तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत आणि त्या बदलण्यासाठी तुम्ही बँकेत जाण्याचे नियोजन करत असाल तर जून महिना चांगला पर्याय ठरु शकतो.कारण साप्ताहिक सुट्ट्या वगळता जून महिन्यात जवळपास सर्वच कामकाजाचे दिवस बँका सुरु राहतील.देशभरात स्थानिक पातळीवर 12 दिवस बँकांना हॉलिडे असले तरी महाराष्ट्रात मात्र 28 जून 2023 रोजी बकरी ईद निमित्त बँकांना सुट्टी आहे.साप्ताहिक सुट्टी धरता एकूण सात दिवस बँक बंद राहणार आहेत.
मागील मंगळवार 23 मे 2023 पासून बँकांमध्ये नेहमीपेक्षा एक काम वाढले आहे ते म्हणजे 2000 रुपयांच्या नोटा बदलून देणे. येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व बँकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम करावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने तशा प्रकारच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.
नागरिकांना दोन हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. त्याशिवाय या नोटा चलनात 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध आहेत. त्यामुळे नोटा बदलून घेणे किंवा खर्च करण्याचा पर्याय नागरिकांकडे आहे. एका व्यक्तीला एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेता येतील. अर्थात एकावेळी 20000 रुपयांचे चलन बदलून मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार जून महिन्यात राष्ट्रीय स्तरावर पाच बँक हॉलडे आहेत. यात 15 जून 2023 रोजी राजा संक्रातीनिमित्त मिझोरम आणि ओदिशामध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी आहे. 20 जून 2023 रोजी रथयात्रेनिमित्त ओदिशामध्ये बँकांना सुट्टी असेल. 26 जून 2023 रोजी त्रिपुरात बँकांना खर्ची पुजेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल. 28 जून रोजी बकरी ईदनिमित्त केरळ, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमध्ये बँकांना सुट्टी आहे.29 जून 2023 रोजी केरळ, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मिर वगळता इतर राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.
पुढील महिन्यात महाराष्ट्रात केवळ एकच बँक हॉलिडे आहे. 28 जून रोजी बकरी ईदनिमित्त राज्यातील बँकांना सार्वजनिक सुट्टी आहे. याशिवाय 4 जून 2023, 11 जून 2023, 18 जून 2023 आणि 25 जून 2023 रोजी रविवार आहे. याशिवाय 10 जून 2023 आणि 24 जून 2023 रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद असेल.