GMLR Project: मुंबईतील गोरेगाव-मुलूंड लिंक रोडवर सुमारे 4.7 किलोमीटर लाबींचा दुहेरी बोगदा तयार होणार आहे. 8 महिन्यांपूर्वी बृहन्मुंबई महानगर पालिकेने यासाठी कंत्राट काढले होते. तेव्हापासून कोणीही बोली लावली नव्हती. आता नुकतेच तीन कंपन्यांनी बोली लावली आहे. हा दुहेरी बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणार आहे.
बोली लावणाऱ्या तीन कंपन्या कोणत्या
गोरेगाव मुलूंड लिंकरोड निर्मितीचा प्रकल्प सुमारे साडेआठ हजार कोटींचा आहे. त्यापैकी फक्त दुहेरी बोगदा निर्मितीसाठी 6 हजार 300 कोटी खर्च येणार आहे. सर्वप्रथम ऑक्टोबर 2022 मध्ये बोगदा बांधण्याचे कंत्राट पालिकेने काढले होते. मात्र, यास प्रतिसाद मिळाला नव्हता. आता NCC लिमिटेड, Afcons Infrastructure आणि लार्सन आणि टुब्रो (L&T) या तीन कंपन्यांनी बोली लावली आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी कामाची ऑर्डर काढण्यात येईल. सध्या तिन्ही कंपन्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात यावी, अशी विनंती इच्छुक कंपन्यांनी केली होती. शिवाय पर्यावरण आणि वन विभागाच्या परवानग्यांमुळेही प्रकल्पाला विलंब झाला, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प विभाग) यांनी म्हटले. बोगद्याच्या खालून जलवाहिनी होणार असल्याने प्रकल्पावर निर्णय घेण्यास विलंब झाला.
गोरेगाव-मुलूंड लिंकरोडवरील बोगद्याबद्दल
या प्रकल्पाची एकूण रक्कम 8,550 कोटी रुपये आहे. यापैकी दुहेरी बोगद्याचे काम 6,300 कोटींचे आहे. हा बोगदा 4.7 कि. मी लांबीचा असेल. संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून हा बोगदा जाणार आहे. या बोगद्याची खोली 20 ते 160 मीटरच्या दरम्यान असेल. टनेल बोअरिंग मशिनच्या साहाय्याने खोदकाम करण्यात येणार आहे. या बोगद्यात अत्याधुनिक लाइटिंग आणि हवा येण्याची व्यवस्था असणार आहे. तसेच देखरेखीसाठी सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात येतील.
चार टप्प्यात तयार होईल प्रकल्प
या प्रकल्प चार टप्प्यात विभागण्यात आला आहे. यापैकी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूल, वाहतूक व्यवस्था सुधारणे, रस्ते मोठे करण्यात येत आहेत. तिसऱ्या टप्प्यात बोगद्याचे काम होईल. 2023 च्या शेवटीपर्यंत बोगद्याचे काम सुरू होईल. तसेच 2025 पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.