आर्थिक वर्षाचा शेवटच्या आठवड्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे.येत्या 31 मार्च 2023 पर्यंत कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. यामुळे २५ मार्च , चौथा शनिवार आणि २६ मार्च , रविवार बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार ३० मार्च रोजी रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबई, बेलापूर, नागपूर, अहमदाबाद अशा शहरांमध्ये बँका बंद राहतील
आर्थिक वर्ष 2022-2023 संपायला बरोबर आठ दिवस शिल्लक आहे. करदाते आणि नोकरदार वर्ग टॅक्स बेनिफिट्ससाठी गुंतवणूक नियोजनात व्यस्त आहे. व्यापारी आणि उद्योजक देखील वार्षिक हिशेब, अॅडव्हान्स टॅक्समध्ये गुंतले आहेत. अशात बँका साप्ताहिक किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद राहिल्या तर ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.त्यामुळे रिझर्व्ह बँकेने विशेष अध्यादेश जारी करत बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या 31 मार्च 2023 पर्यंत रद्द केल्या आहेत. येत्या 31 मार्च 2023 पर्यंत बँकांनी नियमित कामकाज करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे सर्वच बँकांच्या शाखा उद्या शनिवार (25 मार्च) आणि परवा रविवार (26 मार्च) रोजी नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहेत. गुंतवणूक, सरकार देणी आणि आर्थिक व्यवहार तसेच इतर आर्थिक व्यवहार आर्थिक वर्षातच पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.बँकांना वार्षिक हिशेब देखील 31 मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहेत.
NEFT आणि RTGS सेवा 31 मार्च 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार
ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन आर्थिक व्यवहार विनाअडथळा करता यावेत यासाठी विशेष सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाईम ग्राॉस सेटलमेंट (RTGS) या दोन सेवा शनिवार 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 वाजेरपर्यंत अखंड सुरु ठेवण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. सरकारी देणी किंवा बिले अदा करण्यासाठीचे चेक संकलित करण्याबाबत विशेष खिडकीची व्यवस्था करावी असेही रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आवाहन केले आहे.