विमा सुरक्षा हे अडचणीच्या काळाच आर्थिक सुरक्षा प्रदान करणारे एक महत्वपूर्ण साधन आहे. त्यामुळेच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून नागरिकांना सर्वसमावेशक विमा सुरक्षा (Insurance )प्रदान करण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम हाती घेत आहे. त्यामध्ये "सर्वांसाठी विमा" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय नागरिकांना एकाच पॉलिसीच्या माध्यमातून जीवन, आरोग्य आणि मालमत्तेचे विमा कवच प्रदान व्हावे यासाठी ऑल-इन-वन असे विमा विस्तार (BIMA vistar) असे उत्पादन लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ऑल इन वन विमा सुरक्षा
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आता नागरिकांना परवडणारा आणि सर्वसमावेशक कव्हर प्रदान करणाऱ्या विमा पॉलिसीची योजना उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे IRDAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या विमा विस्तार या योजनेत नागरिकांना जीवन, आरोग्य, मालमत्ता यासाठी विमा संरक्षण देणारी एकच पॉलिसी(All in One) उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी विमा कंपन्यांकडूनही विमा विस्तार या योजनेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
विमा विस्तार योजनेची वैशिष्ट्ये
देशातील प्रत्येक नागरिकांला 2047 पर्यंत विमा संरक्षण प्रदान करण्यासाठी IRDAI चा प्रयत्न सुरू आहे. त्यातीलच एक टप्पा म्हणून विमा विस्तार ही योजना राबवण्यात येणार आहे. ही योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात सर्वसमावेशक विमा उपलब्ध करून देण्याचे उदिष्ट्य आहे. या योजनेतून नागरिकांन समजतील अशा सहज सोप्या नियम अटी शर्तींचा समावेश केला जाईल. तसेच यासाठी पूर्णपणे पेपरलेस आणि सोपी विमा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामध्ये पॉलिसी घेणे, नुतनीकरण करणे, ऑनलाईन दावा दाखल करणे, दाव्याची पडताळणी करणे, दाव्याची रक्कम ठराविक वेळेत लाभार्थ्याच्या खात्यामध्य जमा करणे अशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तसेच विमा पॉलिसीधारकांची संख्या वाढवण्यासाठी देखील भर दिला जाणार आहे.
जन धन योजनेच्या धरतीवर प्रसार
विमा विस्तार ही योजना सर्व सामान्यांपर्यंत विशेषत: महिला वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी जन धन योजनेच्या धरतीवर वितरणाचे काम केले जाणार आहे. यासाठी बँक मित्रांची मदत घेतली जाणार आहे. देशात सध्या 8.5 लाख बँक मित्र आहेत. जे ग्रामीण स्तरापर्यंत वित्तीय सेवा देत आहेत. त्यांच्या मदतीने विमा विस्तार योजनेचाही विस्तार केला जणार आहे. तसेच महिलांनाही यामध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. बचत गटाचे काम करणाऱ्या महिलांना विमा विस्तार ((Bima Vistar) ‘विमा वाहन’ म्हणून नियुक्त केले जाणार आहे. ज्यामाध्यमातून विमा विषयक जनजागृती करणे सोईची होणार आहे. या विमा वाहक महिला ग्रामीण भागातील महिलांना कुटुंबांना विमा विस्तारचे महत्व पटवून देण्याचे काम करतील,असे IRDAI चे नियोजन आहे.