अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह (Akola Merchant Co-operative Bank) या बँकेचे जळगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात दिलेल्या परवानगीनुसार आजपासून (28 ऑगस्ट 2023) अकोला मर्चंट सहकारी बँकेच्या सर्व शाखा जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीन झाल्या आहेत. यापुढे अकोला बँकेचे सर्व व्यवहार जळगाव बँकेच्या नावानेच चालू राहतील.
जळगाव बँकेचा विस्तार
भारतीय रिझर्व्ह बँकेने 25 ऑगस्ट रोजी अकोला मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व शाखांचे द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह (Jalgaon Peoples co-operative Bank) या बँकेमध्ये विलीनीकरण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार 28 ऑगस्टपासून अकोला बँकेचे सर्व व्यवहार जळगाव बँकेच्या अधिकारात सुरू होणार आहेत. या विलीनिकरणामुळे जळगाव पिपल्स सहकारी बँकेच्या एकूण 40 शाखांमध्ये आता अकोला मर्चट बँकेच्या शाखेचीही भर पडणार आहे. तसेच या विलीनिकरणामुळे अडचणीत आलेल्या अकोला मर्चंट बँकेचे खातेदार, सभासद, यांचे आर्थिक व्यवहार यापुढे सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
खातेदारांना कराव्या लागणार या गोष्टी
अकोला मर्चंट बँकेच्या या विलीनिकरणामुळे बँकेच्या मुळे खातेधारकांनी आपले व्यवहार जळगाव बँकेतून करावे लागणार आहेत. त्यामुळे खातेदारांना त्यांच्या शाखेत जाऊन नवीन माहिती घ्यावी लागेल. तसेच त्याचे खाते पासबूक बदलून घ्यावे लागेल. याचबरोबर बँकेचे चेकबूक बदलून घ्यावे लागणार आहे. तसेच बँकेच्या इतर योजना, नियम याबाबतची माहिती शाखेतून प्राप्त करून घ्यावे.