Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bangladesh In Crises : महागाईविरोधात जनक्षोभ, बांगलादेशचा श्रीलंका होणार का?

Bangladesh In Financial Crises

मे महिन्यात श्रीलंकेच्या मदतीला धावून जाणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना आपला देशही आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण वाढती महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि झपाट्याने आटणारी परकीय गंगाजळी यामुळे बांगलादेशही आता आर्थिक संकटाच्या उंबरठयावर आहे. (Bangladesh In Financial Crises)

श्रीलंकेतील आर्थिक संकटांच्या बातम्या संपत नाही तोच बांगलादेश संकटात सापडल्याने दक्षिण आशियात एकच खळबळ उडाली आहे.(Bangladesh in Financial Crises)महागाई,बेरोजगारीने हैराण झालेल्या बांगलादेशी नागरिकांनी तिथल्या सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.भारतीय उपखंडातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळेपर्यंत बांगलादेशला डोळ्यात तेल घालून अर्थव्यवस्था हाताळावी लागेल.  

बांगलादेशनं मागील महिनाभरात आयातीचे प्रमाण कमी केले आहे.कारण सरकारकडं आयात बिलांची कती करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. देशाचा परकीय चलन साठा प्रचंड कमी झाला आहे.(Bangladesh forex reserve saw steep fall) परिणामी दोन महिन्यांपासून बांगलादेशमधील आर्थिक संकट तीव्र बनले आहे.प्रसारमाध्यमांमध्ये महिनाभरापासून बांगलादेशमधील अस्थिरतेच्या बातम्या येत होत्या.गेल्या आठवड्यात ही परिस्थिती चिघळली जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा भडका उडाला. राजधानी ढाकामध्ये सरकारविरोधात जनक्षोभ उसळला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. या घटनेनंतर बांगलादेशचा श्रीलंका होणार अशी चर्चा जोर धरु लागलीय.  

बांगलादेशवर परकीय कर्ज हे 'जीडीपी'च्या तुलनेत 44% इतके आहे. मागील वर्षभरात त्यात 21.8% वाढ झाली असली तरी 'जीडीपी'चा विचार केला बांगलादेश अजूनही जगातील टॉप 50 देशांमध्ये 41 व्या स्थानावर आहे. दक्षिण आशियातून भारत आणि बांगलादेश या दोनच राष्ट्रांचा जगातील टॉप 50 देशांमध्ये समावेश आहे.

परकीय चलनसाठा कमी झाल्याने ज्या प्रकारे श्रीलंकेचा आर्थिक डोलारा कोसळला तशाच प्रकारची किंबहुना त्याहून बिकट अवस्था बांगलादेश, पाकिस्तान आणि भूटान या देशांची होऊ शकते,असे चित्र सध्यातरी दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक पातळीवर व्यापाराला मोठा फटका बसला. (Russia Ukraine War Hits Global Trade) फेब्रुवारी अखेरीपासून बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक वायू, विविध प्रकारचे धातू, सोने, खाद्य तेल आणि अॅग्री प्रॉडक्ट्स या प्रमुख कमॉडिटजच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. क्रूड ऑइलचा भाव 139 डॉलर प्रती बॅरलपर्यंत वाढला होता. यामुळे लहान देशांना आयात-निर्यातचा समतोल ठेवणे अवघड बनले.डॉलरच्या तुलनेत सर्वच चलनांचे अवमूल्यन झाले.यात बांगलादेशचा टका चलन डॉलरच्या तुलनेत 112 च्या रेकॉर्ड पातळीपर्यंत घसरले.व्यापारी तूट वाढली आणि ती कमी करण्यासाठी जवळचे परकी चलन मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागले. यामुळे बांगलादेशचा परकीय चलन साठा (Forex Reserve) दोन वर्षांत पहिल्यांदाच 40 अब्ज डॉलरखाली गेला. 20 जुलै 2022 रोजी तो 39.67 डॉलर्स इतका होता.विशेष म्हणजे कोरोना संकटाची बांगलादेशला फारशी झळ बसली नव्हती.ऑगस्ट 2021 मध्ये बांगलादेशचा परकीय चलन साठा 48 अब्ज डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीपर्यंत वाढला होता. मात्र जुलै 2021 ते मे 2022 या 11 महिन्यात व्यापारी तूट 17.2 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड वाढली.

बांगलादेशात वाढत्या महागाईमुळे सरकारविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर पंतप्रधान शेख हसिना यांच्या आर्थिक धोरणांवर चौफेर टीका होत आहे. महागाईला रोखण्यात शेख हसिना यांचे सरकार अपयशी ठरले. परकीय चलन कमी होत असल्याबाबत पंतप्रधान शेख हसिना यांंनी चिंता व्यक्त केली. पुढील 6 ते 9 महिने धान्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीची बिले चुकती करु शकतो इतकाच निधी असल्याची ग्वाही हसिना यांनी दिली. मात्र, श्रीलंकेप्रमाणे परिस्थिती बिघडू नये, म्हणून बांगलादेश, पाकिस्तान आणि भूतान या तीनही देशांना आयात कमी करावी लागणार आहे.  

