Bamboo Made Goods: आज राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमेच्या पर्वावर राख्यांना प्रचंड मागणी असते. या सिझन मध्ये मार्केट मध्ये कोटी रुपयांची उलाढाल होत असते. प्रत्येक ग्राहक या सणासाठी आगळी-वेगळी राखी खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाच काही इतर सर्व राख्यांपेक्षा वेगळ्या बांबू पासुन तयार केलेल्या राख्या चंद्रपूर येथे तयार केल्या जातात. या राख्यांना केवळ भारतातच नव्हे तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Table of contents [Show]
50 रुपयांच्या गुंतवणुकीने वाढविले मनोबल
छंद म्हणून जोपासलेला व्यवसाय संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल, असा विचार मीनाक्षी वाळके यांनी कधीच केला नसावा. मीनाक्षी यांनी पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर येथील बांबू रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटर येथे 70 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. तोपर्यंत त्या छंद म्हणून प्लायवुड पासुन तयार केलेल्या शोभेच्या वस्तू तयार करुन विकत असे. बांबू पासुन तयार करायच्या वस्तूंचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 50 रुपयांचा एक बांबू विकत आणला आणि काही वस्तू तयार करुन त्या नागपूर येथील एका प्रदर्शन मध्ये विकायला आणल्यात. तिथे त्या वस्तुंना प्रचंड मागणी मिळाली.
कशी झाली सुरुवात?
बी.एस.सी. चे शिक्षण अर्धवट सोडलेल्या मीनाक्षी यांनी बांबूच्या वस्तूची मागणी बघून व्यवसाय करण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी येणाऱ्या दिवाळी करीता 30 ते 35 आकाश कंदील तयार केले आणि त्या आकाश कंदीलचे फोटो सोशल मिडीयावर पाठविले. बघता बघता संपूर्ण आकाश कंदील विकल्या गेले. त्यानंतर काही दिवसांनी (2019) दिल्ली येथे होणाऱ्या मिस क्लायमेट फॅशन शो मध्ये बांबू पासुन 16 मुकुट (Crown) तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली. त्यावेळी त्या एकट्याच दररोज 2 मुकुट तयार करीत असे. जगात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ब्यूटी कॉन्टेस्ट करीता बांबू पासुन तयार केलेले मुकुट वापरण्यात आले होते. त्यामुळे स्पर्धा झाल्यानंतर दिल्ली येथे स्टेजवर बोलावून मीनाक्षी यांचा सत्कार करण्यात आला.
विविध आकर्षक वस्तू
मिनाक्षी यांनी गेल्या पाच वर्षात जवळपास 1500 महिलांना प्रशिक्षण दिले आहे. तर 30 ते 35 महिलांना रोजगार दिलेला आहे. आज त्यांच्या कडे बांबू पासुन तयार केलेल्या 100 ते 150 वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये बास्केट्स, फोल्डिंग लॅम्प, आकाशदिवे, कँडल स्टॅण्ड, फ्रेंडशिप बँड, ज्वेलरी, बॉटल्स, की-चेन, फुलदाणी, पूजा थाळी, मुर्त्या, तोरण, पताका, ताट, वाटी, चमचे, गिफ्ट बॉक्स, इत्यादी अनेक आकर्षक वस्तू विक्रीस उपलब्ध आहे. या वस्तूंची किंमत 20 रुपयांपासुन ते 5 हजार रुपयांपर्यंत आहे.
राखींची विक्री सातासमुद्रापार
महत्वाचे म्हणजे बांबू पासुन तयार करण्यात येणाऱ्या राखी खूप प्रसिध्द आहे. 2020 मध्ये मीनाक्षी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वत: तयार केलेली राखी पाठविली होती. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतात या राख्यांना प्रचंड मागणी आहे. तसेच स्विझरलँड, लंडन, युरोप, फ्रान्स, स्विडन, यासारख्या देशांमध्ये देखील राख्या पाठविल्या जातात. या राखींची किंमत 20 रुपयांपासुन ते 50 रुपयांपर्यंत आहे. या बांबू व्यावसायाचे संपूर्ण मार्केटिंगचे काम मीनाक्षी यांचे पती मुकेश वाळके बघतात. ते आधी वृत्तपत्रात खाजगी नोकरी करायचे आता पूर्णवेळ स्वत:चा व्यवसाय बघतात. केवळ राखी सणामध्ये या दाम्पत्याला 3 ते 4 लाखांचा नफा होतो. तर वर्षभर प्रदर्शन लावून आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून विक्री केल्याने वर्षाला 7 ते 8 लाख रुपयांचा नफा त्यांना होतो.
तर यावर्षी राखी सणाच्या सिझन एकूण 20 हजार राख्यांची विक्री करण्यात आली. यामध्ये 12 रुपये किमती पासुन 50 रुपये पर्यंतच्या राखी विकल्या गेल्या. तर यावर्षी 4 लाख रुपयांच्या वर राखी विक्रीचा नफा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मीनाक्षी यांनी दिली.
देशविदेशात वस्तूंना मागणी
मीनाक्षी यांनी तयार केलेल्या बांबूच्या शोपीसने देशाविदेशातील घरांची आणि सरकारी वास्तुंची शान वाढवली आहे. प्लास्टीकला उत्तम पर्याय असलेला, टिकाऊ आणि स्वदेशी बांबूंच्या कलाकुसरीच्या वस्तुंमुळे केवळ वाळके दाम्पत्याचीच नव्हे, तर हाताला काम मिळाल्याने अनेक आदिवासी महिलांची देखील प्रगती झाली आहे. कारण बांबू पासुन तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंना केवळ भारतातच नव्हे तर विदेशात देखील प्रचंड मागणी आहे.