मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या रुग्णालयात मोफत रक्त तपासणी करण्याची सुविधा सुरु केली आहे. याआधी रक्त तपासणीसाठी रुग्णांना 50 ते 100 रुपये द्यावे लागत होते. आता मात्र ही सुविधा निशुल्क करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असून, मुंबईत राहणार्या लाखो नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
‘आपली चिकित्सा’ मोहीम
मुंबई महानगरपालिकेने ‘आपली चिकित्सा’ या नावाने एक मोहीम सुरु केली आहे. याद्वारे BMC संचालित रुग्णालायात रक्त तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या वेगवगेळ्या रक्त तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. यात एचआयव्ही,हिवताप, रक्तदाब, डेंग्यू, मलेरिया व अन्य 147 टेस्ट निशुल्क केल्या जाणार आहेत.
खासगी लॅबोरेटोरीमध्ये महागड्या रक्त तपासण्या या 4000 ते 5000 रुपयांपर्यंत केल्या जातात. सर्वच नागरिकांना या महागड्या रक्त तपासण्या परवडतात असे नाही. अनेकदा रुग्णांची आर्थिक फसवणूक देखील केली जाते. आता सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी होणार असल्यामुळे सामान्य मुंबईकरांना याचा लाभ मिळणार आहे आणि त्यांचे पैसे देखील वाचणार आहेत.
रक्त तपासणी उच्च गुणवत्तेसह!
याआधी ‘आपली चिकित्सा’ मोहीम राबविण्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीकडून प्रत्येक चाचणीसाठी 50 ते 100 रुपये आकारले जात होते. मात्र रुग्णांना पुरेपूर व व्यवस्थित सेवा देण्यास ही कंपनी अयशस्वी ठरल्यामुळे बीएमसीने या कंपनीची सेवा थांबवली होती. आता मात्र मुंबईतील जवळपास 175 रुग्णालये आणि 28 प्रसुतीगृहांमध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
सध्याचा निर्णय केवळ मुंबईपुरताच!
मोफत रक्त तपासणीसंदर्भात घेण्यात आलेला हा निर्णय केवळ मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या हॉस्पिटलसाठी घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरात ही सुविधा सध्या तरी दिली जाणार नाहीये. त्यामुळे ठाणे, कल्याण, पालघर, नवी मुंबई येथील नागरिकांना आहे त्या शुल्कासह रक्त तपासणी करावी लागणार आहे. उपनगरीय हॉस्पिटलमध्ये ही सेवा अजूनही 50-100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.