BMW Units Sales: जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी BMW ने विक्रीत वाढ नोंदवली आहे. वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत, कंपनीची एकूण विक्री वार्षिक 5 टक्क्यांनी वाढून 5,867 युनिट्सची झाली आहे. समूहाच्या BMW Motorrad ब्रँड अंतर्गत प्रीमियम मोटारसायकलींची विक्री जानेवारी-जून दरम्यान 50 टक्क्यांहून अधिक वाढून 4,667 युनिट्सवर पोहोचली आहे.
सहा महिन्यात 5,476 वाहनांची विक्री
वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत, समूहाने BMW ब्रँड असलेली 5,476 वाहनांची विक्री केली. त्याच वेळी, मिनी ब्रँडची विक्री 391 युनिट्स झाली आहे. हा कंपनीचा भारतातील सर्वाधिक सहामाही विक्रीचा आकडा आहे. 'शेवटी लक्झरी कारचे मार्केट वाढू लागले आहे. मार्केटमध्ये नवीन मॉडेल्सच्या लाँच केल्याने देखील लाभ झाला आहे', असे बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पवाह म्हणाले.
46 टक्क्यांनी विक्रीत वाढ
गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही पुरवठा साखळीतील अडचणी कायम असुनही बीएमडब्ल्यूने हा आकडा गाठला आहे. तसेच BMW ची इलेक्ट्रिक वाहने i7, ix, i4 आणि Mini SE देखील बाजारात वेगाने स्थान मिळवत आहेत. 2023 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने 500 हून अधिक इलेक्ट्रिक कार विकल्या. ही विक्री मागील संपूर्ण वर्षाच्या तुलनेत 46 टक्के अधिक आहे. 50 टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या प्रीमियम इलेक्ट्रिक वाहन विभागात बीएमडब्ल्यू ग्रुप आघाडीवर असल्याचे, बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पवाह यांनी सांगितले.
2023 BMW X5 फेसलिफ्ट लाँच
BMW ने अलीकडेच तिच्या X5 मध्यम आकाराच्या SUV चे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केले. X5 फेसलिफ्ट मॉडेल पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह देण्यात आलेले आहे. हे मॉडेल दोन ट्रिम आणि 4 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 93.90 लाख ते 1.07 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.