सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. 2 कोटींहून कमी रकमेच्या ठेवींचा व्याजदर वाढवण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. बँक ऑफ बडोद्याचा मुदत ठेवीचा दर 7.25% इतका वाढला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 0.50% जादा व्याज दिले जाते. 12 मे 2023 पासून फिक्स्ड डिपॉझिटवर सुधारित व्याजदर लागू करण्यात आल्याचे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे.
बँकेने 7 ते 45 दिवसांच्या ठेवींवरील व्याजदर 3% केला आहे. 46 ते 180 दिवसांसाठीच्या मुदत ठेवीवर आता 4.5% व्याज मिळेल, असे बँकेने म्हटले आहे. 181 दिवस ते 210 दिवस या कालावधीतील मुदत ठेवींवर 4.5% इंटरेस्ट मिळेल. एक वर्षांपेक्षा कमी आणि किमान 211 दिवस एफडी असल्यास त्यावर 5.75% व्याज मिळणार आहे.
एक ते दोन वर्ष कालावधीसाठी मुदत ठेवीवर 6.75% व्याज मिळेल. दोन वर्षांहून अधिक आणि तीन वर्ष कालावधीतील मुदत ठेवीवर बँकेकडून 7.05% व्याज मिळेल, असे बँकेने म्हटले आहे. यापूर्वी या कालावधीसाठी मुदत ठेवीचा दर 6.75% इतका होता. 3 ते 10 वर्ष मुदतीच्या ठेवींवर 6.50% व्याज दिले जाईल, असे बँकेने म्हटले आहे.
बँक ऑफ बडोदाने 399 दिवसांची स्पेशल डिपॉझिट स्कीम जाहीर केली आहे. तिंरगा स्पेशल डिपॉझिट योजनेत मुदत ठेवीवर सर्वसामन्य ठेवीदारांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज दिले जाणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
मुदत ठेव हा सर्रास गुंतवणूक करण्याचा प्रकार आहे.त्यातही बँकांमधील गुंतवणूक ही तुलनेने सुरक्षित आणि कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून ओळखली जाते.बड्या कमर्शिअल बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँकांकडून ठेवींवर चांगले व्याज दिले जात आहे.युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या बँकांकडून ठेवींवर 8 ते ९ % व्याज दिले जात आहे.
एसबीआय, एचडीएफीसी बँक, आयसीआयसीआय बँक या बँकांचा व्याजदर 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी 3% ते 7.10% या दरम्यान आहे. ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी व्याजदर 3.50% ते 7.60% इतका आहे. अॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी 3.50% ते 7.20% व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा 3.50% ते 7.95% इतका व्याजदर आहे.