Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ब्रिटिशांनी कशाप्रकारे केले भारताचे आर्थिक शोषण? नक्की किती संपत्ती लुटून नेली? जाणून घ्या

Britain Rule, India, Britains debt to india

Image Source : https://www.freepik.com/

ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 200 वर्ष राज्य केले. दोन शतकांच्या या काळात ब्रिटिशांनी जवळपास 45 ट्रिलियन डॉलर एवढी भारतीय संपत्ती लुटून नेली.

गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांविषयी चर्चा सुरू आहे. छत्रपतींची ही वाघनखं इंग्लंडवरून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. तसेच, 3 वर्ष भारतात ठेवल्यानंतर वर्ष 2026 मध्ये इंग्लंडला परत पाठवली जातील. 

इंग्लंडच्या संग्रहालयात असणारी वाघनखं ही एकमेव ऐतिहासिक वस्तू नाही. इंग्लंडने भारतातून कोहिनूर हिरा, टिपू सुलतान व छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, चोल साम्राज्याच्या काळातील कांस्य प्रतिमा, टिपू सुलतानची अंगठी व वाघासारखं दिसणारं खेळणं अशा अनेक ऐतिहासिक व मौल्यवान वस्तू नेल्या. परंतु, इंग्लंडने भारतात केलेल्या लुटीमध्ये केवळ ऐतिहासिक वस्तूंचाच समावेश नाही. इंग्लंडने भारतातून लुटून नेलेल्या संपत्तीचा आकडा हा प्रचंड मोठा आहे. ब्रिटिशांनी केलेल्या भारताच्या आर्थिक शोषणासाठी भरपाईची देखील मागणी केली जाते.

ब्रिटिशांनी भारतातून लुटून नेलेल्या संपत्तीचा आकडा हा तब्बल 45 ट्रिलियन डॉलर एवढा असल्याचे सांगितले जाते.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, शशी थरूरपर्यंत अनेक नेत्यांनी त्यांची भाषणं व लिखाणांमधून ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाचा उल्लेख केला आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी देखील 2019 मध्ये अमेरिकेत बोलताना इंग्लंडने भारतातून 45 ट्रिलियन डॉलर एवढी संपत्ती लुटून नेल्याचा उल्लेख केला होता. 

एस जयशंकर म्हणाले होते, ‘दोन शतकांच्या पारतंत्र्याच्या काळात भारताला अपमान सहन करावा लागला. एका अभ्यासानुसार इंग्लंडने भारतातून 45 ट्रिलियन डॉलर एवढी संपत्ती लुटून नेली.’

प्रसिद्ध अर्थतज्ञ उत्सा पटनाईक यांच्या संशोधनात 45 ट्रिलियन डॉलर हा आकडा समोर आला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित या संशोधनात दोन शतकातील आकडेवारींचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात ब्रिटिशांनी 1765 ते 1938 या काळात आजच्या मुल्यानुसार भारतातून 45 ट्रिलियन डॉलर संपत्ती लुटून नेल्याच्या आढळले. 

इतर अर्थतत्रज्ञांनी देखील वेळोवेळी इंग्लंडने भारतातून किती संपत्ती नेली व कशाप्रकारे शोषण केले याचा उल्लेख केला आहे. दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांनी आगमनापासून ते 1865 पर्यंत 150 कोटी पाँड्स एवढी संपत्ती लुटून नेल्याचे म्हटले होते. त्यांनी दरडोई उत्पन्न देखील मोजले होते. त्यांच्या मते 1867-68 मध्ये भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न फक्त 20 रुपये होते. तर रमेशचंद्र दत्त यांनी ब्रिटिशांनी दरवर्षी 2.20 कोटी पाँड्स संपत्ती देशाबाहेर नेल्याचे म्हटले होते.

ब्रिटिश येण्यापूर्वी भारताची स्थिती

विशाल आणि समृद्ध अशा भारताला एकेकाळी ‘सोन्याची चिमणी’ असे संबोधले जात असे. भारतातील वस्तूंना जगभरात मागणी होती. येथील मसाले, हिरे, ताग या वस्तूंना युरोप, आफ्रिकेतील देशांमध्ये प्रचंड मागणी होती. भारतातील कृषी व उद्योग देखील चांगल्या स्थितीत होते. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी, कापड, हस्तकला सारख्या उद्योगांवर आधारित होती. 

ब्रिटिशांच्या आगमानापूर्वी अनेक देशांची भारतावर आक्रमणे झाली, अनेक शासकांनी राज्य केले, परंतु इंग्रजांच्या आगमानानंतर देशाची प्रचंड नुकसान झाले. अनेक उद्योग धंद्यांचा ऱ्हास झाला. विशेष म्हणजे मुघलांच्या काळातही भारताच्या जीडीपीचा आकडा हा संपूर्ण युरोपपेक्षा जास्त होता. 