इंधन महागाईने बांगलादेशचे आर्थिक गणित बिघडवले

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने जगभरात इंधन आणि नैसर्गिक वायूचा (LNG) पुरवठा कमी केला.त्यामुळे मागील चार महिन्यात जागतिक बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमतीत जवळपास 80  टक्क्यांनी वाढ झाली आहे.रशियाची कठोर भूमिका आणि बाजारातील संभाव्य तुटवडा लक्षात घेत ऑस्ट्रेलियानेही नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. आशियासाठी ऑस्ट्रेलिया एलएनजी गॅसचा मोठा पुरवठादार मानला जातो. दुसऱ्या बाजुला रशियाला शह देण्यासाठी तसेच आगामी उन्हाळी हंगामातील इंधन पूर्तता करण्यासाठी युरोपातील देश आशियातील स्पॉट मार्केटमधून जादा पैसे मोजून गॅस खरेदी करत आहेत.ज्याचा फटका आशियातील बांगलादेश,पाकिस्तानसारख्या देशांना बसलाय.इंधन आयातीचा वाढलेला भरमसाठ खर्च आणि मर्यादित परकीय चलन साठ्यामुळे बांगलादेश सरकारला इंधन खरेदी करणे अशक्य झाले. परिणामी गेल्या महिन्यात मोठे वीज प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की शेख हसीना यांच्या सरकारवर ओढवली होती. जुलै महिन्यात निम्मा बांगलादेश वीज पुरवठा खंडीत झाल्याने काळोखात बुडाला होता.बांगलादेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 50% हून अधिक वाढल्या आहेत.जूनमध्ये इथंल्या महागाईने 7.56% इतका स्तर गाठला. 2021-22 मध्ये महागाईचा सरासरी दर हा 6.15 इतका आहे.

रशिया युक्रेन युद्धामुळे गारमेंट इंडस्ट्रीजचे कंबरडे मोडले

बांगलादेशकडे पुढील दोन ते तीन महिनेच आयात करता येईल इतकेच परकी चलन उपलब्ध आहे, असे बोलले जाते. मात्र शेख हसीना यांच्या सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. बांगलादेशची अर्थव्यवस्था जवळपास 400 अब्ज डॉलर्स इतकी आहे.ती मुख्यत्वे गारमेंट इंडस्ट्रीजवर अवलंबून आहे.अमेरिका, युरोप आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये इथले कापड आणि तयार कपडे निर्यात केले जातात. मात्र रशिया आणि युक्रेन युद्धानंतर इथल्या गारमेंट इंडस्ट्रीजचा मोठा आर्थिक फटका बसला. इंधन महागाई आणि कच्चा माल महाग झाल्याने उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली.सरकारला कोळसा आणि डिझेल अभावी विजेचे भारनियमन करावे लागले. ज्याची झळ वस्त्रोद्योगाला बसली. तिथं युद्धामुळे अमेरिका आणि युरोपातील ऑडर्स रद्द झाल्या. काही बड्या कंपन्यांनी खरेदी थांबवली. ज्यामुळे बांगलादेशातील एका बड्या उद्योगाचे अर्थकारण ठप्प झाले. गारमेंट उद्योगातील हजारो कामगार बेरोजगार झाले. गारमेंटमधील छोट्या उद्योजकांना कर्ज फेड करणे अशक्य झाले.  

नवीन कर्ज मिळेपर्यंत कळ काढावी लागणार

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बांगलादेशमध्ये प्रथमच अभूतपूर्व आर्थिक संकट ओढवले आहे. या संकटातून सावरण्यासाठी बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात (International Monetary Fund-IMF) , वर्ल्ड बँक (World Bank) आणि आशियाई विकास बँकेकडे (Asian Development Bank-ADB) मदतीची याचना केली आहे. बांगलादेश सरकारने IMF कडे 4.5 बिलियन डॉलर्सची आर्थिक मदतीची विनंती केली आहे. त्याशिवाय वर्ल्ड बँकेकडे आणि ADB कडे प्रत्येकी 1 बिलियन डॉलर्सचे अर्थसहाय्य मागितले आहे. मात्र ही प्रकिया वेळखाऊ आहे. त्यामुळे आणखी काही महिने बांगलादेश सरकारला खर्च कमी करुन काटकसरीची पावले उचलावी लागतील.

बांगलादेशच्या कर्ज मागणीबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे शिष्टमंडळ सप्टेंबरमध्ये बांगलादेशला भेट देण्याची शक्यता आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन अटी आणि शर्थींबाबत चर्चा केली जाईल. बांगलादेशने बेलआऊटचा प्रस्ताव ठेवला तर नाणेनिधीकडून बांगलादेशवर कठोर अटी लादल्या जातील. ज्यात सरकारला खर्च कमी करण्यासाठी सवलती बंद कराव्या लागतील. कर्जाचा प्रस्ताव डिसेंबर 2022 मध्ये तयार होईल आणि जानेवारी 2023 मध्ये नाणेनिधीच्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तोवर सहा महिने शेख हसीना यांच्या सरकारला आर्थिक संकटाशी तोंड द्यावे लागेल.

image source- https://bit.ly/3bJyaXN