काल परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एक अधिसूचना जारी करत लॅपटॉप, टॅब्लेट, सर्व-इन-वन वैयक्तिक संगणक आणि सर्व्हरची आयात तात्काळ प्रभावाने 'प्रतिबंधित' करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाचे देशभरातील व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि टॅबलेटच्या आयातीवर बंदी घालण्याचे स्वागत केले आहे. CAIT ने जारी केलेल्या निवेदनानुसार सरकारच्या या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल असे म्हटले आहे. यामुळे 'मेक इन इंडिया' व्हिजनला चालना मिळेल असा विश्वास व्यापारी संघटनांनी व्यक्त केला आहे. CAIT चे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी ट्वीट करत केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
भारताची बाजारपेठ महत्वाची!
भारत आजघडीला जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. भारतातील ग्राहकसंख्या देखील अफाट आहे. यामुळे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या भारताच्या बाजारपेठेकडे एक संधी म्हणून बघत आहेत. आतापर्यंत विदेशी वस्तूंनी भारतीय बाजारपेठा व्यापल्या होत्या., त्यामुळे स्थानिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचे भारतातील उत्पादन वाढेल आणि भारतीय बनावटीच्या दर्जेदार वस्तूंना मागणी वाढेल असे म्हटले आहे.
We @CAITIndia welcome this proactive step of the Government since it will promote domestic manufacturing & its consumption & give a boost to #MakeInIndia vision of PM Shri @narendramodi . Thx Shri @PiyushGoyal Ji for boosting India’s domestic trade https://t.co/hBsNOQcOQC
— Praveen Khandelwal (@praveendel) August 3, 2023
ब्रँडेड वस्तूंवर परिणाम नाही!
सरकारच्या या निर्णयामुळे निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रोनिक्स वस्तूंची निर्यात थांबणार आहे. ब्रँडेड वस्तूंवर याचा परिणाम होणार नाही, कारण त्यावरील आयात शुल्क शून्य आहे. या निर्णयामुळे करचोरी करणाऱ्या कंपन्यांना देखील लगाम लागेल आणि भारतीय ग्राहकांना दर्जेदार इलेक्ट्रोनिक्स वस्तू खरेदी करता येणार आहेत.
भारतात युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. याद्वारे लॅपटॉप, टॅब्लेट, सर्व-इन-वन वैयक्तिक संगणक आणि सर्व्हर यांची निर्मिती भारतातच केली जावी यासाठी सरकार आग्रही आहे. ‘मेक इन इंडिया’ या अभियानात केंद्र सरकारने स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.