17व्या शतकाच्या सुरुवातीला जगातील एकूण जीडीपीमध्ये भारताचा वाटा हा जवळपास 25 टक्के होता. याच काळात संपूर्ण युरोपचा जीडीपी हा 23.3 टक्के, तर इंग्लंडचा जीडीपीमधील वाटा फक्त 2 टक्के होता. ब्रिटिशांच्या काळातील नुकसान एवढे मोठे होते की एकेकाळी जगाच्या जीडीपीमध्ये 25 टक्के वाटा असणाऱ्या भारताचा जीडीपीमधील वाटा वर्ष 1952 मध्ये 4 टक्क्यांपेक्षा खाली घसरला.

ब्रिटिशांचे आगमन अन् भारताचे नुकसान

व्यापार करण्याच्या उद्देशाने अनेक युरोपियन देशांनी भारतात प्रवेश केला. 14व्या शतकाच्याआधी खुष्कीच्या मार्गाने भारत व युरोपियन देशातील व्यापार चालत असे. मात्र, 14व्या शतकाच्या मध्यात ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे महत्त्वाचे शहर जिंकून घेतल्याने युरोपियन देशांना भारताशी व्यापार करण्यात अडथळे येऊ लागले. अशात समुद्रीमार्गाचा शोध घेण्यास सुरूवात झाली व यात सर्वात प्रथम वास्को द गामाला यश आले. 1498 ला पोर्तुगीजांच्या आगमनानंतर इतर देशांना देखील भारतातील समृद्धी  भुरळ घालू लागली. पोर्तुगिजांपाठोपाठ वर्ष 1608 मध्ये इंग्रज देखील भारतात आले.

अनेक युरोपियन देशांचे भारतात आगमन झाले असले तरी त्यांचा उद्देश हा केवळ व्यापार करण्यापुरता मर्यादित होता. मात्र, हळूहळू स्थानिक राजकारणात देखील रस दाखविण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांना भारतात स्वतःचे स्थान बळकट करण्यामध्ये प्लासीचे युद्ध निर्णायक ठरले. त्याकाळी बंगाल हा भारतातील सर्वात समृद्ध प्रदेश होता. प्लासीच्या युद्धातील विजयाने बंगाल तर ब्रिटिशांच्या ताब्यात आलाच, सोबतच भारतात सत्तेचा प्रसार करण्यासाठी देखील या संपत्तीचा मोठा फायदा झाला. बंगाल विजयानंतर ब्रिटिशांनी एवढी संपत्ती मिळाली की चांदीचे शिक्के भरून शेकडो नावा कलकत्त्याला आणण्यात आल्या होत्या. 

ब्रिटिशांनी त्यांच्या शासनकाळात भारतात रेल्वे, तारायंत्र, डाक, सिंचन योजना अशा अनेक सुधारणा केल्या असल्याचे अनेकांचे मत असते. मात्र, 200 वर्षांच्या शासनानंतर 1947 ला जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला, त्यावेळी या देशात केवळ गरीबी, उपासमार, दुष्काळ अशीच स्थिती होती. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली असली भारतातील स्थिती मात्र उलट होती. भारतात एकेकाळी भरभराटीत असणाऱ्या हस्तकला, कुटीर उद्योगांचा या काळात ऱ्हास झाला. तर भारतातून निर्यात होणाऱ्या कच्चा मालामुळे ब्रिटनमध्ये औद्योगिक विकास होण्यास मदत झाला. 

ब्रिटिशांनी कशाप्रकारे केली लूट? 

इतर युरोपियन देशांप्रमाणे ब्रिटिश देखील व्यापाराच्या उद्देशाने भारतात आले होते. मात्र, हळूहळू त्यांनी राजकीय वर्चस्व स्थापन केले. एकवेळ अशी होती की ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्यासाठी मुघल सम्राटाची परवानगी घ्यावी लागत असे. मात्र, जसजसे ब्रिटिशांनी भारतात हाय पाय पसरण्यास सुरुवात केली, तसे या स्थितीमध्ये बदल झाला.

ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर ताबा मिळविल्यानंतर व्यापारात देखील मोठे बदल केले. ईस्ट इंडिया कंपनीला अनेक प्रदेशांमध्ये कर गोळा करण्याचे अधिकार मिळाले होते. याच करातून गोळा करण्यात आलेल्या उत्पन्नाचा वापर भारतातून स्वस्तात वस्तू खरेदी करून ब्रिटनला पाठविण्यासाठी केला जात असे. याच वस्तू इतर देशांमध्ये निर्यात करून ब्रिटन मोठा नफा कमवत असे. थोडक्यात, भारतीयांच्याच पैशांनी भारतीय व्यापाऱ्यांच्या वस्तू ब्रिटनद्वारे स्वस्तात खरेदी केल्या जात असे व विक्रीतून नफा कमवला जात होता. 

एवढेच नव्हे तर भारतातून वस्तूंची निर्यात करायची असल्यास अथवा खरेदी करायची असल्यास ब्रिटिश क्राउनकडून विशेष परवानगी घ्यावी लागत असे. भारतातील वस्तूंची निर्यात करण्यासाठी काउंसिल बिलची गरज भासत असे. मात्र, हे काउंसिल बिल घेण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांना लंडनमधून सोने अथवा चांदी देऊन ते घ्यावे लागे. या काउंसिल बिलाचा वापर व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करताना केला जात असे. 

भारतीयांनी ही बिले स्थानिक कार्यालयात जमा केल्यानंतर त्यांना याबद्दल्यात पैसे दिले जात असे. विशेष म्हणजे हे पैसे भारतीयांच्या करातूनच जमा केलेले असायचे. अशाप्रकारे, जे सोने-चांदी भारतीयांकडे यायला हवे होते, ते थेट इंग्लंडच्या खजिन्यात जमा व्हायचे.

याशिवाय, ब्रिटिश जमीन महसूलीतून प्रचंड नफा कमवत. भारतातील अनेक उत्पादनावर ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार होता. यामुळे भारतीय बाजारातील वस्तूंच्या विक्रीतून निर्माण होणारे सर्व उत्पन्न ब्रिटिशांना मिळत असे. एवढेच नव्हे तर कंपनीचे अधिकारी देखील भारतीयांकडून पैशांची लूट करत.

ब्रिटिश काळातील दुष्काळात लाखो लोकांचा मृत्यू

भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीप्रधान होती. मात्र, ब्रिटिश वसाहतीच्या काळात देशातील कृषी व्यवस्थेत मोठे बदल झाले. शेतकऱ्यांकडून प्रचंड कर आकारला जात असे. याशिवाय नीळ, अफू सारख्या पिकांच्या उत्पादनाची शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात आली. यामुळे सुपिक जमीन निकृष्ट झाली. कराच्या आकारणीसाठी शेतकऱ्यांचे शोषण केले जात असे. याचा परिणाम असा झाला की अनेकांनी शेती करणे बंद केले. शेतकरी दारिद्र्यात ढकलले गेले. 1858 ते 1947 पर्यंतच्या ब्रिटिश शासनाच्या कालावधीत जवळपास 10 दुष्काळ पडले. या दुष्काळाची झळ एवढी प्रचंड होती की यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. 

प्रमुख नेते व तज्ञांनी इंग्लंडने भारताच्या केलेल्या शोषणाबाबत मांडलेली मते 

दादाभाई नौरोजी – दादाभाई नौरोजी यांनी आपल्या ‘Poverty and Un-British Rule in India’ पुस्तकात ब्रिटिशांनी कशाप्रकारे भारताचे शोषण केले याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते ब्रिटिशांनी केलेले ‘आर्थिक शोषण’ हे भारतातील दारिद्रयामागचे प्रमुख कारण आहे. 

नौरोजी हे ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समधून निवडून जाणारे पहिले भारतीय होते. त्यांच्या मते, ब्रिटिशांनी भारतातून दरवर्षी जवळपास 30 मिलियन पॉड्स एवढी संपत्ती लुटून नेली. याचाच परिणाम म्हणून भारतात गरिबीचे प्रमाण प्रचंड वाढले व कोणताही विकास झाला नाही. 

शशी थरूर – काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील ब्रिटिशांनी भारताच्या केलेल्या शोषणाबाबत त्यांच्या भाषणं व पुस्तकांमध्ये वारंवार उल्लेख केला आहे. 'An Era of Darkness: The British Empire in India' या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, ब्रिटिशांची भारतातील राजवट आर्थिक शोषणाचा काळ होता. प्रचंड आकारणी, व्यापारातून भारताचे प्रचंड शोषण करण्यात आले. तसेच, मुक्त व्यापार धोरणामुळे ब्रिटनच्या व्यवसायांचा तर भरभराट झाला, मात्र भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला. 

वर्ष 2015 मध्ये ऑक्सफर्ड युनियन सोसायटीमध्ये दिलेल्या भाषणात शशी थरूर म्हणाले होते की, ब्रिटनने स्वतःच्या फायद्यासाठी भारतावर शासन केले. ब्रिटिशांनी 200 वर्षात केवळ भारताला लुटले. याशिवाय, या आर्थिक शोषणासाठी ब्रिटनने भारताला भरपाई द्यावी, असेही ते यावेळी म्हणाले होते.

प्रसिद्ध अर्थतज्ञ आर सी दत्त आणि महादेव रानडे यांनी देखील ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाचा उल्लेख आपल्या पुस्तकांमध्ये केला आहे. आर सी दत्त यांनी ‘The Economic History of India’ या पुस्तकात ब्रिटिशांनी वर्षाला 20 मिलियन पाँड्स एवढी संपत्ती लुटून नेल्याचे म्हटले आहे. रानडे यांनी त्यांच्या ‘Essay on Indian Economics’ या पुस्तकात दावा केला आहे की, ब्रिटिशांनी भारतातील एकूण संपत्तीपैकी एक तृतियांश संपत्ती लुटून नेली.

थोडक्यात, ब्रिटनने भारतात सुधारणा घडवून आणल्या असे म्हणण्याऐवजी भारतातून लुटून नेलेल्या संपत्तीच्या जोरावर ब्रिटनचा विकास झाला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.