जीपीएफचा (General Provident Fund) व्याज दर 7.1 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सरकारनं जुलै-सप्टेंबर या कालावधीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या धर्तीवर यावेळी जीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लेटेस्ट अपडेटनुसार, 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023पर्यंत, जीपीएफ गुंतवणुकीवर 7.1 टक्के दरानं व्याज मिळणार आहे.
Table of contents [Show]
अधिसूचना जारी
आर्थिक व्यवहार विभागाकडून मंगळवारी अधिसूचना जारी करण्यात आली. या अधिसूचनेनुसार, वर्ष 2023-24 दरम्यान, सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि इतर अशाच प्रकारच्या निधीच्या सदस्यांनी जमा केलेल्या एकूण रकमेवर व्याजाचा दर 1 जुलै 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी 7.1 टक्के असणार आहे. हा दर 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे.
सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय?
सामान्य भविष्य निर्वाह निधी हे देशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणुकीचं अत्यंत महत्त्वाचं असं साधन आहे. पीएफप्रमाणेच (प्रॉव्हिडंट फंड) कर्मचारी त्यांच्या पगाराचा काही भाग जीपीएफमध्ये गुंतवू शकतात. म्हणजेच केवळ सरकारी कर्मचारी आपल्या पगारातून जीपीएफसाठी वेगळी रक्कम काढतात. यात सरकारचं योगदान नसतं.
कोणताही कर नाही
कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती आणि आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत सरकार जीपीएफमधून पैसे काढण्याची परवानगी देते. या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. जीपीएफ सामान्यपणे निवृत्तीचाच एकप्रकारे फंड असतो. कारण यातली रक्कम अडचणीची परिस्थिती वगळता निवृत्तीनंतरच मिळते.
कोणत्या फंडांवर व्याजदर?
- सामान्य भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा)
- अंशदायी भविष्य निर्वाह निधी (भारत)
- राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी
- सामान्य भविष्य निर्वाह निधी (संरक्षण सेवा)
- भारतीय आयुध विभाग भविष्य निर्वाह निधी
- भारतीय आयुध निर्माणी कामगार भविष्य निर्वाह निधी
- भारतीय नौदल गोदी कामगार भविष्य निर्वाह निधी
- संरक्षण सेवा अधिकारी भविष्य निर्वाह निधी
- सशस्त्र दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी