Business Training : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध योजना राबवल्या जातात. यासाठी केंद्र सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय राज्य सरकारला फंड उपलब्ध करुन देते. राज्य सरकार यासाठी निवडलेल्या जिल्ह्यातील यंत्रनेला हे फंड पुरविते. मग ती यंत्रणा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला विविध अॅक्टिव्हिटी राबविण्याकरीता फंड उपलब्ध करुन देते. त्यानंतर महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सारख्या संस्था विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करुन युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यास मार्गदर्शन करण्याचे कार्य करते.
हजारो प्रशिक्षणार्थींनी घेतला लाभ
नागपूर स्थित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमध्ये वर्षभरात जवळपास 29 प्रकारचे प्रशिक्षण आणि सोबत सर्टिफिकेट प्रशिक्षणार्थींना दिले जाते. यासाठी प्रशिक्षणार्थींची वयोमर्यादा 18 ते 45 वर्षाअंतर्गत असायला हवी. तसेच त्यांनी कमीत कमी 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे. हे संपूर्ण प्रशिक्षण विनामुल्य दिले जाते. या सोबतच बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील संस्थेच्या वतीने केली जाते. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून हजारो प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी किमान शेकडो प्रशिक्षणार्थींनी आपला व्यवसाय सुरु केला आहे.
कर्ज काढून केला व्यवसाय सुरु
नागपूर स्थित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीपैकी एक म्हणजे कुही येथे राहणाऱ्या रजनी चकधरे होय. रजनी या सुकन्या बचत गटामध्ये सीआरपी म्हणून देखील कार्यरत आहे. बीकॉमचे प्रशिक्षण घेतलेल्या 42 वर्षीय रजनी यांनी 2022 मध्ये महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमधून घाणीचे तेल काढण्याचे 10 दिवसाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रामधून 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले. याअंतर्गत त्यांना 35% अनुदान मिळाले.
मार्केटिंग आणि नफा
रजनी चकधरे यांनी ऑईल काढण्याची आणि फिल्टर करण्याची मशीन खरेदी करीत घरीच 1000 स्क्वेअर फिट जागेमध्ये संपूर्ण व्यवसाय स्थापन केला. या व्यवसायात त्यांनी एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली. रजनी या स्वत: यामध्ये तीळाचे तेल 300 रुपये लीटर, सरसोंचे तेल 300 रुपये लीटर, जवसाचे तेल 300 रुपये लीटर आणि फल्लीचे तेल 310 रुपये लीटर प्रमाणे विक्री करतात. तसेच या सर्व प्रकारच्या तेलाची 50, 100, 200, 500 आणि 1 लीटर याप्रमाणे पॅकिंग केली जाते.
यासर्व प्रकरच्या तेलाची मार्केटींग सोशल मिडीया, फोन द्वारे तसेच अनेक मेडिकल शॉप मध्ये केली जाते. रजनी यांना या व्यवसायाच्या माध्यमातून गेल्या दिड वर्षात त्यांना 2 ते 3 लाखाचा नफा झालेला आहे. तसेच त्यांनी 3 महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे.