ग्राहकाने जर ऑनलाइन केवायसी (KYC-know your customer) केली असेल तर बँकेच्या शाखेत पुन्हा माहितीची पडताळणी किंवा कोणतेही अपडेट देणे गरजेचे नाही, असे नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. C KYC या पोर्टलवरही माहिती अपडेट केली असेल तर शाखेत पुन्हा माहिती देण्याची गरज नाही, असेही आरबीआयने म्हटले आहे. जर ग्राहकाला त्याच्या माहितीमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर तो ऑनलाइन पद्धतीने करू शकतो.
रिझर्व्ह बँकेचा असा कुठलाही नियम नाही (RBI has no such rule on KYC)
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. शाखेत येऊन KYC ची माहिती अपडेट करा, अशी मागणी बँक करू शकत नाही. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचा कुठलाही नियम नाही. KYC संबंधित माहिती ग्राहकाला हवी असल्यास नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर किंवा मेलद्वारे तशी रिक्वेस्ट ग्राहक बँकेला पाठवू शकतो. त्यानंतर ही KYC ची माहिती CKYC पोर्टलवर पाहण्यास मिळू शकते, असे दास यांनी म्हटले.
बँकामध्ये केवायसीबाबत जनजागृती (lack of awareness in banking)
बँक कर्मचाऱ्यांमध्ये केवायसी नियमावली बाबत जनजागृती झालेली नाही. ग्राहकांना विनाकारण माहिती विचारू नका, असे आरबीआय वारंवार बँकांना सांगत आली आहे. या नियमांची बँकांनाच चांगली माहिती नाही. त्यामुळे असे प्रकार घडतात, असे डेप्युटी गव्हर्नर टी. राबी शंकर यांनी सांगितले. जर ग्राहकांना केवायसी संबंधी अशा अडचणी आल्या तर ते बँक लोकायुक्तालयात तक्रार दाखल करू शकतात, असेही ते म्हणाले.
KYC म्हणजे काय? (What is mean by KYC)
ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी जी माहिती बँक पडताळून पाहते आणि बँकेकडे साठवून ठेवते त्यास केवायसी म्हणतात. यामध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, ग्राहकाचा पत्ता, खात्याची माहितीचा समावेश असतो. खात्याचा गैरवापर टाळण्यासाठी केवायसी गरजेची आहे. तसेच गैरव्यवहार, मनी लाँड्रीग, खात्यातील पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी बँक प्रत्येक ग्राहकाची माहिती पडताळून पाहते. तसेच वेळोवेळी माहिती अद्ययावत करते.
सेंट्रल केवायसी रजिस्ट्री काय आहे? (What is CKYC)
ग्राहक आणि वित्त संस्थांची माहिती साठवण्यासाठी सेंट्रल केवायसी रजिस्ट्री निर्माण करण्यात आली आहे. या संस्थेकडे सर्व ग्राहकांची माहिती जमा असते. या रजिस्ट्रीमधून बँकांना ग्राहकांची माहिती मिळू शकते. प्रत्येकवेळी बँकेसंबंधी व्यवहार करताना माहिती देण्याची गरज नाही. ही माहिती केवायसी रजिस्ट्रीमधून मिळवता येऊ शकते. या पोर्टलवर जाऊन ग्राहक आपली माहिती जमा करू शकतो किंवा अपडेट करू शकतो.