Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bamboo Farming : एकदाच करा लागवड खर्च; 30 वर्षापर्यंत घेता येईल उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर

Bamboo Farming : एकदाच करा लागवड खर्च; 30 वर्षापर्यंत घेता येईल उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर

बांबू ही दीर्घकालीन आणि सदाहरित वनस्पती आहे. याच्या लागवडीचा येणारा खर्चही कमी आहे. तसेच बांबूच्या रोपांचे जीवनमान हे 40 ते 100 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे बांबूची लागवड केल्यानंतर भविष्यात लागवडीनंतर उत्पादन सुरू झाल्यापासून( लागवडी नंतर 3 वर्षानंतर) सुमारे 30 ते 35 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च करण्याची आवश्यकता नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय देखील आर्थिकदृष्ट्या तोट्याचा होत चालला आहे. शिवाय पारंपरिक शेती पिकांचे दर देखील अनिश्चिच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पीक पद्धतीकडे वळणे फायद्याचे ठरणार आहे. यामध्ये बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना दीर्घकालापर्यंत निश्चित उत्पादन घेता येणार आहे. आज 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिनानिमित्त आपण बांबूची लागवड, त्यापासून मिळणारे फायदेशीर उत्पन्न आणि शासकीय अनुदान याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची

भारतात विविध राज्यात विविध पिके घेतली जातात. त्यामध्ये बागायती आणि कोरडवाहू जमिनीमध्ये पाण्याच्या आणि पावसाच्या उपलब्धेतेनुसार पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या पिकांना मिळणारा दर निश्चित नसतो, त्यामुळे बहुतांशवेळा शेतकऱ्यांना होणार फायदा हा उत्पादन खर्चाच्या तुलनेने कमीच असतो. कारण शेतकरी उत्पादन घेत असलेल्या पिकांचा कालावधी हा 45 दिवस ते 3 वर्षापर्यंतचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक पिकावेळी लागवडीचा खर्च हा करावाच लागतो. त्यानंतर त्याला दर मिळेल का नाही याची निश्चिचता असते. त्यातुलनेत बांबूची लागवडही फायद्याची ठरते. बांबू ही दीर्घकालीन आणि सदाहरित वनस्पती आहे. याच्या लागवडीचा येणारा खर्चही कमी आहे. तसेच बांबूच्या रोपांचे जीवनमान हे 40 ते 100 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे बांबूची लागवड केल्यानंतर भविष्यात लागवडीनंतर उत्पादन सुरू झाल्यापासून( लागवडी नंतर 3 वर्षानंतर) सुमारे 30 ते 35 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च करण्याची आवश्यकता नाही. यासह बांबू लागवडीचे फायदे आणि इतर माहिती पुढील प्रमाणे.

बांबूची वाढती मागणी

हिरवे सोने (Green Gold) म्हणून ओळखले जाणाऱ्या बांबूच्या मागणीत दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. घराचे बांधकाम, बांबूपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तू, धागे, फर्निचर, बांबूच्या कोबांपासून तयार करण्यात येणारे लोणचे, कागद निर्मिती यासाठी बांबूला वर्षभर मागणी आहे. या शिवाय अलिकडे बांबूचा वापर आता इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे भविष्यात बांबूपासून मिळणाऱ्या उत्पादनात आणखी वाढ होऊ शकते.

बांबू लागवडीचा खर्च कमी

इतर पिकांच्या तुलनेत बांबू लागवडीचा खर्चही कमी आहे. शेतकरी बांबूची आपल्या बांधावर लागवड करू शकतो किंवा बांबूची शेती देखील करू शकतो. बांबू लागवड करण्याकरिता पाणथळ, क्षारपड, मुरमाड, काळ्याजमिनीमध्ये देखील करता येते. 5 x 4 मीटर  अंतराने लागवड करण्यासाठी रोपांची मर लक्षात घेता हेक्टरी  600 बांबूच्या रोपांची लागवड करता येते. बाजारात टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करण्यात आलेली रोपे 25 रुपयांपर्यंत उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे या रोपांसाठी महाराष्ट्र शासानाकडून 50 ते 80 % अनुदान दिले जा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. यासह सुरुवातील रोपांची लागवड, मशागत आणि खते यासह मनुष्यबळासाठी येणारा खर्च देखील पहिल्याच वर्षी जास्त होणार आहे. त्यानंतर पुढील 35 वर्षापर्यंत लागवडीचा खर्च वजा होणार आहे.

कमी पाण्यावरील पीक

जमिनीच्या प्रकारानुसार बांबूसाठी पाण्याची आवश्यकता भासते. मात्र, सुरुवातीची दोन वर्षे सोडल्यास बांबू कमी पाण्यावरही तग धरू शकते. ज्या प्रमाणे उस, अथवा इतर बाहगायती पिकांना पाण्याची आवश्यकता असते, त्यातुलनेत बांबू पिकाला कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी चालते.

बांबूपासून मिळणारे उत्पन्न-

बांबूचा  लागवड खर्च हा एकदाच करायचा असल्याने त्यापुढील सुमारे 30 वर्षापर्यंत लागवड खर्च वजा होणार आहे. तसेच लागवडीनंतर सुमारे 3 ते 4 वर्षानंतर उत्पादन सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना सुरुवातीला एकरी 800 ते 900 बांबूचे उत्पादन निघू शकते. बाजारात प्रति बांबू  70 रुपये ते 100 रुपयांपर्यंतची किमत उपलब्ध होत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना वर्षाला किमान सरासरी हेक्टरी 2 लाख ते  2.5 लाखांचे उत्पादन मिळू शकते. याच बरोबर सरकारकडून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.

बांबू लागवडीसाठी सरकारी अनुदान

बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी  महाराष्ट्र राज्य शासनाकडून अटल बांबू समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी रोपांची उपलब्धता करून देणे, त्यासह बांबूशेतीसाठी मार्गदर्शन करणे, बाजारपेठा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच सुरुवातीला शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाते. त्यामध्ये टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रोपांच्या किमतीवर 4 हेक्टरच्या आतील लागवडीसाठी 80 टक्के तर 4 हेक्टरपुढील लागवडीसाठी 50 टक्के अनुदान हे थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या वन विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अनुदानासाठी अर्ज कोठे करायचा?

महाराष्ट्र शासनाच्या अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून बांबू शेतीसाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने वनविभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधारकार्ड, बँकपासबूक , विहिरी बोअर असल्याचे हमीपत्र, बांबू रोपांची निगा राखण्याचे हमी पत्र, बांबू लागवडीच्या क्षेत्राचा नकाशा, ग्रामपंचायत रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. या कागदपत्रासह शेतकऱ्यांनी वन विभागाच्या संकेतस्थळावर अटल बांबू समृद्धी योजनेच्या अर्जाचा पर्याय निवडून सविस्तर अर्ज दाखल करायचा आहे. अर्जासाठी लिंक पुढील प्रमाणे आहे.( https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp)