Cotton Seed Cake: महिला म्हटलं की, पापड, लोणची, गृहउपयोगी वस्तू, इत्यादी संबंधित गृहउद्योग करतांना आपण बघतो. परंतु, काही तरी वेगळं करणाऱ्या करीता महिला आता पूढे येऊ लागल्या आहेत. जसे की, सेंद्रिय पद्धतीने शेती करुन लाखोंचे उत्पन्न घेणाऱ्या, सेंद्रिय पदार्थांचा ब्रँड तयार करुन विकणाऱ्या देखील महिला आहेत. अशाचप्रकारे आपल्या गावातील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यानुसार व्यवसाय उभा करणारी उद्योजिका म्हणजे जळगावच्या रेल येथील रुपाली चंद्रकांत पाटील होय.
Table of contents [Show]
गरज ओळखून सुरु केला व्यवसाय
जळगाव जिल्ह्यातील रेल येथे अनेक शेतकऱ्यांकडे दुभती जनावरे आहेत. तसेच या जिल्ह्यात कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे होत असल्याने येथील जिनिंगवर सरकी उपलब्ध असते. याच सर्व गोष्टींचे निरिक्षण करुन रुपाली यांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरविले. सरकी विकत घेऊन त्यांनी त्यापासून जनावरांकरीता उत्तम दर्जाची ढेप तयार करण्यास दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. 'बळीराज कॉटन केक' असे त्यांच्या कारखान्याचे नाव आहे.
कसा मिळतो सरकारी योजनांचा लाभ?
12 वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या रुपाली यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. सरकी तेल आणि ढेप तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्यास 20 ते 25 लाखाचे भांडवल लागतं. अशाप्रकारच्या व्यवसायाला सरकारच्या सुक्ष्म अन्न प्रक्रीया योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांपासून ते 3 कोटी पर्यंत 8.60 % व्याजदराने कर्ज उपलब्ध होत असते. तसेच अशाप्रकारच्या व्यवसायकरीता राज्य सरकार कडून एकूण 35 % किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे आत्मा योजनेअंतर्गत तालुका पातळीवर देखील विशेष अनुदान दिले जाते. मात्र यासाठी समूहाने कार्य करण्याची गरज असते.
कसा सुरु केला व्यवसाय?
रुपाली यांनी सरकारच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 10 लाखाचे कर्ज घेतले, त्यामध्ये त्यांना 3 लाख रुपयांची सबसिडी मिळाली. तर इतर कर्ज जिल्हा उद्योग केंद्र आणि खासगी बँकेकडूनही घेतले. जिल्हा उद्योग केंद्राकडून देखील अनुदान मिळाल्याने त्याअंतर्गत वीज जोडणी करुन देण्याचे कार्य शासनाच्या वतीनेच करुन देण्यात आले. व्यवसाय सुरु करण्यासाठी रुपाली यांनी 1 हजार स्केवअर फूट जागेमध्ये शेड टाकले. त्यामध्ये तेल काढण्याचा घाणा आणि तेल फिल्टर करण्याची मशीन अशा दोन मशीन बसविल्या.
सरकीपासून मिळणारे उत्पादन
तेल घाण्यातून सरकीचे तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सरसोंचे तेल, तीळाचे तेल काढले जाते. परंतु, रुपाली या केवळ सरकीचे क्रूड ऑइल काढून उरलेल्या सरकीच्या चोथ्यापासून जनावरांकरीता ढेप तयार करतात. ही ढेप 32 ते 35 रुपये किलोदरम्यान बाजारभावाप्रमाणे विकली जाते.
क्रूड ऑइल विकून मिळतो नफा
सरकीचे क्रूड ऑइल हे कॉटन जिनिंग प्रेस मध्ये विकले जाते. रुपाली हे क्रूड ऑइल कुठल्याही प्रकारचे फिल्टर न करता विकतात. या सरकी क्रूड ऑइलचा बाजारभाव सध्यस्थितीत 83 रुपये किलो आहे. तर फिल्टर केलेल्या सरकी ऑइलचा बाजारभाव 93 ते 95 रुपये किलो आहे आणि रिफाइन्ड केलेल्या सरकी ऑइलचा बाजारभाव 115 रुपये किलो आहे. सरकी तेलाची मागणी प्रचंड आहे. कारण हे तेल रिफाइन्ड खाद्य पदार्थामध्ये मिक्स केले जाते, अशी माहिती रुपाली पाटील यांनी दिली.
नफा देणारा व्यवसाय
रुपाली पाटील यांच्या 'बळीराज कॉटन केक' मध्ये तयार केल्या जाणाऱ्या ढेपेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असल्याने त्यांच्या कारखान्यातील ढेपेला प्रचंड मागणी आहे. गेल्या दोन वर्षात रुपाली यांनी त्यांच्यावर असलेले 23 ते 25 लाखांचे संपूर्ण कर्ज फेडले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून रुपाली यांना वर्षाला 12 ते 15 लाख रुपयांचा नफा होत असल्याचे रुपाली यांनी सांगितले.