SIM card Sale: सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने सिमकार्ड विक्री नियम कठोर केले आहेत. बल्कमध्ये (मोठ्या प्रमाणात) विक्री करण्यात येणाऱ्या एकूण सिमकार्डपैकी 20% सिमकार्डचा वापर बेकायदेशीर कामांसाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता सिमकार्ड विक्री नियम आणखी कठोर केले आहेत.
जे व्यवसाय, उद्योग आणि विक्रेते बल्कमध्ये सिम कार्ड खरेदी करतात त्यांची KYC करण्यात येईल. त्यानंतरच त्यांना सिमकार्ड विक्रीसाठी दिले जाईल. सिमकार्ड विक्रेत्याची पोलीस तपासणीही होणार आहे. त्यामुळे सायबर गुन्हे रोखण्यास मदत होईल.
गैरप्रकार आढळून आल्यास 10 लाख रुपये दंड
सिमकार्ड विक्रीमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास विक्रेत्याला 10 लाख रुपये दंड होऊ शकतो. विक्रेते जास्तीत जास्त सिमकार्ड विक्रीवर भर देतात. मात्र, ग्राहकांची माहिती व्यवस्थित घेतली जात नाही. अशा प्रकारच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. त्यामुळे पोलीस तपासणी आणि बायोमेट्रिक तपासणी अनिवार्य करण्यात आल्याचे केंद्रीय टेलिकॉम खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
एक व्यक्ती किती सिमकार्ड खरेदी करू शकतो?
सरकारी नियमानुसार एक व्यक्ती स्वत:च्या नावावर जास्तीत जास्त 9 सिमकार्ड खरेदी करू शकतो. या नियमामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. देशामध्ये 10 लाख सिमकार्ड डिलर्स आहेत. त्या सर्वांची पोलीस तपासणी करण्यात येणार आहे. जे ग्राहक बल्कमध्ये सिमकार्ड खरेदी करतात त्यापैकी 80% सिम योग्य कारणांसाठी वापरले जातात.
कॉर्पोरेट कंपन्या, व्यावसायिकांना बल्क सिमकार्डची गरज पडते. मात्र, यापैकी 20% सिमकार्डचा गैरवापर होतो. फसवणुकीसाठी किंवा ऑटोमॅटिक कॉल करण्यासाठी या कार्डचा वापर होतो, असे प्रकार थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
क्यूआर कोडद्वारे डिजिटल केवायसी
आधार कार्डद्वारे डिजिटल केवायसी सुविधा सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. क्यूआर कोडद्वारे आधार केवायसी केली जाईल. तसेच अशी केवायसी कायदेशीर असेल. म्हणजेच जर कोणी चुकीच्या कारणासाठी सिमकार्ड घेतले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होतील, असे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले.
52 लाख बनावट कनेक्शन बंद
मागील तीन महिन्यात देशातील 52 लाख बनावट मोबाइल कनेक्शन बंद करण्यात आले. 300 गुन्हे दाखल करण्यात आले. तर 17 हजार मोबाइल फोन बंद करण्यात आले. 66 हजार व्हॉट्सअॅप खाती बंद करण्यात आली आणि चोरी गेलेले 3 लाख मोबाइल मूळ मालकांना परत करण्यात आले, अशीही माहिती त्यांनी दिली.