Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Beekeeping: मधुमक्षिका पालनातून 'असा' मिळवा नफा, आर्थिक प्रगतीसह पर्यावरण संवर्धनालाही हातभार

Beekeeping

Business Idea: नागपूर शहरात राहणाऱ्या प्राजक्ता आदमाने कारु यांनी मधमाशी पालन आणि मध विक्रीचा व्यवसाय 2017 पासुन सुरु केलाय. विदर्भासह देशातील विविध राज्यात त्यांनी मधुमक्षिका पालनाकरिता आपले सेटअप तयार केले. तसेच त्या अतिशय उत्तम गुणवत्तेचा मध तयार करुन विक्री करतात. या माध्यमातून त्यांना वर्षाला 7 लाख रुपयांचा नफा होतो.

Honey Business: अनेक तरुण-तरुणी अशा आहेत, ज्यांचे नोकरी करण्यात मन लागत नसल्याने ते स्वत:चा व्यवसाय करण्यावर भर देतात. सुरुवातीला अनेक गोष्टींचे आव्हान स्वीकारून अतिशय मेहनतीने ते आपला व्यवसाय उभारतात. असाच एक आव्हानात्मक व्यवसाय नागपूर शहरातील प्राजक्ता आदमाने कारु यांनी 2017 साली सुरु केला होता. आज त्यांना यशस्वी उद्योजिका म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

व्यवसाय करण्याचा निर्धार

प्राजक्ता आदमाने कारु यांचे शिक्षण फार्मसी आणि मार्केटिंग क्षेत्रात एमबीए असे झालेले आहे. सुरुवातीला त्या पुणे येथे नोकरी करायच्या मात्र नोकरीत मन लागत नसल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. प्राजक्ता यांच्या वडीलांचा व्यवसाय होता. त्यासाठी ते संपूर्ण विदर्भात फिरस्तीवर असायचे. गडचिरोली जिल्ह्यात देखील त्यांचे बरेच दिवस वास्तव्य होते. त्यामुळे प्राजक्ता यांचे जंगलाशी आणि जंगलातील मधमाशी सोबत जवळचे नाते निर्माण झाले.

चुकीच्या पध्दतीमुळे मधमाशी नष्ट

प्राजक्ता यांच्या लक्षात आले की, काही भागातील संपूर्ण मधमाशांचे पोळे जाळून मध काढण्याची प्रक्रिया अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे या मधमाश्यांची संपूर्ण जाती नष्ट होण्याची शक्यता असते. जंगलात राहणाऱ्या आणि शेती करणाऱ्या नागरिकांना देखील मधमाशीचा उपयोग केवळ मध काढण्याकरिता होतो, एवढेच काय ते माहिती आहे. त्यामुळे प्राजक्ता यांनी मधमाशी पालन आणि त्याच्याशी संबंधित होणारे फायदे या विषयांचा अभ्यास केला आणि त्याचे फायदे लोकांना समजावून सांगणे सुरु केले.

मधमाशीचे जैविक महत्व

मधमाश्यांच्या साहाय्याने शेतात परागीभवन होऊन शेतात पिक चांगले येते. मधमाशीच्या शरीरावर अनेक केस असतात. त्यांना अनेक परागकण चिकटून विविध पिकांचे परागीभवन होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील विविध पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. जर मोठ्या प्रमाणात मधमाश्या नष्ट झाल्या तर शेतात मर्यादित उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल, असे शास्त्रज्ञांचे देखील मत असल्याचे, प्राजक्ता यांनी सांगितले.

अशी केली व्यवसायाची सुरुवात

मधमाशी पालनाचे महत्व लक्षात आल्यानंतर प्राजक्ता यांनी नॅशनल बी बोर्ड (NBB) मधून प्रशिक्षण घेतले. दिल्ली येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 100 पेटी खरेदी करुन मधमाशी पालन सुरु केले. यासाठी त्यांना विविध राज्यांमध्ये काही महिने वास्तव्य करावे लागले. अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी प्रात्यक्षिक (Practicle)  नॉलेज घेतले. सुरुवातीला मधुमक्षिका पालनाच्या 100 पेट्या आणि इतर वाहतुकीचा खर्च मिळून त्यांना एकूण 4 लाख रुपये गुंतवणूक केली. पूढे मधुमक्षिका पालन आणि शहद काढणे असे दोन संलग्नित व्यवसाय त्या करु लागल्या.

नफा आणि मार्केटिंग

2019 पासुन त्या खादी ग्रामोद्योग, आत्मा, एमसीइडी, कृषी विज्ञान केंद्र यासारख्या संस्थांसोबत मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करीत आहे. तसेच उत्तम दर्जाचे मध विक्रीचा व्यवसाय देखील प्राजक्ता करीत आहेत. एका वर्षाला 4000 रुपयांची एक पेटी याप्रमाणे त्यांनी 20 ते 25 लाख रुपयांची गुंतवणूक मधुमक्षिका पालनात केलेली आहे. मधुमक्षिका पालन व्यवसायात त्यांना वर्षाला 20 ते 25 टक्के नफा होतो. तर यामधूनच केल्या जाणाऱ्या मध विक्रीमध्ये त्यांना वर्षाला 5 लाख रुपयांचा नफा होत असतो. मध विक्रीचे मार्केटिंग त्या सोशल मिडीया, प्रदर्शन आणि इतर माध्यमातून करतात.

अनेक पुरस्कारांच्या मानकरी प्राजक्ता

मधुमक्षिका पालन आणि मध विक्री यामाध्यमातून त्यांनी जवळपास 8 लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याला 5000 ते 7000 असे वेतन दिले जाते. प्राजक्ता आदमाने कारु यांना विआयए पुरस्कार, विदर्भ रत्न पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार मिळालेले आहे.