Pulp Making Business: पुणे-सासवडच्या मार्गावर असलेले झेंडेवाडी हे अडीच ते तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात अंजीर, सीताफळ, चिक्कू याप्रमाणे इतरही फळांचे उत्पादन घेतले जाते. या गावातील महिला अत्यंत प्रयोगशील आहेत. 20 महिलांनी मिळून पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर नावाने एक कंपनी उभी केली आहे.
Table of contents [Show]
बचत गट ते कंपनी असा प्रवास
2014 मध्ये 20 महिलांनी एकत्र येत पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला बचत गटाची स्थापना केली. 2019 मध्ये नाबार्डच्या वतीने गावातील दीडशे महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण दिल्या गेलं. त्यामध्ये पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला बचत गटाच्या महिलांचा देखील सहभाग होता. प्रशिक्षण घेतल्यानंतर या 20 महिलांनी एक कंपनी सुरु करण्याचा निश्चय केला. 2020 मध्ये 14 शेअर होल्डरला सोबत घेऊन या महिलांनी, पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली.
विक्री केले जाणारे पदार्थ
पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनी मध्ये सिताफळ, चिकू, स्ट्रॉबेरी, पेरु, आंबा आणि अंजीर या फळांचा पल्प (गर) काढून त्यावर प्रक्रिया करुन विक्री केला जातो. तसेच, बिन्स, मका, वाटाणा फ्रोझन करुन विक्री केले जातात. भविष्यात सर्व प्रकारच्या फळांच्या आईस्क्रीमचे उत्पादन देखील या कंपनीतर्फे घेतले जाणार आहे.
पल्प तयार करण्याची प्रक्रिया
सिताफळ, चिकू, स्ट्रॉबेरी, पेरु, आंबा आणि अंजीर या फळांचा गर काढून त्यात प्रिझर्व्हेटिव्ह टाकून नंतर त्याला कडक होण्यासाठी संपूर्ण एक दिवस कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्या जाते. त्यानंतर त्याला फ्रिझ मध्ये साठवून ठेवल्या जाते. हा साठवून ठेवलेला पल्प 1 वर्ष टिकतो.
ग्रेड नुसार वर्गवारी
सर्व प्रकारच्या फळ्यांच्या पल्पची वर्गवारी ग्रेड नुसार केली जाते. 'अ' ग्रेडच्या पल्प पासून रबडी आणि कुल्फी तयार केली जाते. तर 'ब' ग्रेडच्या पल्पचा वापर आईस्क्रीम तयार करण्यास केला जातो, अशी माहिती या उद्योजिका महिलांनी दिली.
मोठ्या प्रमाणात घेतले जाते उत्पादन
पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनी करीता लागणाऱ्या फळांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जसे की, अंजीर 300 एकर, सिताफळ 700 ते 800 एकर आणि चिक्कू 50 एकर मध्ये उत्पादन घेतले जाते. वटाणा हा गावातल्या शेतीतच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. तर स्ट्रॉबेरी आणि आंबा कोकणातून मागवला जातो.
आर्थिक ताळमेळ
पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनीच्या महिलांनी स्मार्ट शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 98 लाख रुपयांचे कर्ज उभे केले. तसेच, 14 शेअर होल्डर तर्फे प्रत्येकी 1 लाख रुपये गोळा केले. तसेच स्मार्टच्या वतीने 250 शेतकरी सभासद कंपनीला जोडले.
नफा किती?
पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून 15 ते 20 महिलांना रोजगार देण्यात आला आहे. तसेच या कंपनीचा वार्षिक नफा तीन वर्षात एकूण 4 लाखांच्या पूढे पोहचला आहे. येत्या काही महिन्यानंतर आईस्क्रीम आणि कुल्फीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात येणार असल्याने आणखी नफा वाढण्याची शक्यता आहे.