Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काल बुधवारी लोकसभेमध्ये बजेट 2023 सादर केले. भांडवली खर्चाला आणि दीर्घकालीन विकासासाठी अर्थसंकल्पातून मोठी तरतूद करण्यात आली. तसेच आयात शुल्कही कमी करण्यात आले आहे. जनतेच्या हातात पैसा खेळता रहावा यासाठी करमुक्त आयकर मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. याचा परिणाम म्हणजे नागरिकांच्या हातात खर्च करण्यासाठी जास्त पैसा राहील. त्यामुळे येत्या काळात भारतात कार, ट्रक्स आणि इव्ही वाहनांची मागणी आणखी वाढू शकते. कार निर्मिती खर्चातही कपात होईल.
आयात सवलतींचा फायदा ग्राहकांना होणार (Custom duty benefit to car buyer)
केंद्र सरकारने उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या भांडवली वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. म्हणजेच वाहन निर्मिती कंपन्यांना जर भारतामध्ये प्रकल्प उभा करायचा असेल किंवा नवीन मशिन खरेदी करायचा असेल तर त्यासाठी आयात केलेल्या मालावर कर कमी द्यावा लागेल. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी तयार करण्यासाठी ज्या मशिनरी आयात करण्यात येतील, त्यावरील आयात शुल्कही कमी केले आहे. या गोष्टींमुळे वाहन निर्मितीसाठी जो खर्च लागतो तो कमी होईल, आणि त्याचा परिणाम गाड्यांच्या किंमती कमी होण्यात होईल. गाड्यांच्या किंमती की झाल्याने सहाजिकच ग्राहकांचा ओढा गाडी खरेदीकडे राहील.
आलिशान गाड्यांच्याही किंमती कमी होतील (Luxury car price might reduce)
अति उत्पन्न गटातील नागरिकांना लागू असलेला सरचार्ज 42% वरून 37% पर्यंत खाली आणण्यात आला आहे. त्याचा फायदा आलिशान कारची विक्री वाढण्यामध्ये होऊ शकतो. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारने 33% निधी मागील बजेटच्या तुलनेत जास्त दिला आहे. जड माल वाहतुकीसाठी ट्रक्सचा वापर केला जातो. देशभरात पायाभूत सुविधांची कामे सुरू झाल्यानंतर ट्रक्सची आणि हेवी वाहनांचीही मागणी वाढेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
वाहन निर्मिती कंपन्यांचे मत काय? (Automobile industry opinion on budget 2023)
आयकर कमी केल्यामुळे विविध श्रेणीतील नोकरदार वर्गाच्या हातात जास्त पैसा शिल्लक राहील, त्यामुळे कारविक्री वाढेल, असे मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. पायाभूत सुविधांवरील निधीत वाढ आणि लिथियम आयन बॅटरी उत्पादनासाठी सरकारने केलेल्या सहकार्यामुळे वाहननिर्मिती उद्योगाची मोठी वाढ होईल, असे टीव्हीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांनी म्हटले.
ईव्ही कारच्या किंमती कमी झाल्यास मागणी वाढणार (EV demand may rise after price comes down)
इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांच्या भारतातील किंमती सद्यस्थितीत जास्त आहेत. कारण वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी, सूटे पार्ट आणि मशिनरीचा मोठा खर्च आहे. भविष्यात बॅटरी निर्मिती भारतामध्येच मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या वस्तुंच्या आयात शुल्कात कपात केली आहे. सध्या अनेक ब्रँड्च्या ईव्ही दुचाकी 1 लाखांपेक्षा किंमतीच्या आहेत. तसेच ईव्ही कारच्या किंमतीही 15 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ग्राहक इव्ही घेण्यास तयार नाहीत. इव्ही कारमध्ये बॅटरी हा सर्वात महाग घटक आहे. जर ही बॅटरीच स्वस्तात मिळू लागल्यास गाड्यांची मागणी वाढेल. बॅटरीसाठी येणारा खर्च हा ग्राहकांसाठी कळीचा मुद्दा आहे.