सुप्रीम कोर्टाने अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे मान्य केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मागील काही दिवसांत अदानींचे शेअर्स तेजीने दौडत आहे. अदानी ग्रुपमध्ये तेजी पाहता मुंबई शेअर बाजाराने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराने (BSE) अदानी ग्रुपमधील चार शेअर्सचे सर्किट लिमिट वाढवण्यात आले आहे. या निर्णयाने चार शेअर्समध्ये ट्रेडिंगसाठी जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना सहभागी होता येईल.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर या शेअर्ससाठीचे सर्किट लिमीट 5% वरुन 10% करण्यात आले आहे. अदानी पॉवर या शेअर्सचे सर्किट लिमिट 5% वरुन 20% करण्यात आले आहे. यामुळे या चारही शेअर्समध्ये आता जास्तीत जास्त गुंतणूकदारांना ट्रेडिंगसाठी सहभागी होता येईल.
अदानी समूहातील शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस संमिश्र ठरला. अदानी ट्रान्समिशनचा शेअर काल मंगळवारी 846.25 रुपयांवर स्थिरावला. त्यात 1.42% घसरण झाली. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 991.85 रुपयांवर बंद झाला. त्यात 0.40% वाढ झाली. अदानी विल्मरचा शेअर 429.65 रुपयांवर बंद झाला. त्यात 0.60% वाढ झाली. अदानी पॉवरचा शेअर 263 रुपयांवर स्थिरावला. त्यात 1.37% वाढ झाली.
गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार यांनी 24 मे 2023 रोजी अदानी एंटरप्राईजेसचा स्टॉक शॉर्ट टर्म एएसएम फ्रेमवर्कमधून वगळला होता. शेअर मार्केटमधील तेजीने अदानी समूहाचे बाजार भांडवल वाढत असून यामुळे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत देखील वाढ होत आहे.
या कारणांमुळे अदानींचे शेअर्स वधारले
भारतीय शेअर मार्केटला हादरवणाऱ्या हिंडेनबर्ग रिपोर्टच्या तडाख्यातून अदानी ग्रुप सावरला आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समधील तेजीने चार कंपन्यांची मार्केट कॅप 1 लाख कोटींवर गेली.शेअर्समधील तेजीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने अदानी समूहातील शेअर्सच्या किंमतीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर अदानी शेअर्समधील दैनंदीन उलाढाल वाढल्याचे दिसून आले होते.
सर्किट लिमिट म्हणजे काय? What are circuit limits or price bands?
सर्किट लिमिट किंवा किंमत पट्टा ही एक पातळी शेअर बाजाराकडून एखाद्या शेअर्ससाठी निश्चित केलेली असते. कोणत्याही शेअर्समध्ये काही ठराविक काळात मोठे व्यवहार रोखता यावेत यासाठी किमान आणि कमाल किंमतीची मर्यादा शेअर बाजाराकडून निश्चित केली जाते. ही मर्यादा ओलांडली तर त्या शेअर्सबाबत करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या ऑर्डर्स पूर्ण होत नाहीत. त्या पेंडिंग दाखवल्या जातात. प्रत्येक शेअर्सचे वेगवेगळी सर्किट लिमिट असते. सर्वसाधारणपणे 2% ते 20% या दरम्यान सर्किट लिमिट ठरवली जाते.