणुकीत देखील व्यवसाय करता येतात. ज्याला सरकारकडून अनुदान (Subsidy) देखील मिळते. कोणते आहेत ते व्यवसाय, जाणून घेऊयात.

भारताला वर्षानुवर्ष कृषिप्रधान (Agriculture) देश म्हणून ओळखले जाते. आजही भारतातील जवळपास 65 टक्के लोक शेती करतात. सरकारकडून अनेक सरकारी योजना (Govt. Schemes for Farmer) शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. शेतीशी निगडित जोडधंदा करून शेतकरी दुप्पट कमाई करू शकतात. त्यातून त्यांना अधिक उत्पन्न तर मिळेलच, सोबत दुसरा उत्पन्नाचा मार्ग देखील सुरू होईल. शेती सांभाळून शेतकरी कोणता जोडधंदा (Side Business) करू शकतात, जाणून घेऊयात.

पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय (Animal Husbandry and Dairying)

शेतकरी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे पाहतात. सध्या लोकसंख्या प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्या दुग्ध व्यवसायात कार्यरत आहेत. अगदी 2 जनावरांपासून सुद्धा हा व्यवसाय सुरू करता येतो.

शेती करत असल्याने शेतकऱ्याला शेतीतून जनावरांसाठी हिरवा चारा मिळतो. ज्यामुळे चाऱ्यावरील अतिरिक्त खर्च कमी होण्यासाठी मदत होते. दोन गाईंपासून जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर किमान 2 लाख रुपये तुम्हाला या व्यवसायात गुंतवावे लागतील. या गाईंचे दुध डेअरीला घालून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. जसजसे दूध वाढेल तसे तुमचे उत्पन्न देखील वाढायला मदत होईल. त्याशिवाय गायीच्या शेणाचा वापर शेतात खत म्हणून करता येतो. 

पिठाच्या गिरणीचा व्यवसाय (Flour Mill Business)

तुम्ही घरबसल्या पिठाच्या गिरणीचा व्यवसाय (Flour Mill Business) सुरू करू शकता. आपल्या दैनंदिन आहारात भाकरी, चपाती, पोळीचा समावेश असतो. या सर्व गोष्टी बनविण्यासाठी पिठाची आवश्यकता असते. हे पीठ आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा दळून आणले जाते. शहरात हल्ली धान्य विकत घेण्याऐवजी तयार पीठ विकत घेतले जाते. त्यामुळे तुम्ही धान्य दळून पिठाचे पॅकिंग करून त्याची विक्री करू शकता आणि त्यातून दुप्पट नफा कमवू शकता.

या व्यवसायासाठी तुम्हाला किमान 100 स्के. फुटाच्या जागेची गरज आहे. ज्वारी, गहू दळण्यासाठी एकाच गिरणीचा वापर केला जातो. तर भाताचे कांडप करण्यासाठी वेगळी गिरण असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 1 ते 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business)

मांस आणि अंड्यांची मागणी दिवसागणिक वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी शेती सोबत पोल्ट्रीचा (Poultry Business) व्यवसाय सुरू करू शकतात. याच पोल्ट्रीतून मिळालेली विष्ठा शेतात खत म्हणून वापरता येते. सरकारकडून पोल्ट्रीच्या व्यवसायासाठी अनुदान देखील दिले जाते. या व्यवसायासाठी जागेची गरज असून शेतकऱ्याला कमी व्याजदरात बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयांची गरज असते. पोल्ट्रीतील अंड्यांची विक्री करून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. 

Source: hindi.news18.com